विविध प्रकारची योगासने शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम देतात. योगासने योग्य प्रकारे व नियमित केल्यास रक्ताभिसरण, पचनसंस्था व श्वसनसंस्थेचे कार्य सुधारते. चयापचयाचा दरही सुधारतो. झोप चांगली लागण्यास मदत होते. शरीरासह मनाचाही थकवा जाऊन उत्साही वाटू लागते. रोज करता येण्याजोग्या काही साध्या आसनांविषयी.
पवनमुक्तासन
या आसनात पाठीवर झोपून दोन्ही पाय पोटाजवळ घेतात आणि गुडघ्यापाशी पकडतात. त्यामुळे पोटावर थोडा दाब पडतो आणि शरीरातील वायू वाहेर टाकण्यासाठी मदत होते. जड झालेले पोट आणि अन्ननलिकेवरील ताण जाऊन आतून मोकळे झाल्यासारखे वाटते.
भुजंगासन
हल्लीच्या बदललेल्या, बैठय़ा जीवनशैलीत पाठ, कंबर, मान आणि खांदे भरून येतात. ते मोकळे करण्यासाठी भुजंगासन चांगले. यात शरीराचा आकार भुजंगासारखा केला जातो. पोटावर झोपून, दोन्ही हात बाजूला ठेवून किंवा दोन्ही हातांचे पंजे छातीपाशी घेऊन बेंबीच्या वरचा भाग उचलून धरला जातो. छाती, खांदे, मान, डोके उचलले जाते. त्यामुळे हात, खांदे, पाठ आणि कमरेला बळकटी यायला मदत होते. स्नायूही शिथिल होतात.
सेतूबंधासन
हे आसन भुजंगासनाच्या बरोबर उलट आहे. पाठीवर झोपून दोन्ही पाय गुडघ्यांत मुडपून पावले जमिनीवर ठेवली जातात आणि हात लांब ठेवून पाठ, कंबर व नितंब उचलले जातात. त्यानेही पाठ मोकळी होते. सतत संगणकावर काम करावे लागणारे किंवा सारखे उभे राहावे लागणारे लोक, दिवसभर धावपळ करावे लागणारे लोक त्यांच्यासाठी हे आसन चांगले.
त्रिकोणासन
या आसनात उभे राहून शरीराचा आकार त्रिकोणासारखा केला जातो. दोन पायांत अंतर ठेवून उभे राहून हात बाजूला समांतर पसरायचे आणि डाव्या हाताने हळूहळू उजव्या पायाचा घोटा पकडण्याचा प्रयत्न करायचा. त्याच वेळी उजवा हात हवेत सरळ ठेवला जातो व छातीने श्वास घेतला जातो. या आसनाने स्नायू ताणले जाऊन त्यांना होणारा रक्तपुरवठा वाढतो. सांधे मोकळे होतात.
वीरभद्रासन
यात एक पाय मागे व दुसरा पुढे ठेवून दोन्ही हात वर केले जातात व पुढे घेतलेल्या पायाचा गुडघा वाकवला जातो. या अवस्थेत थोडा वेळ आसन धरुन ठेवले जाते. त्याने सांधे, गुडघे, पाठ, कंबर व खांदे बळकट होण्यास मदत होते. शरीर आणि मनावरची मरगळ झटकली जाते आणि तरतरीत वाटू लागते.
हस्तपादासन
या आसनात उभे राहून दोन्ही हात वर घेऊन पुढे वाकले जाते. त्यामुळे पाठीचा कणा, मणके, कंबर, खांदे, पाय आणि पायाच्या स्नायूंना बळकटी येते. शरीराची लवचिकता वाढते.
शलभासन
शलभासनामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारायला मदत होते. पोट, ओटीपोट, मांडय़ा व कमरेच्या स्नायूंना बळकटी येते. यात पोटावर व छातीवर झोपून हनुवटी जमिनीवर ठेवतात व मांडीला दोन्ही हातांचा आधार घेऊन दोन्ही पाय मागून उचलतात. हे आसन श्वास आणि शरीर मोकळे करते.
योग प्रशिक्षक
योगासने करण्यापूर्वी हे लक्षात घ्या-
’ कोणतीही योगासने योग्य प्रकारे शिकून त्याचा सराव करून मगच घरी करण्यास सुरुवात करावी. प्रत्येक आसनाचे काही बारकावे असतात, श्वासोश्वासाची वेगळी पद्धत असते. कोणत्या आसनानंतर कोणते केले तर चांगले, अशाही काही गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे. शिवाय प्रत्येकाच्या प्रकृतीस प्रत्येकच आसन योग्य ठरेल असे नाही. आसन चुकीच्या पद्धतीने केले गेले तर त्याचे काही दुष्परिणाम देखील होऊ शकतात. त्यामुळे योगासने करण्यापूर्वी तज्ज्ञ शिक्षकाचे मार्गदर्शन घेणे गरजेचे.
’ प्रत्येक आसन केवळ १५-२० सेकंद केले तरी त्याचे फायदे मिळतात. सुरूवातीला ते देखील न जमल्यास आसन लगेच सोडून पुन्हा केले तरी चालते. आसन खूप वेळ धरुन ठेवलेच पाहिजे असे काही नाही.
(शब्दांकन- संपदा सोवनी)
राहा फिट! : आरोग्यदायी योगासने!
डॉ. नितीन उनकुले
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 30-04-2016 at 01:16 IST
मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga for fitness