बाळाची ओढ असणाऱ्यांसाठी गर्भधारणा आणि ते नऊ महिने हा खूप आनंदाचा भाग असतो. बाळाच्या जन्माच्या उत्सुकतेबरोबरच बाळाला जन्मत:च काही आजार किंवा व्यंग तर नसेल ना, याची काळजीही ‘भावी’ आई-बाबांना असते. गर्भधारणा कशी होते, आईच्या पोटात बाळ कसे वाढत जाते आणि बाळाला काही व्यंग आहे का, हे कसे समजू शकते, याविषयी-

गर्भधारणा

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Ruhi Chaturvedi announces pregnancy
Video: एकाच मालिकेतील तिसऱ्या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
actress Athiya Shetty announces pregnancy
अथिया शेट्टी व केएल राहुल होणार आई-बाबा; लग्नानंतर दोन वर्षांनी होणार नव्या सदस्याचं आगमन

स्त्रियांच्या मासिक पाळीच्या चक्रात चौदाव्या दिवशी स्त्रीबिज परिपक्व होते आणि गर्भधारणेसाठी तयार होते आणि अशा वेळी पुरुष बीजाशी त्याचा संयोग झाला तर गर्भधारणा होऊ शकते. मासिक पाळीच्या चक्रानुसार विचार केला तर ही घटना साधारणत: सोळाव्या किंवा सतराव्या दिवशी संभव असते. गर्भाची पहिली अवस्था एका पेशीची असते. वैद्यकीय भाषेत त्याला ‘फर्टिलाइज्ड ओव्हम’ किंवा ‘झायगोट’ म्हणतात. गर्भ मुलीचा असेल की मुलाचा हे जनुकीय दृष्टय़ा त्याच वेळी ठरलेले असते. (‘अमुक महिन्यात तमुक उपचार घेतले की मुलगाच होईल,’ हे दावे प्रत्यक्षात अशक्य आहेत हे इथे लक्षात घ्यायला हवे.) ‘झायगोट’ या एका पेशीची झपाटय़ाने वाढ होऊन काहीच दिवसांत अनेक पेशी तयार होतात. गर्भधारणा नेमक्या कोणत्या दिवशी झाली हेही ठरवणे अशक्य आहे. त्यामुळे गरोदरपणाचे महिने मोजताना शेवटची मासिक पाळी केव्हा येऊन गेली (लास्ट मेन्स्ट्रअल पिरिअड) तो दिवस गृहीत धरून पुढचे दिवस मोजले जातात.

गर्भाची वाढ

गर्भाला सहा आठवडे झाले की बाळाच्या हृदयासह सर्वच अवयव तयार होऊ लागलेले असतात. तीन महिने पूर्ण व्हायच्या सुमारास गर्भाचा प्रत्येक अवयव तयार झालेला असतो, मात्र ते कार्यक्षम नसतात. पुढील सहा महिन्यांत हे अवयव आकारने वाढतात आणि त्यांची कार्यक्षमताही वाढते. गरोदरपणाचा तिसरा महिना (८ ते १२ आठवडे) या जडणघडणीसाठी महत्त्वाचा असतो. या काळात काही विशिष्ट औषधे किंवा ‘एक्स-रे’ सारखा किरणोत्सर्ग घेण्याचा गर्भावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे काही व्यंग निर्माण होऊ शकते. मातेचे वय ३६ वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा तिला मधुमेह असेल किंवा रक्ताच्या नात्यात काही जनुकीय आजार असेल तरीही बाळात व्यंग येण्याची शक्यता असते. अनेकदा काही विशिष्ट कारण दिसत नसतानाही बाळात व्यंग असू शकते. चौथा महिना सुरू झाला की बाळ गर्भाशयात तयार झालेले असते व पुढे त्याची वाढ होत जाते. २४ आठवडय़ांच्या आधी जन्मास आलेली बाळे जगू शकत नाहीत, परंतु त्यानंतर जन्मास आलेल्या ‘प्रीमॅच्युअर’ बाळांनाही जगवण्यासाठी प्रयत्न करता येतात.

बाळातील व्यंग कसे कळते?

