राजस्थानातील अतिप्राचीन पुष्कर शहर. त्याचा संस्कृतमध्ये शब्दश: अर्थ निळे कमळाचे फूल. असे मानतात की, ब्रह्मदेवाचा हंस चोचीत निळे कमल घेऊन पृथ्वीवर जिथे उतरला त्या ठिकाणी पुष्कर कुंड निर्माण झाले. थरच्या वाळवंटाजवळ असलेले हे पुष्कर हिंदू व शीख धर्मासाठी फार पवित्र ठिकाण समजले जाते. पुष्कर सरोवरास मानसरोवराइतकेच महत्त्व आहे. पुष्कर तलावाभोवती अनेक घाट- दगडी पायऱ्या आहेत. शेकडो मंदिरे आणि ठिकठिकाणांचे मिळून अंदाजे ५२ घाट पुष्करमध्ये असतील. ब्रह्मदेवाचे फार प्रसिद्ध मंदिर येथे आहे. बरीच मंडळी कुंडात डुबकी मारून नंतरच ब्रह्मदेवाच्या मंदिरात दर्शनास जातात. मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. संध्याकाळी निवांत ब्रह्मघाटावर बसून तेथील सभोवतालचा रमणीय परिसर, स्थानिक आरती, सूर्यास्त बघत दिवस मावळतो. तेथेच जवळ गायत्रीदेवी मंदिर आणि जवळच्या डोंगरावर सावित्रीदेवी मंदिर आहे. काíतक पौर्णिमेला पुष्कर कुंडात स्नानाचे हिंदू धर्मात खास महत्त्व आहे. हिंदूप्रमाणे शीख समाजासाठीदेखील पुष्कर धार्मिक स्थळ आहे. येथील गुरुद्वारा फार प्रसिद्ध आहे. अनेकविध घाट, मंदिरे, तलाव इ. बघण्यासारखे पुष्करमध्ये आहेत.
साधारण कार्तिक पौर्णिमेच्या सुमारास नोव्हेंबरमध्ये पुष्कर मेळा भरतो. देशातील सगळ्यात मोठा वार्षिक जनावरांचा बाजार जिथे उंट, घोडे व गुरांची मोठी विक्री होते. अनेक ठिकाणांहून उंट, घोडे, गुरे विक्रीसाठी आणतात.
लाखोंचा कारभार होतो. उंटांची जत्रा बघण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक या सुमारास पुष्करमध्ये येतात. पाच-सात दिवस चालणारा पुष्कर मेळा म्हणजे स्थानिक लोकांना मजेचा सोहळा असतो. उंटांना सुंदर कलात्मकरीत्या सजवून-रंगवून पेश केले जाते. जाहीर लिलाव येथे होतो. रंगीबेरंगी माळा आणि गोंडय़ांनी मढलेले उंट लक्ष वेधून घेतात.
लोकसंगीत, पारंपरिक नृत्य, उंटांच्या शर्यती, निरनिराळे राजस्थानी खाद्यप्रकार अशी वेगळीच मजा त्या वेळी असते. सगळ्यात लांब ठेवलेल्या मिशांची आणि पागोटे बांधायची स्पर्धा मजेशीर असते. पारंपरिक पोशाख, रंगीत माळा, गोंडे, रंगबिरंगी पागोटी, राजस्थानी घागरो, सजीलो उंट सगळेच आपल्यासाठी वेगळे असते. जयपूर-जोधपूर बघताना पुष्करचा विसर पडू न देणे योग्य. पुष्करची सफर जरा वेगळी तरी नक्कीच मजेची ठरते. ती एकदा तरी अनुभवायलाच हवी.
सोनाली चितळे sonalischitale@gmail.com