डॉ. कविता बारहाते, मेंदूविकारतज्ज्ञ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जनुकीय बदल, आरोग्यसवयी आणि पर्यावरणाचाही मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. मात्र मेंदूतील रासायनिक बदलांमागची नेमकी कारणे स्पष्ट न झाल्यानेही अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मेंदूतील रसायने कमी किंवा जास्त प्रमाणात स्रावण्यातून कंपवात, सायकोसिस यांसारखे आजार होतात. हे मानसिक आजार नसून मेंदूमधील रासायनिक बिघाडामुळे निर्माण होणारे विकार आहेत, हे आधी आपण लक्षात घ्यायला हवे. या आजारांचे तात्काळ निदान झाल्यास यातून लवकर बाहेर पडणे शक्य होते. यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय लाभदायक ठरू शकतात.  

पार्किन्सन

मेंदूमधील चेतापेशीत रासायनिक प्रक्रिया घडत असतात. मात्र जनुकीय बदलांमुळेही रसायनांच्या निर्मितीवर परिणाम होत असतो. मेंदूतील डोपामाइन नावाचे रसायन शरीराच्या हालचाली नियंत्रित करण्याचे काम करीत असते. मात्र मेंदूमध्ये हे रसायन पुरेशा प्रमाणात तयार न झाल्याने पार्किन्सन आजार होण्याची शक्यता असते. या आजारासाठी काही वेळा मेंदूतील रासायनिक बदलाबरोबरच जनुके तसेच पर्यावरण कारणीभूत ठरतात. सर्वसाधारणपणे रुग्णाचे वय पन्नासहून कमी असेल तर या आजारामागे जनुकीय घटकांचा हात असण्याची शक्यता असते. या आजारात १ ते १४ पर्यंतची जनुके कारणीभूत असतात. या आजारामध्ये शरीराची थरथर होते व स्नायूंची हालचाल करण्यास त्रास जाणवतो. हात स्थिर ठेवल्यानंतरही कंप पावणे, हालचाल मंदावणे, अवयव आखडणे, विचार प्रक्रिया मंदावणे ही लक्षणे दिसतात. अनेकदा या आजारात रुग्णाला चालणे, बोलणे, साध्यासुध्या क्रिया करणेदेखील अवघड होते. यातूनच पुढे जाऊन नैराश्य, झोपेची व बोलण्याची समस्या उद्भवते. यावरील उपचारात डोपामाइनची कमतरता भरून काढण्यासाठी बाहेरून हार्मोन्स पुरवले जातात किंवा मेंदूने या हार्मोन्सची निर्मिती करावी यासाठी उपचार दिले जातात. सध्या त्यासाठी आधुनिक उपचारपद्धती उपलब्ध आहे.

अल्झायमर – डिमेन्शिया

अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश. डिमेन्शिया हा अल्झायमर या आजाराचा एक प्रकार आहे. या आजारात मेंदूतील पेशींचा ऱ्हास होतो व त्या कमी होत गेल्यामुळे मेंदूची बौद्धिक क्षमता कमी होते. स्मृतिभ्रंशामध्ये शॉर्ट टर्म मेमरी अतिशय कमजोर होते. बहुतांश वेळा वयोवृद्धांमध्ये हा आजार आढळून येतो. मात्र काही क्वचित प्रसंगी तरुणांनाही अल्झायमर होऊ शकतो. या आजारात स्मृती तर कमजोर होतेच, शिवाय शरीराच्या हालचाली मंदावणे, व्यक्ती ओळखण्यास अडचणी येणे, बोलताना अडणे यांसारखे परिणामही दिसून येतात. यामध्ये दैनंदिन काम करण्यासही रुग्णाला अनेक अडचणी जाणवतात. आंघोळ करणे, स्वच्छतेच्या बाबी, जेवणे या गोष्टी लक्षात राहत नाहीत. अनेकदा यासाठी दुसऱ्या व्यक्तीची मदत लागते. आजार प्राथमिक पातळीवर असताना लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.

सायकोसिस

या आजारात व्यक्तीच्या स्वभावात अचानकपणे बदल होतो. भास होणे, संशय घेणे, नको ते विचार येणे, नसणारी माणसे दिसणे, कारण नसताना दुसऱ्याविषयी शंका घेणे यासारखी लक्षणे दिसतात. या आजारात रुग्णाचे वास्तवाशी नाते तुटल्यासारखे होते. त्यांच्या विचारात, भावनांमध्ये व वागणुकीत विसंगती दिसून येते. मेंदूतील नॉरएपिनॅफरिन या हार्मोन्सच्या बदलामुळे सायकोसिस हा आजार होतो. पूर्वी या आजारावर नेमके उपचार नव्हते. मात्र संशोधनामुळे आता अनेक औषधे उपलब्ध आहेत. स्क्रिझोफिनिया हा आजार याच गटात मोडतो. हा मेंदूचा विकार आहे. मेंदूतील डोपोमाइन या रसायनाचे प्रमाण कमी झाल्याने हा विकार होतो. सिटोटोनिन या रसायनाचे प्रमाण या विकारात बदलते. यात रुग्ण आभासी जगात जगू लागतो. त्याचा मनावर ताबा राहत नाही. वागण्याबोलण्यात तारतम्य नसते. भ्रम व भास ही स्क्रीझोफिनियाची गंभीर लक्षणे आहेत. यामध्ये रुग्ण असंबद्ध व बिनबुडाचे बोलत राहतात.  सामाजिक भान जपणे या रुग्णांना जमत नाही.

मायग्रेन किंवा अर्धशिशी

मेंदूच्या रासायनिक बदलामुळे मायग्रेन हा आजार होत असला तरी पर्यावरणीय व जनुकीय बदलाचा परिणामही या आजाराचा मुळाशी आहे. काही संशोधनातून हा आजार मेंदूतील सीजीआरपी या पेप्टाइडच्या कमतरतेमुळे उद्भवत असल्याचे सिद्ध झाले आहे. मेंदूतील रक्तप्रवाहात बदल झाल्याने मेंदूत काही विशिष्ट संप्रेरक वाढतात. या संप्रेरकांच्या असमतोलामुळे डोके एकाच बाजूस दुखू लागते. यालाच अर्धशिशीची डोकेदुखी असेही म्हटले जाते. १५ ते १६ वयोगटापासून ते ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येतो.

प्रतिबंधात्मक उपाय

मेंदूतील स्रवणाऱ्या रसायनांच्या कमी-जास्त प्रमाणामुळे विविध आजार होतात हे खरे असले तरी जनुकीय बदल, पर्यावरण, जीवनशैली या सर्वच बाबींचा व्यक्तीच्या शरीरावर मोठा परिणाम होतो. जीवनशैली चांगली ठेवल्याने एखादा जनुकीय बदलांमुळे होणारा आजार टाळता येऊ  शकतो. यासाठी तणाव व व्यसनमुक्तीचा फायदा होतो. मद्यपानामुळे मोठय़ा प्रमाणात मेंदूची झीज होते व यातून मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. धूम्रपानामुळे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या जाड होतात किंवा त्यासंबंधित आजार उद्भवतात. याशिवाय अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, साखर व मिठाचे अतिसेवन, रात्रीचे जागरण यामुळे मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार, विहार, व्यायाम या सर्वच बाबींची आवश्यकता असते.

नैराश्य  समस्या, तणाव या संकटांशी झुंज

देता येईल आणि शरीर त्यातून सुखरूप बाहेर पडेल अशा स्वरूपाची शरीराच्या अवयवांची रचना करण्यात आली आहे. मेंदूचेही तसेच आहे. वाढलेल्या ताणाशी दोन हात करण्यासाठी मेंदूतून विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स स्रवत असतात. मात्र ज्या व्यक्तींच्या बाबतीत असे होत नाही त्यांना नैराश्य किंवा तत्सम आजारांचा संसर्ग होतो. नैराश्यात रुग्णाच्या मेंदूतून स्टीरॉइड हार्मोन्स स्रवण्याचे प्रमाण वाढते. त्याचप्रमाणे अ‍ॅड्रीनलीन व नॉरअ‍ॅड्रीनलीन (स्ट्रेस हार्मोन्स) हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि स्टेरॉटॉमाइन व डोपामाइनचे प्रमाण कमी होते. तर गंभीर नैराश्यात मेंदूतील सिरोसॉनिक नावाचे हार्मोन्स कमी होते. या हार्मोन्सचा समतोल राखता न आल्याने व्यक्ती नैराश्यग्रस्त होतो. यातूनच मेंदूचे काम मंदावते. मेंदूच्या या बदलामुळे असंतुष्ट वाटणे, भीती वाटणे, घाम येणे, हात थरथरणे, धडधड वाढणे यासारखी लक्षणे दिसतात. या आजारात तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. सुरुवातीला मानसोपचार तज्ज्ञांकडे गेल्यास समुपदेशनातून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यातूनही परिणाम दिसून येत नसल्यास मेंदूतील कमी-जास्त झालेल्या रसायनांना योग्य पातळीवर आणण्याचे काम औषधांमार्फत केले जाते.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mental health problem mental diseases