डोंगर भटकंतीमध्ये सुरक्षेसाठी अनेक साधनांची गरज असते. त्यापैकी काही मूलभूत साधनांची माहिती आपण मागच्या लेखांमध्येही घेतली. आता या लेखात शिरस्त्राण (हेल्मेट) आणि हार्नेस या दोन अत्यंत महत्त्वाच्या साधनांबद्दल चर्चा करूया.
प्रस्तरारोहणात वरून दगड पडून डोक्यावर आदळणे, आरोहण करताना प्रस्तरावर चुकून डोके आपटले जाणे किंवा प्रस्तरारोहक कडय़ावरून पडल्यास डोक्यावर आपटण्याचा धोका संभवतो. अशा वेळी शिरस्त्राण हे सर्वात महत्त्वाचे असते. हल्ली आपल्याकडे दुचाकीवरही शिरस्त्राण अत्यावश्यक केले आहे, तो नियम न पाळण्याकडे आपला कलअसतो. पण येथे तसे करू नये. खास प्रस्तरारोहणासाठी तयार केलेली शिरस्त्राणे वापरावीत. ती वजनाने हलकी व टिकाऊ हवीत. हवा खेळती राहण्याची सोय हवी. आघात झेलण्यासाठी आतमध्ये मऊ पट्टय़ा असाव्यात. हनुवटीला नीट बसण्यासाठी सोईस्कर पट्टय़ा हव्यात. हेड टॉर्चसाठी क्लिप हवी.
हार्नेस हा असाच दुसरा एक महत्त्वाचा घटक. ‘हान्रेस’ म्हणजे छाती, कंबर व मांडय़ांभोवती परिधान करण्याचा नायलॉनच्या शिवलेल्या मजबूत पट्टयांचा संच. जो बक्कलच्या साहाय्याने बांधता येतो. आरोहकाच्या सुरक्षेसाठी ज्यात कॅरॅबिनरच्या मदतीने दोर बांधता येतो व नेतृत्व चढाई करणारा आरोहक पडल्यास त्याला जास्त पडण्यापासून सुरक्षा दोर देणाऱ्या आरोहकास अटकाव करणे शक्य होते. वेगवेगळ्या वापरासाठी हान्रेस बनवले जातात. उदा: औद्योगिक वापरासाठी, केव्हिंगसाठी, रेस्क्यूसाठी, प्रस्तरारोहणासाठी इ. काही हार्नेसमध्ये आकार कमी-जास्त करण्याची सोय असते, तर काहींमध्ये ही सोय नसते. हार्नेसचे तीन मूलभूत प्रकार आहेत.
सीट हान्रेस – सीट हान्रेस हे कंबर व मांडय़ांभोवती परिधान करता येते. यातील काही हान्रेसमध्ये बक्कल व क्लिपद्वारे आकार कमी-जास्त करण्याची सोय असते. हे हान्रेस मुख्यत प्रस्तरारोहक वापरतात. या हान्रेसचा उपयोग प्रशिक्षण शिबिरांमध्येही केला जातो.
बॉडी हान्रेस – सीट हान्रेसमध्ये कंबर व मांडय़ांभोवती पट्टया असतात, तर बॉडी हान्रेसमध्ये कंबर व मांडय़ांबरोबरच खांद्यावरून परिधान करायच्या पट्टयाही असतात. त्यामुळे पूर्ण शरीर या हान्रेसमध्ये समाविष्ट होते. याचा फायदा असा की शरीराचे वजन मांडय़ा, कंबर व खांद्यांवर विभागले जाते. या हान्रेसचा वापर गुंफा शोध मोहिमांत, औद्योगिक वापर, रेस्क्यू मोहिमा व प्रशिक्षण शिबिरात जास्त केला जातो.
चेस्ट हान्रेस – चेस्ट हान्रेस हे छातीसाठी वापरले जातात. या हान्रेसचा स्वतंत्रपणे वापर होत नाही तर त्यांचा सीट हान्रेसबरोबर संयुक्त वापर केला जातो. सीट व चेस्ट हान्रेस जोडून बॉडी हान्रेस तयार केला जातो.
अशोक पवार-पाटील – ashok19patil65@gmail.com

Story img Loader