स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य हा अतिशय महत्त्वाचा, पण तितके लक्ष न दिला जाणारा विषय. वयाच्या विविध टप्प्यांवर स्त्रियांच्या मनात निर्माण होणारे आणि त्यांना आतल्या-आत त्रास देणारे प्रश्न अनेकदा बोलल्याने सुटू शकतात. हवी असते, ती मन मोकळे करण्यासाठी एक जागा. वेळच्या वेळी एखाद्या सुज्ञ व्यक्तीचा किंवा प्रसंगी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास या प्रश्नांची उत्तरे मिळवणे नक्कीच सोपे होईल. मुली आणि स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्यासंबंधीचे सामान्यत: दिसणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधण्याच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ.

छोटेच, पण मोठे केलेले प्रश्न

मी कशी दिसते, मी फार लठ्ठ आहे का, माझे कपडे बरोबर आहेत ना, वर्गातील मुलेमुली किंवा ऑफिसमधली मंडळी मला त्यांच्यात का घेत नाहीत.. हे प्रश्न वाचताना अगदी किरकोळ वाटतात. पण त्या व्यक्तीसाठी ते महत्त्वाचे असतात. प्रश्नांची ही यादी व्यक्ती व्यक्तीनुसार वेगळी असते. शालेय किंवा महाविद्यालयीन वयात, पुढे कार्यालयात काम करताना या गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. आपण आणि दुसऱ्या मुली अशी तुलना मनात सुरू होते. यातून एकतर त्यांच्यासारखे (..आणि आपण खरे जसे नाही तसे) बनण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो, नाहीतर आपण कसे चांगले नाही हे मनाशी घोळवत आणखीनच मागे मागे राहण्याकडे कल सुरू होतो. काही जणी आपल्या मनातील असुरक्षितता झाकण्यासाठी विनाकारण आक्रमक स्वभावाच्या होतात किंवा उसने अवसान आणून आपण खूप ‘कॉन्फिडंट’ आहोत असेही काही जणी दाखवतात. असुरक्षिततेपोटी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर नको इतके अवलंबून राहणे; नव्हे त्या व्यक्तीस चिकटूनच राहणे, आणि मग त्यांच्याकडून भ्रमनिरास झाल्यावर प्रचंड दु:ख होणे असेही काही प्रकरणात दिसते. जीव द्यायची इच्छा होणे, स्वत:शी रडणे, अंधारात बसून राहणे या गोष्टी अशा मुलींमध्ये दिसतात, पण त्या बाहेर दिसून येत नाहीत. किंबहुना अनेकदा घरातल्यांनाही ते लक्षात येत नाही. सतत दडपून ठेवलेला असा छोटा प्रश्न आतमध्ये हळूहळू कधी मोठा होऊ लागतो ते स्वत:लाही कळत नाही. आपण जसे आहोत त्यापेक्षा वेगळे कुणी बनण्याची आपल्याला गरज नाही, हे अशा बाबतीत लक्षात घेण्याची गरज असते. आपण आपल्याशी खरे असणे फार महत्त्वाचे असते आणि ही गोष्ट आपल्यापेक्षा वयाने किंवा अधिकाराने मोठी असलेली एखादी सुज्ञ व्यक्ती किंवा जीवाभावाची मैत्रीणदेखील लक्षात आणून देऊ शकते. गरज असते ती बोलण्याची.

‘सुपरवुमन’ बनण्याचा सोस नको

अनेकींच्या स्वत:कडून खूप मोठय़ा अपेक्षा असतात. मला सगळेच जमले पाहिजे, घरातल्या जबाबदाऱ्या मी सांभाळणारच, करिअरमध्येही मला शिखर गाठायचेय, मला सर्व नातीही घट्ट टिकवायची आहेत, मला कुणालाच दुखवायचे नाही, थोडक्यात, मला अगदीच ‘परफेक्ट’ व्हायचे आहे, अशा स्वत:च्या अपेक्षा अपेक्षा काही जणी अगदी लीलया पेलतात. सर्वानाच ते पेलता येईल अशी अपेक्षा करणे मात्र योग्य ठरणार नाही. स्त्री असो वा पुरुष, एक माणूस म्हणून प्रत्येकाच्या क्षमताना काही मर्यादा असतात. त्यामुळे ‘परफेक्शन’चा ध्यास वाईट नाही, पण त्याने मनाची शांतता गमावणे, ही किंमत फार मोठी असते.

