आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उंबर वृक्षाला औदुंबर या नावानेही संबोधतात. उंबराच्या दोन प्रकारच्या जाती आहेत. उंबर व काकोदुम्बर. काकोदुम्बराला ग्रामीण भाषेत ‘गांडय़ा उंबर’ म्हणण्याची प्रथा आहे, कारण त्याला तळापासूनच उंबराची फळे लागतात.  हिंदीमध्ये गुलर असे उंबराला म्हटले जाते. उंबर हा लहान झाळकट वृक्ष असून विविध लहान-मोठय़ा नद्यांच्या किनाऱ्यावर याची वस्ती असते. उंबराची साल व फळे आणि काही प्रमाणात पाने यांचा औषधी वापर आहे. जमिनीत खोलवर असलेल्या उंबराच्या मुळांचे पाणी युक्तीने काढावे. त्याला विविध हट्टी विकारांवर तात्काळ आराम देण्याचा विशेष गुण आहे. या वनस्पतीत साबणासारखा एक पदार्थ आहे. त्यामुळे रिठा व शिकेकाई यांना पर्याय म्हणून आंतरसालीच्या चूर्णाचा वापर केला जातो. उंबराची साल स्तंभन आहे. पक्व फळे शीतल, स्तंभक व रक्तसंग्राहक आहेत. उंबराच्या चीकात वरील गुणांबरोबरच चटकन सूज कमी करणे आणि शरीर पुष्ट  करण्याचे गुण आहेत. उंबराचा चीक अल्प प्रमाणात दूध साखरेतून त्याकरिता दिला जातो. उंबर फळांचा उपयोग ज्या  रोगात रक्त वाहते, सूज येते किंवा लघवीतून रक्त येणे, रक्ती आव, अत्यार्तव, गोवर, कांजिण्या अशा लहान-मोठय़ा रोगांत होतो. उंबराचा चीक रक्ती आव तसेच अतिकृश लहान मुले वाढीस लागावी म्हणून देण्याचा प्रघात एककाळ असे. त्याकरिता चीकाचे दहा थेंब दुधाबरोबर द्यावे. गालगुंड, गंडमाळा, खूप पू असणाऱ्या जखमा आणि हट्टी सूज यावर उंबराचा चीक लावला असता वेदना व सूज लवकर कमी होते. उंबराच्या पानावर लहान फोड येत असतात. ते फोड दुधात वाटून दिल्यास गोवर कांजिण्या विकारात सत्वर आराम मिळतो.

काही मंडळींना मद्यपान, धूम्रपान, तंबाखू यांचे व्यसन असते. या व्यसनांमुळे यकृतवृद्धी होते, जलोदराची धास्ती असते. काहींना बाहेरील वारंवारच्या खाण्यापिण्यामुळे काविळचा संसर्ग पुन:पुन्हा होत असतो. अशांनी बकरीच्या दुधात फळे उकडून ती खाल्ल्यास पंधरवडय़ात खूप आराम मिळतो. जळवात, टाचांना फोड येणे, रक्त वाहणे या विकारांत उंबराची फळे वाटून त्याचा लेप करून रात्रभर स्वच्छ फडक्याने बांधून ठेवावे. सत्वर गुण येतो. मलेरिया किंवा हिवताप विकारात उंबराच्या सालीचे चूर्ण दुधातून घ्यावे. सालीचा काढा कदापि करू नये, कारण उष्णतेने त्यातील ज्वरघ्न गुण जातो.

दिवसेंदिवस मधुमेह या विकाराचे आक्रमण खूप मोठय़ा संख्येने ग्रामीण व शहरातील मंडळींना भोगावे लागत आहे. मधुमेहाची खूप औषधे घेऊन रुग्ण मित्र कंटाळलेले असतात. अशा अवस्थेत उंबर, वड, पिंपळ, पायरी अशा क्षीरीवृक्षांच्या आंतरसालीचे चूर्ण नियमितपणे घेतल्यास मधुमेहाला प्रतिबंध होतो.

माझे गुरुजी आदरणीय वैद्यराज बा. न. पराडकर यांना वनस्पती क्षेत्रात विविध प्रयोग करण्याची मोठी हौस होती. एकदा उंबरपाण्याच्या अतिशुद्धतेबद्दल चर्चा चालली होती. तडक उंबराचे ताजे पाणी काढण्याकरिता माझे गुरुजी आणि आम्ही काही हौशी मंडळी येरवडय़ाच्या पुढे नगर रस्त्यावर दुतर्फा असलेल्या एका मोठय़ा उंबराच्या झाडाखाली लांबवर  पसरलेल्या मुळाचे खाली मोठा खड्डा खणला. त्यात एक माठ कापड बांधून ठेवला. मुळीला सुरीने छेद घेऊन उंबराचे पाणी त्या माठात सहजपणे पडेल अशी सुरक्षित व्यवस्था केली. सकाळी आम्ही पुन्हा त्या जागेवर गेलो. उंबरजलाने माठ पूर्णपणे भरलेला होता. त्या पाण्याच्या अनेक बाटल्या गच्च भरल्या. अतिउष्णतेच्या अनेकानेक विकारांनी ग्रासलेल्या रुग्ण मित्रांकरिता वापरल्या. लगेच आराम मिळाला.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umbar tree