डॉ. नितीन उनकुले
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
दिवसभराच्या कामामुळे कंबर, पाठ, मान आणि खांद्यांवर ताण येत असतो. या ताणाकडे सातत्याने दुर्लक्ष होत राहिल्यास दुखणे उद्भवणार हे नक्की. अशा दुखण्यातून बरे होताना इतर औषधोपचारांप्रमाणे योगासनांचाही उपयोग होतोच, पण मुळात ताण वेळीच हलका व्हावा आणि शरीर ‘रिलॅक्स्ड’ आणि मोकळे व्हावे यासाठी रोजच्या व्यायामात योगासनांचा समावेश केल्यास ते अधिक चांगले.
दुखणे उद्भवल्यावर..
- कंबर, मान, पाठ आणि खांद्यांचे दुखणे टाळण्यासाठी आणि झालेले दुखणे बरे करण्यासाठीची योगासने वेगवेगळी आहेत. दुखणे झाल्यावर सर्वात आधी वैद्यकीय सल्ला घेणे हाच उत्तम उपाय. त्यानंतर प्रथम डॉक्टर सांगतील ती ‘फिजिओथेरपी’ करून नंतर योग्य वेळी योगासने, सूर्यनमस्कार व प्राणायाम यांना सुरुवात करावी. या सगळ्याच्या बरोबरीने सकस आहार आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेले प्रयत्नही असे कंबर-पाठीचे दुखणे बरे होण्यात महत्त्वाचे ठरते. सर्वच गोष्टी केवळ योगासनांनी बऱ्या होतात, असा प्रचार काही जण करतात. पण योगासनांना या इतर गोष्टींची जोड फार गरजेची असते.
- पाठ, कंबर, मानेसारखी दुखणी अंगावर काढणे चुकीचेच. तसे केल्यास दुखणे बळावते आणि हालचालींवर मर्यादा येत जातात. दुखणे का उद्भवले याचे वैद्यकीय निदान होणे आवश्यक असते. त्यानंतर विश्रांती व उपचारांनी जसजशा वेदना कमी होत जातील तेव्हाच योगासनांकडे वळावे. दुखणे सुरू असताना योगासनेच व सूर्यनमस्कार केल्यास वेदना वाढण्याचीच शक्यता अधिक. व्यक्तीच्या प्रकृतीनुसार आणि दुखण्याच्या प्रकारानुसार त्याला वेगवेगळी योगासने उपयुक्त ठरतात. त्यामुळे दुखणेकऱ्याने आणि इतरांनीही तज्ज्ञ योगशिक्षकाकडून योगासने शिकून घेणे गरजेचे.
- योगासने सुरू करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडून हिरवा कंदील मिळाला की आधी उभ्याने करायची सोपी योगासने सांगितली जातात. ही योगासने रक्ताभिसरणासाठी मदत करतात, शिवाय कंबर आणि पाठीच्या दुखण्यांमध्ये रुग्णाचा हालचाली करण्याचा आत्मविश्वास कमी झालेला असतो, तो या उभ्या स्थितीतील योगासनांमुळे वाढतो. ती नीट जमू लागल्यावर आधी बैठय़ा स्थितीतील योगासने, मग आधी पोटावर झोपून आणि नंतर पाठीवर झोपून करायची योगासने सांगितली जातात. योगासनांनंतरचे शवासन आणि प्राणायाम धरून योगाचा साधारणत: ३० मिनिटांचा व्यायाम सांगितला जातो.
- दुखण्यातून बरे होताना करायची योगासने सावकाश करावीत. या योगासने सुरू करतानाच एकदम सूर्यनमस्कारांसारखा ‘चल’ पद्धतीचा व्यायाम करू नये. ‘अ-चल’ प्रकारच्या योगासनांपासून सुरुवात असावी.
शरीरातील ताण घालवण्यासाठी..
- दुखणे होऊच नये यासाठी मात्र नियमित सूर्यनमस्कारांसारख्या संपूर्ण शरीराचा व्यायाम फायदेशीर असतो. पाठ, कंबर, मान आणि खांद्यांची बहुतेक दुखणी शरीराची लवचीकता गेल्यामुळे होतात. अनेकदा वाढलेले वजन, व्यायामाचा अभाव आणि बरोबरीने सततचे बैठेकाम यामुळे दुखणे सुरू होते. नियमित व्यायाम, विविध योगासनांचे ‘कॉम्बिनेशन’, योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीमुळे दुखणे टाळणे शक्य होऊ शकते.
- ताडासन, त्रिकोणासन, वीरभद्रासन, पवनमुक्तासन, हस्तासन, शवासन ही योगासने कंबर आणि पाठीची दुखणी टाळण्यासाठी रोज करता येतील. दुखण्यातून बरे होत असताना मात्र या आसनांसाठी तज्ज्ञ योग प्रशिक्षकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ही आसने दिसताना खूप सोपी दिसतात. त्यांची कृती कोणत्याही पुस्तकात किंवा इंटरनेटवरही सहज वाचायला मिळते. आसनांची छायाचित्रेही पाहायला मिळतात. परंतु प्रत्यक्ष योगासने करतानाची शरीराची अपेक्षित असलेली ठेवण, श्वासोच्छ्वासाची पद्धत या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळेच आसने शिकणे गरजेचे असते. दुखण्यातून उठल्यावर कोणती आसने करू नयेत हे समजून घेणेही गरजेचे असते. त्यासाठी प्रशिक्षक मदत करतो.
- योगासने रोज एका ठरावीक वेळी, पोट रिकामे व हलके असताना करावीत. ती करताना शरीराच्या स्थितीकडे बाहेरून लक्ष देणे महत्त्वाचे असतेच, शिवाय शरीराकडे आतून लक्ष देणेही गरजेचे. या गोष्टी योगासनांचा सराव करताना हळूहळू लक्षात येत जातात.
(शब्दांकन- संपदा सोवनी)
First published on: 25-06-2016 at 00:45 IST
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga asanas