डॉ. अपर्णा गोविल भास्कर
बहुसंख्य मंडळींची दिवसाची सुरुवात मस्त, कडक (आणि गोड!) चहाने होते. चहा पिण्यात किंवा साखरेचा चहा पिण्यातही वाईट काहीच नाही. पण उठल्यापासून कोणत्या ना कोणत्या पदार्थातून साखर आपल्या पोटात जात असते. नैसर्गिक स्वरूपात मिळणारी साखर शरीराला आवश्यक असते हे खरे; पण अती आणि वारंवार गोड खाण्याची इच्छा मात्र थांबवायला हवी.
आपल्याला साखरेचे व्यसन आहे, हे अनेकांना माहीतही नसते. काहीतरी गोड खाण्याची प्रबळ इच्छा होणे आणि ते खाल्ल्याशिवाय चैन न पडणे असे वारंवार होऊ लागल्यानंतरच त्याची जाणीव होऊ लागते. बहुसंख्य मंडळींना जेवणानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते. चॉकलेटचा तुकडा, एखादा लाडू किंवा बर्फी खाल्ली नाही तर त्यांना जेवण पूर्ण झाल्यासारखेच वाटत नाही. वरवर पाहता यात फारसे काही हानिकारक वाटत नाही. पण मुळात आपल्या शरीराला नैसर्गिक पदार्थामधून मिळणाऱ्या साखरेशिवाय आणखी साखर खाण्याची खरे तर गरज नसते हे लक्षात घ्यायला हवे. पोटात गेलेली अधिकची साखर साधारणत: चरबीच्या स्वरूपात साठवली जाते. ही लठ्ठपणाच्या आधीची स्थिती असते. त्यातही भारतीयांमध्ये पोट सुटण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे साठत गेलेली चरबी आणि त्यामुळे पोटाचा घेर वाढणे यामुळे पुढे चयापचयाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या आजारांना आमंत्रण मिळते.
हे लक्षात घ्या
- काही चांगली गोष्ट घडल्यावर किंवा सणासुदीला आपण काहीतरी गोड खातोच, पण साखर हा आपल्या रोजच्या आहाराचाही अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त साखर खाणे बरे नाही, हे प्रथमत: पटायला हवे. अगदी तंबाखूजन्य पदार्थासारखेच साखरेचेही व्यसन लागू शकते हेही लक्षात घ्यायला हवे.
- गोड पदार्थामध्ये किंवा गोड पेयांमध्ये घातलेली साखर आपल्याला दिसते. पण त्या व्यतिरिक्तही अनेक तयार पदार्थामध्ये साखर असते हे लक्षात येत नाही. सॉस, केचअप, कॉर्नफ्लेक्स, सॅलड ड्रेसिंग, ‘रेडी टू इट’ पदार्थ, बेकरीचे पदार्थ यात साखर आहे हे खाताना लक्षात येत नाही. लहान मुलांनाही चॉकलेट, कँडी, लॉलीपॉप, आईस्क्रीम असे गोड पदार्थ कधीतरीच खायचे असतात, याची सवय लहानपणापासून लावता येईल.
- जेव्हा साखर खावीशी वाटेल, तेव्हा एखादे ताजे फळ खाऊन पहा. फळांमध्ये ‘फ्रुक्टोज’च्या स्वरूपात साखर असते, शिवाय इतरही पोष्टिक तत्त्वे असतात. दूध आणि दह्य़ासारख्या दुग्धजन्य पदार्थामध्ये ‘लॅक्टोज’ साखर असते. अधिकची साखर कमी प्रमाणात खायचे ठरवले किंवा वज्र्य केली तरी चालू शकते.
- साखरेच्या जागी कृत्रिम गोडी आणणाऱ्या पावडरी (आर्टिफिशियल स्वीटनर) खा, असा प्रचार केला जातो. परंतु अशा कृत्रिम साखरेचेही दुष्परिणाम असू शकतात. कृत्रिम साखर खूप जास्त प्रमाणात खाण्यात आली, तर आणखी साखर खावेसे वाटू लागते. त्यामुळे कृत्रिम साखर शक्यतो टाळलेली बरी.
हे करून पहा-
- चहातील साखरेचे प्रमाण हळूहळू कमी करून पहा.
- तयार पदार्थावरील वेष्टनावर लिहिलेली माहिती वाचण्यास सुरुवात करा. त्यात साखरेचे प्रमाण किती यावर जरूर नजर टाका.
- ताज्या फळांच्या रसात वरून साखर घालणे टाळता येईल, तसेच अधिकची साखर असलेली शीतपेये हळूहळू कमी करता येतील.