एके काळी निसर्गातील अनेक आश्चर्याचा उलगडा मानवाला झाला नव्हता. त्यामागील विज्ञान त्याला उमजले नव्हते. मग त्यालाच दैवी चमत्कार मानून पुढे तेथे मंदिरेदेखील उभारली गेली. हिमाचल प्रदेशातील ज्वालाजी मंदिर, गरम पाण्याच्या कुंडांभोवती भारतभर बांधलेली मंदिरे, लोणारसारख्या विवरात आणि आजूबाजूला बांधलेली मंदिरे अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहाता येतात.
मालवणपासून ७७ किमीवर असलेल्या मठ गावात बोंबडेश्वर मंदिर आहे. कोकणी पद्धतीच्या साध्या कौलारू मंदिरासमोर चिऱ्यात बांधलेले दोन तलाव आहेत. दोनही तलावांतील पाणी समपातळीत राहावे यासाठी मधल्या भिंतीत काही छिद्रे ठेवलेली आहेत. दुसऱ्या तलावातील पाणी पाटामाग्रे बागायतीत वळवलेले आहे. दोन तलावांपकी उजवीकडील तलावातील पाण्यात अधूनमधून बुडबुडे येत असतात. ‘बोंबडेश्वर’ अशी साद मोठय़ा आवाजात घातल्यावर तळ्यातून येणाऱ्या बुडबुडय़ांची संख्या वाढते असा समज आहे. अर्थात बोंबडेश्वरऐवजी मोठय़ा आवाजात उच्चारलेल्या कुठल्याही शब्दांच्या कंपनानीही तलावातून बुडबुडे येतात. आम्ही तिथे असताना गावातल्या दोन बायका बाजूच्या तलावावर पाणी भरायला आलेल्या. त्यांच्या बोलण्यामुळेही तलावातून बुडबुडे येण्यास सुरुवात झाली होती. बुडबुडे म्हणजे मालवणी भाषेत बोंबाडे. तळ्यातून येणाऱ्या या बुडबुडय़ांच्या चमत्कारावरून या ठिकाणी स्थापन झालेल्या पिंडीला (शंकराला) बोंबडेश्वर हे नाव प्राप्त झाले असावे.
यावरून २००२ साली उत्तरांचलमधील केदारेश्वर येथील पुरातन शंकर मंदिराची आठवण होते. केदारेश्वर मंदिराजवळ असलेले मंदाकिनी नदीचे पात्र ओलांडल्यावर एक पडके मंदिर होते. त्या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिविलग पाण्यात पूर्णपणे बुडालेले होते. त्या ठिकाणीही ‘बम बोले’ असे म्हटल्यावर पाण्यात बुडबुडे येत असत. २०१३ साली केदारनाथला झालेल्या उत्पातानंतर ते मंदिर अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नाही.
गंधकामुळे अशा प्रकारचे बुडबुडे पाण्यातून येतात असे ऐकले होते; पण गंधकाचा येणारा विशिष्ट वासही या दोन्हीही ठिकाणी येत नव्हता. मग हे बुडबुडे कशामुळे येतात. याचा उलगडा होण्यासाठी भूशास्त्राची थोडीशी माहिती करून घेणे आवश्यक आहे. भूस्तराखाली जे अनेक खडक असतात त्यात सच्छिद्र खडक असतात. या सच्छिद्र दगडांत असलेल्या पोकळीत हवा असते. कोकणात होणाऱ्या प्रचंड पावसामुळे बसॉल्ट खडकातील क्षार वाहून जातात, त्यामुळे जांभा दगडाची निर्मिती झालेली आहे. क्षार वाहून गेल्यामुळे हा दगड सच्छिद्र बनलेला असतो. आपण केलेल्या आवाजामुळे पाण्यात कंपन निर्माण होतात. या कंपनामुळे सच्छिद्र दगडातील पोकळीत अडकलेली हवा बाहेर येते आणि आपल्याला बुडबुडय़ांच्या स्वरूपात पाहायला मिळते. निसर्गातील हा चमत्कार पाहाण्यासाठी बोंबडेश्वरला एकदा तरी जायला पाहिजे.
अमित सामंत amitssam9@gmail.com