सात वर्षांचा समीरन दरवेळी इंजेक्शन दिल्यावर रागावून गाल फुगवतो. आज मात्र खऱ्या अर्थाने गाल फुगलेले दिसत होते. गलगंड म्हणजे मम्प्स या आजाराची मुलं खरं तर केबिनमध्ये येताच लक्षात येतात. पण गालफुगीचे गलगंड सोडून इतर काही कारण नसल्याचं निदान पक्कं करून घ्यावं लागतं. ‘डॉक्टर ५ दिवसांपूर्वी थोडा ताप, सर्दी-खोकला सुरू झाला आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी एका बाजूला आधी सूज आली. मग कालपासून दोन्ही बाजूला सूज आली आणि आज अशी परिस्थिती आहे की याला बोलताही येईना.’ आधी हात लावून सूज आणि वेदना किती आहेत याचा मी अंदाज घेतला आणि लसीकरणाचा इतिहास विचारला. मला सांगा, याला तुम्ही १५ महिन्यांची गलगंड म्हणजे ज्याला आम्ही एमएमआर म्हणतो ती लस दिली होती का? थोडं आठवून आई म्हणाली, ‘डॉक्टर खरं तर हा वर्षांचा झाला तेव्हापासून दोन वर्षांचा होईपर्यंत मी खूप वेगवेगळ्या तणावामध्ये होते आणि माझीही तब्येत तेव्हा बरी नसायची. म्हणून त्या वेळच्या सगळ्या लस राहून गेल्या बघा.’ तरीच, कारणही लस खूप प्रभावी आहे आणि लसीकरण केलेल्या मुलांना सहसा गालफुगी होत नाही. आधी याची लस फक्त १५ महिन्यांना दिली जायची. आता मात्र नऊ महिन्यांनी गोवरऐवजी एमएमआर म्हणजे गोवर, गलगंड व रुबेला आणि परत १५ महिन्यांनी, या प्रकारे दोन वेळा या लस देण्याची नवी मार्गदर्शक तत्त्वं आहेत.
‘डॉक्टर, पण आता काय?’ मला सांगा, अजून काय त्रास होतोय? ‘ताप, डोकेदुखी, गालफुगी हाच मुख्य त्रास आहे. आंबट पदार्थ खाल्ले की गालफुगी झालेल्या भागात वेदना वाढतात.’ मला सांगा, हा जास्त झोपेत राहतो किंवा त्याच्या जननेंद्रियांमध्ये काही त्रास आहे का? ‘नाही, तसे काही म्हणत नाही. मी स्वत: जननेंद्रियांची तपासणी करून खात्री करून पाहिली. पण डॉक्टर तुम्ही याबद्दल का विचारताय, काही टेंशन आहे का?’
ताण घेण्यासारखे काही नाही, पण काही मुलांमध्ये गलगंड हा मेंदू किंवा जननेंद्रियांमध्ये पसरतो आणि हीच त्याची थोडी काळजी करण्यासारखी बाब आहे. पण तुम्ही लगेच काळजी करू नका. समीरनला तसं काही झालेलं नाही. फक्त लक्षणांचं निरीक्षण करा आणि तसं काही वाटलं तर लगेच मला सांगा. बघा, हा शाळकरी वयाच्या म्हणजे ५ ते १२ वयोगटातील मुलांना होणारा विषाणूसंसर्ग आजार असतो आणि तो आपोआप बरा होईल. मी काही वेदना कमी होण्याची आणि तापाची औषधे लिहून देतो आहे. ‘डॉक्टर, ही गालावरची सूज कधी कमी होईल आणि ती एवढी का आली आहे?’ मुळात गालगुंड हा पॅरोटीड म्हणजे थुंकी तयार करणाऱ्या ग्रंथीचा संसर्ग असतो. ज्या भागात ही ग्रंथी असते तिथे जागा खूप कमी असते म्हणून तिथे वेदना खूप तीव्र होतात. साधारणत: ताप तीन ते चार दिवसांमध्ये आणि गालफुगी एका आठवडय़ात कमी होते. अजून एक शंका होती, गलगंड हा दोन्ही बाजूला होतो का? एका बाजूलाच सूज असेल तर..’ नाही तसे काही काही, गलगंडामध्ये एका बाजूलाही सूज येऊ शकते. पण सत्तर टक्के रुग्णांमध्ये दोन्ही बाजूला सूज येते. ‘याला परत गालफुगी होऊ नये म्हणून आता लसीकरण करणे गरजेचे आहे का?’ नाही, आत्ता ती वेळ निघून गेली आहे. पण एकदा गलगंड झाल्यावर परत ती होत नाही म्हणून लसीकरणाची आवश्यकताही नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. समीरनला हा संसर्ग त्याच्या मित्राकडून झाला असणार. म्हणून सूज आल्यापासून किमान सात दिवस मुलांना इतर मुलांच्या संपर्कात येऊ देऊ नये. मग काय समीरन, आता सात दिवस सुट्टी शाळेला. समीरन फुगलेल्या गालानेच जमेल तसा हसला.
amolaannadate@yahoo.co.in