कर्नाटकातील तुंगा नदीतीरी वसलेले शिवमोगा पश्चिम घाटाचे प्रवेशद्वारच समजले जाते. प्रचंड पाऊस आणि हिरव्यागार वनश्रीने समृद्ध अशा या प्रदेशाने जागतिक वारसा यादीत स्थान पटकावलेले आहे. बंगळुरूपासून गाडीने सहा तासांच्या अंतरावर शिवमोगा असून इथली प्रचलित भाषा कन्नड आहे. प्रेक्षणीय स्थळात इथे शरावती नदीच्या खोऱ्यातील वन्यजीव अभयारण्य व जवळचा जोग फॉल्स खास आहेत. शरावतीचे विस्तीर्ण खोरे, गर्द हिरवी झाडी आणि जंगलातले पशू-पक्षी सर्वच अवर्णनीय. वाघ, सांबर, हरिण, चित्ता, अस्वल, कोल्हे, साप- सुसरी, जंगली खारूताई, हॉर्नबिल तसेच दुर्मीळ जातींची फुलपाखरे या जंगलात आढळून येतात. शरावतीचा ट्रेक साहसवीरांना नेहमीच खुणावत असतो. कवलेदुर्ग किल्ल्याचा ट्रेक असाच एक सुंदर अनुभव देणारा ठरतो. जोग फॉल्सच्या वरच्या बाजूस असणारे धरण पूर्ण भरल्यानंतर जेव्हा त्याची सर्व दारे उघडली जातात, तेव्हा जोगचे चारही धबधबे एकत्र होऊन एक महाकाय प्रपात कोसळू लागतो. ते दृश्य फारच मनोहारी असते. दुपारी चार वाजेपर्यंत खाली पायऱ्यांवरून जाण्यास परवानगी असते. पावसाळ्यात आसमंत धुक्याने भरून जातो. जवळच्या जंगलातील एलिफंट कॅम्पमध्ये सकाळीच नाश्तापाणी करून आठ वाजेपर्यंत गेल्यास तेथील आजूबाजूच्या जंगलातून येणाऱ्या हत्तींच्या कळपाशी चक्क क्रिकेट, फुटबॉल, इ. खेळ खेळता येतात. त्यांना अंघोळ घालता येते. त्यांना खायला देता येते. तशी तिथे तिकीट काढून खास सोय केली आहे. हे हत्ती माणसाशी एकदम गट्टी करून असतात. हत्तीच्या पिल्लाला अंघोळ घालायला तर खूपच मजा येते. एकूणच जर व्यवस्थित आखणी करून शिवमोगा बघायला गेले तर जोगचा धबधबा, शरावतीचे खोरे-अभयारण्य, हाती-स्नान, कवलेदुर्ग आदी गोष्टी अनुभवता येतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा