डॉ. कामाक्षी भाटे, स्त्रीरोगतज्ज्ञ
काही बाबतीत मोकळेपणाने चर्चा करणे टाळले जाते. मात्र त्यामुळे अनेकदा त्रास सहन करावा लागतो. महिलांच्या योनीमार्गातील संसर्ग हा त्यापैकी एक. बहुतांश महिलांना कधी ना कधी या समस्येला तोंड द्यावे लागते, मात्र याबद्दल असलेले अज्ञान व माहिती विचारण्याबाबत वाटणारी लाज यामुळे अनेकदा साधी समस्याही उग्र रूप धारण करते.
महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत. जिवाणू व बुरशी ही योनीमार्गाचा संसर्ग होण्याची दोन प्रमुख कारणे. योनीमार्गातील त्वचा कायम ओली राहिली, नियमितपणे स्वच्छ केली गेली नाही किंवा जंतुसंसर्ग असलेल्या साथीदारासोबत लैंगिक संबंध ठेवल्यास जिवाणूजन्य संसर्गाचा धोका असतो. याशिवाय योनीमार्ग अस्वच्छ राहिल्यास अनेक स्त्रियांना विशेषत: मधुमेही स्त्रियांनाही योनीमार्गात कॅण्डिडा या बुरशीमुळे दाह सहन करावा लागतो. या संसर्गात लघवी होण्यास सुरुवात झाल्यावर वेदना होतात. अशा प्रकारचा त्रास १५ ते ४५ या वयोगटांतील महिलांमध्ये अधिक दिसतो.
योनीमार्गाचा संसर्ग होण्याची कारणे व घ्यावयाची काळजी
ट्रायकोमोनियासिस : हा आजार ट्रायकोमोनास व्हेजिनालीस या जिवाणूच्या संसर्गामुळे होतो. हा आजार लैंगिक संपर्काच्या माध्यमातून पसरतो. हे सूक्ष्म जंतू ओलाव्यात जिवंत राहतात. हा संसर्ग झाल्यास केवळ महिलेने उपचार करण्यापेक्षा साथीदारालाही सोबत घेऊन जावे. या प्रकारात जर लैंगिक संबंध ठेवणाऱ्या साथीदाराला हा संसर्ग असल्यास आणि फक्त महिलेवर उपचार केल्यास कालांतराने पुन्हा संसर्ग होऊ शकतो, तसेच उपचार घेत असताना लैंगिक संबंध ठेवू नये.
प्रसूतीनंतर संसर्गाचा धोका : बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांच्या प्रजनन भागात जिवाणूंमुळे संसर्ग होतो. नैसर्गिक प्रसूतीच्या तुलनेत प्रसूतिसाठी शस्त्रक्रिया किंवा तत्सम मदत घ्यावी लागते त्यांना संसर्ग होण्याची भीती जास्त असते. या संसर्गाकडे दुर्लक्ष केल्यास महिलेला मोठय़ा आजाराला तोंड द्यावे लागते. योनीमार्गातील अस्वच्छता आणि सततच्या संसर्गामुळे योनीमार्गाचा कर्करोग होण्याचीही शक्यता असते. वयाच्या पन्नासीनंतर मासिक पाळी बंद झाल्यावरही योनीमार्गातील ससंर्ग होऊ शकतो. यामध्ये त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसल्यास महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या वेळी पॅप स्मीअर फॉर मॅलिग्नसी नावाची तपासणी करण्यात येते. ही तपासणी फार सोपी असते. यामध्ये दूषित भागातील स्राव काचेच्या स्लाइडवर पसरवून त्यावर समभाग अल्कोहोल व स्पिरिट ओतले जाते. ती स्लाइड वाळल्यावर लॅबोरेटरीमध्ये मायक्रोस्कोपखाली पाहून कर्करोगाच्या पेशी दिसतात किंवा नाही याचे निदान केले जाते.
