गोवा म्हणजे जुनी मंदिरे, चच्रेस, रम्य समुद्रकिनारे, फेणी आणि काजू हे समीकरण जरी झाले असले तरीसुद्धा निसर्गसमृद्ध गोव्यात अनेक सुंदर ठिकाणे आजही जरा आडबाजूला वसलेली आहेत. उत्तर गोव्यात बारदेश प्रांतात मांडवी नदीच्या किनारी आणि राजधानी पणजीच्या समोर वसला आहे सुंदर किल्ला रेस मागोस. नदीकिनारीच असलेल्या टेकडीवर पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आणि तिथून दिसणारा निसर्ग पाहायचा असेल तर इथे भेट द्यायलाच हवी. किल्ल्यावर जवळजवळ ३० तोफा आजही पाहायला मिळतात. विजापूरच्या आदिलशहाकडून बारदेश हा प्रांत पोर्तुगीजांनी जिंकून घेतल्यावर या ठिकाणी त्यांनी रेस मागोस चर्च आणि त्या शेजारीच हा किल्ला बांधला. कालांतराने मोडकळीला आलेल्या या किल्ल्याचा जीर्णोद्धार गेरार्ड डी कुन्हा या सुप्रसिद्ध वास्तुविशारदाच्या देखरेखीखाली सन २००८ मध्ये केला गेला. रेस मागोस हा किल्ला आता एक सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखला जातो. सुंदर तटबंदी, आगळेवेगळे बुरुज, देखणा दरवाजा आणि उत्तम रीतीने सजवलेल्या किल्ल्याचा अंतर्भाग यामुळे आता इथे पर्यटकांची गर्दी असते, पण या किल्ल्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे गोव्याचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार मारीओ मिरांडा यांच्या चित्रांचे इथे असलेले भव्य प्रदर्शन.
गोव्याच्या भूमीने अनेक नररत्ने या देशाला दिली आहेत. लोटली गावचे मारिओ मिरांडा हे त्यातलेच एक. देशातील आघाडीच्या वर्तमानपत्रातून, साप्ताहिकातून मारिओ मिरांडा यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असत. नुसती व्यंगचित्रेच नव्हे तर मारिओ मिरांडा यांनी अनेक पोट्र्रेट्ससुद्धा तितक्याच ताकदीने काढलेली आहेत. या किल्ल्यात त्यांच्या चित्रांचे सुंदर दालन पाहायला मिळते. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर समोरच काही पायऱ्या चढून एका इमारतीत या किल्ल्याचा इतिहास भिंतीवर लिहिलेला आहे आणि त्याचे एक लाकडी मॉडेल करून ठेवले आहे. त्याच्या समोर असलेल्या मोठय़ा दालनात मिरांडाची चित्रे लावली आहेत.मारिओ मिरांडा यांच्या चित्रात अनेक विषय हाताळलेले दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र तर निव्वळ देखणे आहे. मिरांडा १९७४ साली अमेरिकेला गेले होते. त्यावेळी त्यांच्यातल्या व्यंगचित्रकाराला दिसलेले अमेरिकेतील लोकजीवन त्यांनी आपल्या खास व्यंगचित्रकाराच्या नजरेने टिपलेले दिसते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बंकरसारख्या वास्तुरचनेतसुद्धा मिरांडा यांनी काढलेली विविध चित्रे प्रदर्शित केलेली आहेत.
कलादालनात पर्यटकांसाठी छोटे उपाहारगृहसुद्धा आहे. अतिशय शांत परिसर आणि समोरच दिसणारी मांडवी नदी आणि त्यापलीकडे असलेले पणजी शहर असा सगळा नयनरम्य देखावा इथून दिसतो. किल्ला आणि हे कलादालन पाहायला शुल्क आहे. किल्ल्याच्या दाराशीच असलेल्या दालनात मिरांडा यांची चित्रे, पुस्तके, चहाचे कप आणि किटली यावर काढलेली मिरांडा यांची चित्रे अशा भेटवस्तू विकत मिळतात. निसर्गसमृद्ध गोवा मारिओ मिरांडा यांच्या नजरेतून पाहताना वेगळाच आनंद मिळतो. मारिओ मिरांडा आजही या चित्रदालनातून आपल्याशी संवाद साधतात असेच वाटत राहते.
आशुतोष बापट – ashutosh.treks@gmail.com