निसर्गरम्य ओडिशामध्ये विविध देवदेवता आणि त्यांची मंदिरे मोठय़ा प्रमाणावर आहेत. इथल्या देवता आणि त्यांच्या उपासना पद्धतींवर आदिवासी परंपरेची मोठीच छाप पडलेली दिसते. अत्यंत आगळ्यावेगळ्या देवता आणि उपासनापद्धती या भूमीमध्ये रुजलेल्या दिसतात. हिरापूरचे ६४ योगिनी मंदिर हे त्यातलेच एक. भुवनेश्वरपासून फक्त २० किलोमीटरवर असलेले हे मंदिर भारतातील अगदी हाताच्या बोटांवर मोजता येईल अशा मंदिरांपकी एक आगळेवेगळे मंदिर आहे.
योगिनी या शाक्त संप्रदायाच्या देवता. त्यांना आवरण देवता असेसुद्धा म्हटले जाते. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहे. योगिनीतंत्रात त्यांची उत्पती, त्यांची शक्ती आणि त्यांच्या कथा दिलेल्या आहेत. दैत्य निर्दालनासाठी दुग्रेने ६४ रूपे घेतली आणि त्यांच्या सर्वाच्या शक्तीनिशी दैत्याशी युद्ध केले आणि त्यात त्या दैत्याचा पराभव केला.
हिरापूर येथील ६४ योगिनी मंदिर वर्तुळाकार आहे. हे मंदिर इ.स.च्या ९ व्या शतकात ब्रह्म राजवटीमधील हिरादेवीने बांधल्याचे सांगतात. उघडय़ा आकाशाखाली ६४ कोनाडय़ांच्या रूपात असलेले हे मंदिर निश्चितच अत्यंत वेगळे आहे. वालुकाश्मापासून तयार केलेले हे वर्तुळाकार मंदिर खास वैशिष्टय़पूर्ण आहे. त्याच्या आतील बाजूला कोनाडे असून प्रत्येक कोनाडय़ामध्ये काळ्या रंगाच्या ग्रॅनाईट दगडात घडवलेल्या एकेका देवीची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली दिसते. मंदिराच्या
मध्यवर्ती मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या कालीदेवीची मूर्ती आहे. बुद्धीच्या मनावरील विजयाचे हे प्रतीक समजले जाते. तिथेच एक मध्यवर्ती चौथरा असून त्याला चंडी मंडप असे म्हणतात. ओडिशा पर्यटनात हे ठिकाण अगदी न चुकता पाहावे असेच आहे.
ashutosh.treks@gmail.com