योनीमार्गातील संसर्गाची लक्षणे
लघवी करताना घाई होणे, जळजळ होणे किंवा लघवी सुटण्यास अडथळा जाणवणे असे त्रास डिस-युरिया आजारात मोडतात. लघवी संपत आली की दाह होतो. योनीमार्गातून पांढरे पाणी जाण्याचे प्रमाण वाढणे आणि त्याचा आंबट वास येणे. अधिक प्रमाणात पांढरे पाणी गेल्यामुळे कंबर दुखणे व ओटीपोटात दुखणे यांसारखी लक्षणे दिसतात. योनीमार्ग लाल होणे किंवा चट्टे येणे. योनीमार्गात खाज सुटणे. योनी लालसर होणे. लैंगिक संबंधाच्यावेळी वेदना होणे.
संसर्ग होऊ नये म्हणून..
महिलांचे अंतर्वस्त्र हे स्वच्छ व सुती असावे. दुसऱ्यांची किंवा योनीमार्गाचा संसर्ग असलेल्या व्यक्तीचे अंतर्वस्त्र वापरू नये. मासिक पाळीत वापरले जाणारे सॅनिटरी पॅड चांगल्या दर्जाचे असावेत. दिवसात किमान दोन ते तीन वेळा हे पॅड बदलावे. मासिक पाळीत कापड वापरणाऱ्यांनी मात्र याबाबत अधिक काळजी घ्यावी. कापड वापरल्यानंतर र्निजतुक करावे आणि ते कोरडय़ा जागेत जंतूचा वावर नसलेल्या ठिकाणी ठेवावे.
लघवीच्या मार्गात दाह होऊ नये, याकरिता रुग्णाने आठ-दहा ग्लास पाणी रोज प्यावे. यामुळे मूत्राशयातील जिवाणू शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत होते. दर दोन ते तीन तासांच्या अंतराने लघवी करून मूत्राशय रिकामे करावे.
शौचाला गेल्यानंतर अथवा लघवीला जाऊन आल्यावर तेथील भाग स्वच्छ करताना नेहमी हात पुढून मागे नेणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीच्या स्वच्छतेमुळे योनीमार्गात जंतू जाऊन संसर्ग होण्याची शक्यता असते. योनीमार्गातील त्वचा दमट राहू नये यासाठी प्रयत्न करा, कारण अशा ओलसर भागावर विषाणू, जिवाणू किंवा बुरशी सहज वाढतात.
शरीरसंबंध करण्यापूर्वी आणि केल्यानंतर लघवी करून मूत्राशय व मूत्रमार्ग साफ करावा. योनीमार्गातील संसर्ग झाल्यास उपचार घेत असताना आपल्या साथीदाराचीही तपासणी करून घ्यावी कारण अनेकदा हा संसर्ग लैंगिक संबंधातून आलेले असतात.
योनीमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी पावडर किंवा रासायनिक द्रव्य असलेला साबण वापरत असाल तर काळजीपूर्वक वापर करा. ही पावडर किंवा साबण योनीमार्गात जाणार नाही याची काळजी घ्या. यामुळे येथील त्वचा कोरडी पडते आणि संसर्ग होतो.
गर्भाशयाचा कर्करोग
भारतीय महिलांमध्ये गर्भाशयासंबंधित कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, बीजांडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग असे अनेक कर्करोगाचे प्रकार आहेत. योनीमार्गात अस्वाभाविकरीत्या रक्तस्राव, अस्वच्छता या प्रमुख कारणांमुळे कर्करोगाची लागण होते. गर्भपिशवी आणि योनीला जोडणारा अवयवांच्या ऊतींमध्ये तयार होणारा कर्करोग म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग. हा आजार पॅपिल्लोमा व्हायरसमुळे (एचपीव्ही) उद्भवतो. या आजारामागे योनीमार्गातील रक्तस्राव हे प्रमुख लक्षण आहे. धूम्रपान, अनेकदा प्रसूती, दीर्घकाळासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर किंवा एचआयव्हीबाधित स्त्रियांना याचा जास्त धोका असतो. अनेकदा गर्भाशयाचा कर्करोग आनुवंशिकही असतो. स्त्रीच्या आईला किंवा बहिणीला गर्भाशयाचा कर्करोग असेल तर कुटुंबामध्येही कर्करोग असण्याची शक्यता वाढते. कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. त्यामुळे योनीमार्गात काही अडथळा येत असेल, सतत संसर्ग होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती तपासणी करून घ्यावी.