डॉ. अभिजीत जोशी

पाण्यात वस्तू तरंगण्याचा जो सिद्धांत आहे (बॉयन्सी), त्यामुळे पाण्यात उतरल्यावर आपल्या अवयवांचे वजन पाणी घेते. पाण्यात विविध प्रकारचे व्यायाम केले जातात. त्यातील ‘अ‍ॅक्वा एरोबिक्स’ हा प्रकार तरुणांमध्ये लोकप्रियही झाला आहे. पाण्यात नुसते चालणे हादेखील एक प्रकारचा व्यायाम आहे. ‘अ‍ॅक्वा एग्झरसाइझ’विषयी थोडेसे ज्यांच्या पायांचे सांधे खूप दु:खतात आणि नेहमीचे ‘फिजिओथेरपी’चे व्यायाम करताना ज्यांना त्रास होतो अशांसाठी पाण्यातील व्यायाम हा एक पर्याय होऊ शकतो. काही दुखण्यांच्या शस्त्रक्रियांच्या आधी रुग्णांना फिजिओथेरपी सांगितली जाते. या वेळीही डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘अ‍ॅक्वा एग्झरसाइझ’ करता येतो. गुडघ्याच्या ‘एसीएल’ शस्त्रक्रियेच्या आधी वा नंतरही असा व्यायाम करता येऊ शकतो.

पोहायला शिकताना सुरुवातीला पोटावर झोपून समोर बारला हात धरून किंवा पाठीवर तरंगून पेडल मारल्यासारखे पाय हलवायला शिकवतात. या स्थितीत तरंगताना पाऊल, घोटा आणि गुडघ्याचे काही विशिष्ट व्यायाम करता येतात. पावलांची वा गुडघ्याची दुखणी असणाऱ्यांना ते फायदेशीर ठरू शकतात.

नुसते पाय सरळ ठेवून पाण्यावर तरंगतानाही पाठीचे व पोटाचे स्नायू थोडे आकुंचन पावतात. त्यामुळे पाठीवर किंवा पोटावर तरंगताना कमरेला बरे वाटते. हृदयविकार असलेल्या व्यक्तींना पाण्यात चालण्याचा फायदा होऊ शकतो. पाण्यात चालताना शरीराला पाण्याचा सौम्य ‘रेझिस्टन्स’ मिळतो. खांद्यांच्या दुखण्यांमध्येही पाण्यात चांगल्या प्रकारे व्यायाम करता येतो. खांदा पाण्यात तरंगत असल्याने अधिक चांगली हालचाल करता येते.

‘अ‍ॅक्वा एरोबिक्स’ हा प्रकार आता मोठय़ा शहरांमध्ये लोकप्रिय होतो आहे. शारीरिक व्यंग असलेल्या लहान मुलांचे व्यायाम पाण्यात करून घेण्याची पद्धतीही परदेशात प्रचलित आहे. नुसती नेहमीची ‘फिजिओथेरपी’ करणे काही वेळा लहान मुलांसाठी कंटाळवाणे होते. पाण्यातील व्यायाम करताना मात्र पाण्यात खेळता- खेळता व्यायाम करून घेता येतो, अशी ती संकल्पना आहे. हातापायाला झालेले ‘फ्रॅक्चर’ बरे झाल्यावर हालचाली वाढवतानाही पाण्यातील व्यायाम करता येतात.

काय काळजी घ्यावी?

  • पाण्यातील व्यायामांसाठी साधारणत: ३ फूट किंवा कमरेच्या किंचित वर पाणी असणे चांगले. शिवाय पाण्यात उतरून व्यायाम करायचा असल्यामुळे तो आधी शिकून घेणे आणि व्यायामाच्या वेळी जबाबदार व्यक्ती बरोबर असणे योग्य.
  • ज्यांचा तोल जातो असे रुग्ण (बॅलन्स डिसऑर्डर) त्यांनी, तसेच पायाला जखमा असतील तर हा व्यायाम नको.
  • डोळ्यांच्या वा त्वचेच्या तक्रारी असलेल्यांनीही हा व्यायाम टाळावा.
  • खूप लहान मुले आणि वयोवृद्धांनी करण्यास हरकत नाही, परंतु बरोबर प्रशिक्षित व्यक्ती हवीच.
  • पाणी उथळ असले तरी हाताला किंवा कमरेला ‘फ्लोटस्’ जरूर वापरावेत. व्यायाम करताना पडायला झाले तर त्या फ्लोटस्चा उपयोग होईल.

dr.abhijit@gmail.com