समाजमाध्यमांचा परिणाम

हल्ली ‘फेसबुक आयडेंटिटी’, ‘व्हॉटस्अ‍ॅप आयडेंटिटी’ या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग झाल्या आहेत. समाजमाध्यमे वापरणे चूक नाही, पण त्यातील खोटेपणा त्रासाचा ठरतो. समाजमाध्यमांवरील आपल्या ‘आयडेंटिटी’तून अनेक जण आपल्या व्यक्तिमत्त्वातील पूर्ण न होऊ शकलेल्या इच्छा पूर्ण करू पाहतात. अर्थातच त्या माध्यमांवरील त्यांच्या वागण्यात दांभिकता आणि अस्थिरतेचा शिरकाव होतो. ही गोष्ट स्त्री-पुरुष सर्वाच्या बाबतीत घडू शकते व त्यातून विविध मानसिक ताण निर्माण होतात. या सोशल माध्यमांच्याच बाबतीत आपल्या जवळच्या माणसांवर सतत संशय घेणे, त्यांची ‘काँटॅक्ट हिस्टरी’ तपासणे या गोष्टीही दिसतात.

बऱ्याच समाजांमध्ये स्त्रीला एकतर ‘परफेक्ट मॅनिप्यूलेटर’ बनावे लागते, नाहीतर ‘सेल्फ सॅक्रिफायसिंग व्हिक्टिम’ तरी व्हावे लागते, असे एक वचन प्रसिद्ध आहे. अशा समाजात स्त्रीला सतत सावध राहावे लागते आणि त्याच वेळी कुणावर तरी विश्वास ठेवण्याचीही मानवी गरज तिला जाणवत राहते. सतत क्षणोक्षणी जगाला पारखत राहावे लागल्यामुळे तिला अनेक ताणांना तोंड द्यावे लागते. ही स्थिती जेव्हा जाईल, तेव्हा खरी लैंगिक समानता आली, असे म्हणता येईल.

अनुभवविश्व विस्तारा

अनेक घरांमध्ये मुलींना वरकरणी स्वातंत्र्य असल्यासारखे दिसते, पण त्यांचे अनुभवविश्व विस्तारण्यासाठी योग्य वेळी जी मोकळीक गरजेची असते ती मिळतच नाही. त्यामुळे स्वत: अनुभव घेऊन, प्रसंगी ठेचकाळून त्यातून शिकणे आणि चांगले-वाईट स्वत:चे स्वत: ओळखू लागणे हा टप्पा अशा अनेक मुलींच्या जीवनात खूप उशिरा येतो. काही मुलींमध्ये अनुभवातून शिकण्यापूर्वीच सगळ्या जगाविषयी मत वाईट होते, तर काही जणींच्या फुलपाखरी समजुतींचा भ्रमनिरासही होतो. या सगळ्यातील अनुभवातून शिकण्याचा टप्पा योग्य वेळी प्रत्येकीच्या समोर येणे, तिला तो अनुभव घेण्याची संधी मिळणे आणि त्यातून काही अडचण निर्माण झालीच, तर घरच्यांचा भक्कम पाठिंबाही असणे याला एक प्रकारे खरे स्वातंत्र्य म्हणता येईल.

मनात दडलेली भीती

प्रेमात पडणे, लग्न, लैंगिक संबंध, गर्भारपण, प्रसूती अशा विविध टप्प्यांची भीती वाटणाऱ्या अनेक मुली बघायला मिळतात. खरे तर हे सामान्य म्हणावेत असे प्रश्न आहेत. ते दरवेळी व्यक्त केले जात नाहीत, पण मनाच्या आत ते असतात. डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी त्याविषयी विचारले की अनेक जणी आधी बिचकत आणि मग मोकळेपणानेही बोलतात. रीतसर लग्न होऊन वर चार-पाच वर्षे झाल्यानंतरही शारीरिक संबंधच न आलेले नवरा-बायकोही मी बघितले आहेत. लैंगिक संबंधांची भीती त्यामागे होती. अशी भीती वाटण्यात काही वेगळे नाही. खरे तर यातील प्रत्येक प्रश्न बोलल्याने व तज्ज्ञांकडून अधिक माहिती करून घेऊन सोडवता येऊ शकतो. आता हळूहळू स्त्रिया अशा मनातल्या गोष्टींवरही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करू लागल्या आहेत, विशेष म्हणजे मोकळेपणे मदत घेऊ लागल्या आहेत हे महत्त्वाचे.

डॉ. वासुदेव परळीकर, मानसोपचारतज्ज्ञ

paralikarv2010@gmail.com

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.