महाराष्ट्रात एकूण सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यातील पाच विदर्भात आहेत. ‘स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया’च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या २०१० मध्ये १६९ होती. ती वाढून आता १९० इतकी झाली. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांत बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांचा समावेश आहे. आज बोर व्याघ्र प्रकल्पातील रानवाटांवरचा आनंद घेऊ या.
बोर अभयारण्याला ऑगस्ट २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. भारतातील एक नवीन आणि सर्वात लहान असा हा व्याघ्र प्रकल्प आहे. आकाराने लहान असला तरी जैवविविधतेने संपन्न आणि वन्यप्राण्यांचा उत्तम अधिवास असलेले हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. २७ नोव्हेंबर १९७० रोजी बोरला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. बोर व्याघ्र प्रकल्प हा नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेस आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर आहे. याशिवाय ६१.१० चौ.किमी. जलाशयाचा यात समावेश करण्यात आला आहे. बोर हे सातपुडा-मकल येथील संपन्न जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. हे सातपुडा पूर्व-पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर सीमेपसून सुरू होऊन कान्हा येथील मकल टेकडीला मिळते. वन्यप्राण्यांची शिकार होऊ नये आणि जैवविविधता टिकून राहावी तसेच ती संवíधत व्हावी यासाठी १९७० मध्ये या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. कान्हा आणि पेंच अभयारण्याप्रमाणेच येथे तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. २०१४ च्या व्याघ्रगणनेनुसार येथे ४ ते ५ वाघांसह त्यांच्या बछडय़ांचा अधिवास आहे. जुन्या बोर अभयारण्याचे क्षेत्र ६१.१०० चौ. किमी. आहे. नवीन बोर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र ६०.६९ चौ.किमी. आहे. नवीन बोर विस्तारित वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र १६.३१ चौ.किमी. आहे. जंगलाची सलगता हे या अभयारण्याचे वैशिष्टय़ असून ही सलगताच वन्यप्राण्यांच्या- विशेषत: वाघांच्या- संवर्धनात महत्त्वाची ठरत आहे.
कसे जाल?
हवाईमार्गे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथून
८० किमी.
रेल्वे : वर्धा रेल्वे स्थानकाहून ३५ किमी.
रस्ता : हिंगणी गावापासून पाच किमी.
डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com