एखाद्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने चित्रपटासाठी अगदी काही दिवसांत अनेक किलो वजन कमी केल्याच्या बातम्या आता नवीन नाहीत. गेल्या काही दिवसांत तर अशा बातम्या फारच वाचायला मिळाल्या. यातला झटपट वजन कमी करण्याचा भाग अधिक आकर्षक असतो. कमी काळात खूप वजन कमी करणे कितपत बरे, वजन कमी करण्यात नेमका कशाचा विचार केला जातो याविषयी जाणून घेऊ..
झटपट वजन घटवणे अयोग्यच
वजन कमी करण्यासाठी काय करू आणि काय नको, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. इथे एकच लक्षात घ्यावे, की आपले वजन कमी करणे ‘हेल्दी वेटलॉस’ या संकल्पनेत बसते का? आता हा ‘हेल्दी वेटलॉस’ काय असतो बुवा? ज्या वेळी वजन कमी झाल्यानंतरही तुमचा स्टॅमिना वाढतो, शरीराचे योग्य पोषण होते, काही आजार असतील तर त्यांचा त्रास कमी होतो आणि कमी केलेले वजन दीर्घ काळ कमी राहते, या चार कसोटय़ांवर उतरलेला ‘वेटलॉस’ आरोग्यदायी समजावा. झटपट वजन घटवणे आणि झटपट वजन वाढवणे या दोन्ही गोष्टी बऱ्या नव्हेत. अभिनेत्यांसारख्या काही व्यक्ती त्यांच्या पेशाची गरज म्हणून अल्पावधीत वजन कमी करतात वा वाढवतात हे खरे. पण त्यात सातत्याने वैद्यकीय वा इतर मदत घेतलेली असते हे विसरून चालणार नाही. असे पटकन वजन उतरवण्यासाठी अनेक लोक ‘क्रॅश डाएट’ करतात, वेगवेगळ्या प्रकारची औषधे व इंजेक्शने घेऊन चयापचय क्रिया वाढवण्याचा प्रयत्न करतात, भूक कमी करणारी औषधे घेतात. परंतु अशा औषधांचे अनेक दुष्परिणाम असल्यामुळे त्यावर जागतिक आरोग्य संघटनेनेही बंदी आणली आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार झटपट वजन कमी करणे कधीच सुचवले जात नाही.
चयापचय क्रियेचे संतुलन महत्त्वाचे
लठ्ठपणा कमी करण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपण लठ्ठपणाच्या कोणत्या पायरीवर आहोत हे कळून घेण्याबरोबरच आपल्या असलेल्या इतर आजारांचाही विचार करायला हवा. त्यानुसार किती काळात आणि कोणत्या प्रकारे वजन कमी करावे हे ठरवले जाते. जास्त खाल्ले की वजन वाढते व खाणे सोडल्यावर ते कमी होईल हा गैरसमज आहे. प्रत्येक व्यक्तीची चयापचय क्रिया (मेटॅबोलिझम) वेगळे असते आणि वजन वाढण्याशी या क्रियेचा मोठाच संबंध असतो. त्यामुळे सर्वाना वजन टवण्याची एकच पद्धत लागू पडत नाही.
ढोबळमानाने शरीराने घेतलेली ऊर्जा आणि खर्च केलेली ऊर्जा यातील संतुलन म्हणजे ‘मेटॅबोलिझम’. हे संतुलन बिघडले की वजन वाढू लागते. यात काही अंतर्गत आणि काही बाह्य़ गोष्टीही लक्षात घ्याव्या लागतात. आपण काय व किती खातो, सेवन केलेले उष्मांक आपण किती जाळतो हेही महत्त्वाचे आहे. एकाच वजनाच्या, एकत्र जिमला जाणाऱ्या, एकसारखेच ‘डाएट’ करणाऱ्या दोन व्यक्तींचे वजन एकाच गतीने कमी होईल असे नाही. अनेकदा खूप व्यायाम केला, बरोबर ‘डाएट’ केले तरीही वजन कमीच होत नाही. यामागे ‘मेटॅबोलिझम’चे बिघडलेले संतुलन असू शकते आणि ते मार्गावर आणणे गरजेचे ठरते.
लठ्ठपणाची शस्त्रक्रिया प्रत्येकाला करता येते का?
