डॉ. वैशाली बिनीवाले, स्त्रीरोगतज्ज्ञ
‘प्रोजेस्टेरॉन’, ‘इस्ट्रोजेन’ अशा विविध संप्रेरकांची नावे आपण ऐकतो. पण त्यांची कार्ये आपल्याला माहिती आहेत का?.. स्त्रियांच्या आयुष्यात विविध टप्प्यांवर आरोग्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या संप्रेरकांचे महत्त्व मोठे असते. वयात येतानाचे वय, प्रजननक्षम वय आणि रजोनिवृत्तीच्या वेळी स्त्रियांच्या शरीरात स्रवणारी आणि आपले कार्य अचूक करणाऱ्या संप्रेरकांविषयी माहिती घेऊ या.
वयात येताना : मुलींची पहिल्यांदा पाळी सुरू होते त्याच्या आधीपासूनच शरीरात स्रवणाऱ्या संप्रेरकांनी आपले काम सुरू केलेले असते. पहिल्या पाळीच्या टप्प्याला वैद्यकीय भाषेत ‘मिनार्की’ असे म्हणतात, तर त्यात्याही आधीचा वयात येण्याची सुरुवात होण्याचा टप्पा म्हणजे ‘प्यूबर्टी’.
मेंदूच्या ‘हायपोथॅलॅमस’ या भागातून ‘गोनॅडोट्रॉफिन्स’ नावाच्या संप्रेरकांचे स्रवण होत असते. यात ‘एफएसएच’ (फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन) आणि ‘एलएच’ (ल्यूटिनायझिंग हॉर्मोन) या संप्रेरकांचा समावेश असतो. पहिली पाळी सुरू होण्यासाठी ही संप्रेरके शरीराला तयार करत असतात. या कालावधीत वयात येताना होणारे बदल दिसू लागतात आणि मग पाळी सुरू होते. ‘ओव्हरीज’च्या एकूण कार्यासाठीही ही संप्रेरके महत्त्वाची आहेत. तसेच ‘अॅड्रिनल’ ग्रंथींमधून स्रवणारी संप्रेरकेही वयात येताना महत्त्वाची ठरतात.
संप्रेरकांच्या अनियमिततेमुळे पाळी लवकर- म्हणजे दहा वर्षांच्या आतच सुरू होऊ शकते. त्याचप्रमाणे मुलगी सोळा वर्षांची झाल्यानंतरही पाळी सुरूच झाली नाही, तरी ते संप्रेरकांमुळे झालेले असू शकते.
सामान्य पद्धतीने आणि नियमित पाळी येणे हे संप्रेरकांच्या संतुलनावर आधारित आहे. ‘थायरॉईड’ संप्रेरकांची पातळी कमी-जास्त झाल्यास पाळी अनियमित होऊ शकते. ‘पॉलिसिस्टिक ओव्हरी’ ही समस्याही अशा अनियमिततेमुळे निर्माण होऊ शकते. त्यात ओव्हरीवर लहान-लहान ‘सिस्ट’ येतात. स्त्रीबीजाच्या निर्मितीतही अडचण होऊ शकते. हनुवटीवर केस येणे, वजन वाढणे अशी लक्षणेही दिसतात आणि पुढे गर्भधारणेतही समस्या येऊ शकते.
गर्भधारणा : दर महिन्याला जेव्हा पाळी येते तेव्हा ‘इस्ट्रोजेन’ संप्रेरक अधिक प्रमाणात स्रवते आणि त्यामुळे गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या आवरणाची वाढ चांगली होते. स्त्रीबीजाची निर्मिती झाल्यानंतर (ओव्ह्य़ूलेशन) मात्र ‘प्रोजेस्टेरॉन’ हे संप्रेरक स्रवते. त्यामुळे गर्भाशयाच्या आतील आवरणात काही बदल होतात आणि गर्भ राहण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती निर्माण होते. गर्भधारणा झाली नाही तर ‘ओव्ह्य़ूलेशन’नंतर साधारणत: १४ दिवसांनी ‘प्रोजेस्टेरॉन’चे स्रवण कमी होते आणि पुढची पाळी येते. पाळीच्या या नियमित चक्रासाठी ही संप्रेरके महत्त्वाची.
गर्भधारणा होणे आणि तो गर्भ रुजणे यातही संप्रेरकांची भूमिका असते. ‘प्रेजेस्टेरॉन’ हे संप्रेरक गर्भाने टिकाव धरण्यासाठी महत्त्वाचे असते. ‘ओव्हरी’तून स्रवणारे ‘एचसीजी’ (ह्य़ुमन कोरिऑनिक गोनॅडोट्रॉफिन) हे संप्रेरक बाळाच्या नाळेच्या वाढीसाठी मदत करते.
गर्भधारणा झाल्यावर संप्रेरकांची अनियमितता झाल्यास गर्भपात होण्याचीही शक्यता असते.
प्रसूतीच्या वेळी ‘ऑक्सिटोसिन’ हे संप्रेरक वाढते आणि कळा येऊन प्रसूती होते, तर प्रसूतीनंतर ‘प्रोलॅक्टिन’ हे संप्रेरक स्रवते आणि बाळाला स्तनपान करण्यासाठी ते महत्त्वाचे असते. या ‘प्रोलॅक्टिन’मुळे लगेच पुन्हा गर्भधारणा होण्यासही अटकाव होतो.
रजोनिवृत्ती : रजोनिवृत्तीच्या वेळी ‘ओव्हरीज’चे कार्य कमी होते. त्यामुळे संप्रेरकांची कमतरता निर्माण होते. यात विशेषत: ‘इस्ट्रोजेन’ हे संप्रेरक कमी होऊन रजोनिवृत्तीच्या वेळी दिसणारी विशेष लक्षणे दिसू शकतात. ‘हॉट फ्लॅशेस’ होणे आणि काही मानसिक लक्षणे दिसणे त्यामुळे होऊ शकते.
‘फायब्रॉईडस्’सारख्या समस्याही ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकाच्या असंतुलनामुळे होऊ शकतात. त्याला ‘इस्ट्रोजेन डीपेंडंट टय़ूमर’ असेही म्हटले जाते. हे फायब्रॉईडस् प्रजननक्षम वयातही होऊ शकतात. रजोनिवृत्तीच्या वयात नुसते ‘इस्ट्रोजेन’ स्रवत राहिले आणि ‘प्रोजेस्टेरॉन’चे स्रवण झालेच नाही, तर गर्भाशयाचा कर्करोग होण्याचीही शक्यता असते.
‘ओव्हरीज’चे कार्य चाळिशीच्या आधीच कमी झाले तर रजोनिवृत्ती आधी येऊ शकते.