गरोदरपणाच्या कोणत्या टप्प्यावर कोणती प्रमुख व्यंगे कळू शकतात याविषयी बघूया. बाळाला असलेले संभाव्य व्यंग शोधण्यासाठी आता पद्धती उपलब्ध आहेत. दहाव्या वा अकराव्या आठवडय़ापासून सोनोग्राफीतून बाळाच्या अवयवांचा विकास नीट होत आहे ना हे कळते. सोनोग्राफीत आपल्याला प्रतिमा दिसत असल्यामुळे शरीराच्या जडणघडणीतील व्यंग त्यातून समोर येऊ शकते. हृदयाला छिद्र असणे, हाताची बोटे नसणे, ती एकमेकांना चिकटलेली असणे, हात-पाय नसणे किंवा हाताचा निम्मा भाग नसणे व हाताचे पंजेच खांद्यापाशी चिकटलेले असणे, नाक किंवा कान नसणे, मूत्रपिंडे नसणे वा कमी आकाराची असणे, डोक्याचा वरचा भाग विकसित नसणे, पाठीचा कणा दुभंगलेला असणे, ओठ वा टाळू दुभंगलेला असणे या गोष्टी त्यातून दिसू शकतात.

तिसऱ्या ते पाचव्या महिन्यापर्यंत काही रक्तचाचण्या करता येतात. ‘डबल मार्कर’ वा ‘ट्रिपल मार्कर’ नावाच्या या चाचण्यांमधून बाळाला व्यंग असण्याचा धोका किती ही शक्यता कळते, प्रत्यक्ष व्यंग त्यातून शोधता येत नाही. ज्या गरोदर स्त्रियांच्या बाबतीत बाळाला व्यंग असण्याची जोखीम दिसून येते त्यांची सोळाव्या आठवडय़ाच्या सुमारास व्यंग शोधण्यासाठी गर्भजलतपासणी केली जाते. यात जनुकीय प्रयोगशाळेत गर्भात बाळाच्या भोवती असलेल्या पाण्याची चाचणी केली जाते व त्याचा अहवाल मिळण्यास काही वेळा २ ते ३ आठवडे लागू शकतात. ही चाचणी तितकीशी सोपी नाही व ऊठसूट कुणाचीही ती केली जात नाही. मातेची आधी रक्तचाचणी करून गरज असेल तरच ही तपासणी करतात. गर्भजलतपासणी ही बदनाम झाली गर्भलिंगनिदानासाठी. पण तिचा खरा उपयोग वापर बाळाला असलेले डाऊन्स सिंड्रोमसारखी जनुकीय व्यंगे (क्रोमोझोमल अबनॉर्मिलिटी) कळण्यासाठी आहे. ‘कोरिऑन व्हिलस सँपलिंग’ नावाची आणखी एक चाचणी व्यंग शोधण्यासाठी करतात. गर्भाच्या अस्तराच्या छोटय़ा भागातील पेशींची ही चाचणी आहे. यातही जनुकीय व्यंग कळते.

बाळाचे व्यंग काय यानुसार डॉक्टरांकडून त्या स्त्रीस गर्भपाताचा सल्ला दिला जाऊ शकतो व त्यास कायद्याने संमतीही आहे. मात्र आपल्याकडील कायद्यानुसार गर्भधारणेच्या २० आठवडय़ांनंतर गर्भपात करता येत नाही. नुकतीच एका बलात्कार पीडितेला तिच्या व्यंग असलेल्या २४ आठवडय़ांच्या बाळाचा गर्भपात करण्याची परवानगी न्यायालयाने दिली. परंतु काही गरोदर स्त्रियांच्या बाबतीत गर्भाच्या व्यंगाचे निदान लवकर (२० आठवडय़ांच्या आत) होऊ शकत नाही. याच कारणामुळे कायद्यातील ही तरतूद सध्या चर्चेत आहे. गर्भधारणा झाल्यावर योग्य वेळी स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास केव्हा व कोणत्या चाचण्या कराव्या लागतील याबद्दल मार्गदर्शन मिळू शकेल. अर्थात प्रत्येक व्यंग चाचण्यांमध्ये कळेलच असेही नाही. काही गोष्टी बाळ जन्माला आल्यावर कळू शकतात. अशा वेळी नवजात बाळांच्या काही रक्तचाचण्या केल्या जातात व त्यातूनही काही गोष्टी कळतात. त्यानुसार बाळावर उपचार करता येतात.

– डॉ. चारूचंद्र जोशी, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ

dr.charujoshi@gmail.com