सर्वानाच लठ्ठपणावरील बॅरिअट्रिक शस्त्रक्रिया करता येते असे नाही. ज्या व्यक्ती लठ्ठपणाच्या तिसऱ्या पायरीवर असतात त्यांच्यासाठी हा पर्याय असू शकतो, कारण त्यांना असलेली आनुषंगिक आजारांची शक्यता त्यामुळे कमी होण्यास मदत होते. ज्यांचा बीएमआय ३२.५ पेक्षा अधिक असतो आणि त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, ‘फॅटी लिव्हर’, हृदयविकार, मूत्रपिंडाचा विकार, सांधेदुखी, घोरण्याचा आजार (स्लीप अ‍ॅप्निया) असेल, इतर काही आजारही असतात त्यांना बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया करून घेता येऊ शकते. ३२.५ बीएमआयच्या खालच्या लोकांमध्ये मात्र ज्यांना बळावलेल्या मधुमेहासारखा आजार आहे अशा लठ्ठ लोकांसाठीही ही शस्त्रक्रिया फायदेशीर ठरू शकते. बॅरिअ‍ॅट्रिक शस्त्रक्रिया केल्यानंतरही लगेच वजन कमी होत नाही. साधारणत: शस्त्रक्रियेचा परिणाम दिसण्यास ६ आठवडय़ांनी सुरुवात होते. पुढे वजन हळूहळू कमी होत जाऊन जवळपास एका वर्षांने रुग्ण त्याचे वजन कमी करण्याचे लक्ष्य साध्य करण्याच्या जवळ पोहोचतो. अर्थात शस्त्रक्रियेनंतरही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार आणि व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
किती दिवसांत किती वजन कमी करावे?
किती दिवसांत किती वजन कमी केलेले चांगले याचे ठोकताळे लठ्ठपणाच्या पायऱ्यांनुसार बदलतात. सर्वसाधारणपणे १० ते १५ टक्के वजन ३ ते ४ महिन्यांत कमी केल्यास ते चांगले समजले जाते व त्याने लठ्ठपणाशी निगडित आजारांचा त्रास कमी होऊ शकतो. परंतु हे वजन कमी करणे वैद्यकीय सल्ल्याने व आरोग्यदायी पद्धतीनेच करणे गरजेचे आहे.
– डॉ. जयश्री तोडकर, बॅरिअ‍ॅट्रिक सर्जन
लठ्ठपणाच्या पायऱ्या
व्यक्तीचा ‘बॉडी मास इंडेक्स’ (बीएमआय) १८ ते २५ या दरम्यान असेल तर तो सामान्य समजला जातो. भारतीयांमध्ये २५ ते २८.५ बीएमआय असेल तर ते अतिरिक्त वजन (ओव्हरवेट) मानतात. २८.५ ते ३२.५ बीएमआय ही लठ्ठपणाची पहिली पायरी आहे. ३२.५ ते ३७.५ बीएमआय ही दुसरी पायरी तर ३७.५ च्या पुढच्या बीएमआयला लठ्ठपणाची तिसरी पायरी म्हणतात. जसजशी लठ्ठपणाची पायरी चढत जाते तसा व्यक्तीला त्याच्याशी निगडित इतर आजार जडण्याची शक्यताही वाढते. बीएमआयबरोबर व्यक्तीच्या लठ्ठपणाशी संबंधित इतर अंतर्गत गोष्टी तपासल्या जातात आणि त्यांच्या बाबतीत असलेला इतर आजारांचा संभव लक्षात घेतला जातो. त्यावरून त्या व्यक्तीसाठी उपचार ठरवले जातात.
कमी वेळात अधिक वजन कमी करताना सेलिब्रिटी खूपच काटेकोरपणे खाणेपिणे आणि व्यायाम पाळतात. जितके उष्मांक पोटात जाणे त्यांना ठरवून दिलेले असते तेवढेच ते घेतात. वजन कमी करण्यात जेवढे महत्त्व आहाराला आहे तेवढेच व्यायामालाही असते. पण प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची गरज वेगळी असते व आंधळेपणे केवळ दुसरे कुणीतरी करते म्हणून तसे ‘डाएट’ किंवा तसाच व्यायाम करण्याचा फायदा होईल असे नाही. त्यामुळे आपल्या प्रकृतीनुसार योग्य सल्ल्यानेच वजन कमी करणे चांगले.
– लीना मोगरे, सेलिब्रिटी डाएटिशियन
(शब्दांकन- संपदा सोवनी)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा