निसर्गरम्य कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्य़ातील सागर या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त ८ किलोमीटवर असलेले केळदी हे एक टुमदार गाव. विजयनगर साम्राज्याच्या अस्तानंतर उदयाला आलेल्या नायक राजवंशाची ही राजधानी. तिथे असलेले रामेश्वर आणि वीरभद्र मंदिर ही सुंदर शिवालये आणि त्याच्याशी मराठी अस्मितेशी जोडलेला प्रसंग मोठा रोमांचक आहे. होयसळ आणि द्राविड अशा मिश्र शैलीमध्ये बांधलेले हे मंदिर अत्यंत देखणे आहे. प्रदक्षिणापथ असलेले गर्भगृह, महामंडप आणि मुखमंडप अशी या मंदिराची रचना. महामंडपाच्या पूर्व आणि पश्चिम िभती या सुंदर अशा शिल्पांनी सजवलेल्या आहेत. याला लागूनच असलेल्या वीरभद्र मंदिराच्या छतावर दुर्मीळ अशा गंडभेरुंडाचे अतिशय देखणे शिल्प कोरलेले आहे. गंडभेरुंड हा दोन तोंडे आणि एक धड असलेला एक काल्पनिक पक्षी. त्याशिवाय या मंदिरात बोकडाचे तोंड असलेल्या दक्ष राजाची हात जोडून उभी असलेली सुरेख मूर्ती पाहायला मिळते. अतिशय शांत आणि रम्य असलेल्या या मंदिराच्या शेजारीच भव्य असा लाकडी रथ ठेवलेला आहे. त्या रथावरसुद्धा अतिशय बारीक कलाकुसर केलेली दिसते. मंदिराच्या शेजारी राज्य पुरातत्त्व विभागाचे वस्तुसंग्रहालय असून, परिसरात मिळालेली विविध दुर्मीळ शिल्पे इथे जतन करून ठेवलेली दिसतात.
कुंदापूरचा व्यापारी सिद्दप्पा शेट्टी याची मुलगी चिन्नम्मा हिचा विवाह सन १६६७ मध्ये केळदीचा राजा सोमेश्वर नायकाशी झाला. सन १६७७ साली सोमेश्वर नायकाच्या मृत्यूनंतर अतिशय शूर असलेल्या या राणी चिन्नम्माने २६ वष्रे केळदीचा राज्यकारभार मोठय़ा हिमतीने चालवला. त्या काळात तिने औरंगजेबाच्या मुघल सन्याशी लढाया करून त्यांना पराभूत केले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेली. छत्रपती राजाराम महाराज जिंजीकडे निघून जाण्यात यशस्वी झाले. जिंजीला जाताना त्यांच्या पाठलागावर औरंगजेबाची फौज होतीच. त्या वेळी राजारामाने केळदीच्या राणीकडे आश्रय मागितला. विजयनगर साम्राज्याच्या सेनापतीचा वंशज असलेला तिम्मण्णा नायक हा राणीचा मुख्य प्रधान होता. त्याच्याशी सल्लामसलत करून राणी चिन्नम्मा हिने मोठय़ा धाडसाने राजाराम महाराजांना आश्रय दिला. लगोलग मुघलांची फौज केळदीवर चालून आलीच. परंतु राणी चिन्नम्माने चालून आलेल्या मुघल सन्याशी लढाई करून त्यांचा पराभव तर केलाच, पण मुघलांना तिच्याशी तह करायला भाग पाडले. केळदी चिन्नम्मामुळे पुढे राजाराम महाराजांचा जिंजीपर्यंतचा प्रवास निर्धोक झाला. रामेश्वर मंदिराच्या समोर एका जोत्यावर एक दगडी स्तंभ उभा असून त्या स्तंभाच्या पायथ्याशी काही मानवी आकृती कोरलेल्या आहेत. त्यातली एक आहे राणी चिन्नम्मा आणि दुसरे आहेत राजाराम महाराज. खास मराठी पगडीमुळे राजाराम महाराज ओळखता येतात. स्वराज्याच्या छत्रपतींच्या पाठीशी राणी चिन्नम्मा मोठय़ा धाडसाने उभी राहिल्याचे ते एक प्रतीक आहे. राणी चिन्नम्मा ही अतिशय धार्मिक आणि दानशूर म्हणून प्रसिद्ध होती. राणी आब्बक्का, ओणके ओबव्वा आणि कित्तूरची राणी चिन्नम्मा या कर्नाटकातील धाडसी वीरांगनांच्या पंक्तीमध्ये केळदी चिन्नम्माचे स्थान खूप वरचे आहे. मिरजान इथला किल्लादेखील याच राणीने बांधला. कर्नाटकच्या भेटीत मराठी अस्मितेचे रक्षण करणाऱ्या केळदी या ठिकाणाला भेट देऊन तिथे असलेले देखणे मंदिर आणि राजाराम महाराजांचा प्रसंग सांगणारा स्तंभ आवर्जून पाहायला हवा.
ashutosh.treks@gmail.com