हिवाळा
हिवाळयात सह्य़ाद्री डोंगररांगेत चांगलीच थंडी जाणवते. अशा वातावरणात ट्रेक करताना शरीराला उब मिळेल असे कपडे वापरावेत. हिमालयात ट्रेक करणार असल्यास थंडीपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.
कानटोपी : शरीरातील सर्वात जास्त उष्णता डोक्यावाटे निघून जाते. त्यामुळे हिवाळ्यात जेव्हा गरज लागेल तेव्हा कानटोपीचा वापर करता येईल. कानटोपी नसेल तर सामान्य टोपी वापरता येईल. हिमालयात ट्रेक करताना नेहमीच डोक्यावर टोपी असावी.
मोजे : ट्रेक करताना मोजाचा वापर करावा. त्यामुळे पायाला चांगली पकड मिळते. तसेच चालताना एकप्रकारे पायांना कुशन मिळते. हिवाळ्यात झोपताना वुलन मोजे घालावेत.
थर्मल वेअर : थर्मल वेअरचे टी शर्ट व पँट घातल्यास थंडीपासून बचाव होतो. रात्री झोपताना याचा वापर करता येईल.
फ्लीस (Fleece) मटेरिअल : फ्लीस हे पॉलिएस्टर सिंथेटिक वूलपासून बनविले जाते. ते उबदार असतेच; शिवाय ते वजनाने हलके व टिकाऊ असते. हल्ली फ्लीस मटेरिअलची जॅकेट्स उपलब्ध आहेत.
लेअर सिस्टीम: ज्या वेळी गरम कपडे जास्त उपलब्ध नसतील त्या वेळी लेअर सिस्टीमचा वापर करावा. एकावर एक कपडय़ांचे थर थंडी कमी करतात. हिमालयात या पद्धतीचा चांगला उपयोग होतो.

उन्हाळा
टोपी : उन्हापासून डोके व चेहरा यांचे संरक्षण करण्यासाठी टोपी वापरावी.
सूती टी-शर्ट : कपडे सूती असावेत. त्यामुळे घाम शोषून घेतला जातो आणि गरमही कमी होते. आता सिंथेटिक मटेरिअलमध्येही कॉटन टी-शर्टची वैशिष्टय़े असलेले कपडे उपलब्ध आहेत.
गॉगल : तीव्र सूर्यकिरणांपासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी गॉगल वापरावा. अतिनील किरणे त्वचा कालवंडण्यास व डोळ्यांना इजा पोहोचण्यास कारणीभूत ठरतात. त्यापासून डोळ्यांचा बचाव करणारे चांगल्या दर्जाचे गॉगल वापरावेत. तसेच त्वचा काळवंडू नये, यासाठी १५ एसपीएफची सनक्रिम लावावी. हिमालयात ट्रेक करताना गॉगल आणि क्रिमचा वापर आवश्यक असतो.

पावसाळा
रेनकोट : कपडे, सॅक भिजू नये यासाठी रेनकोट किंवा पाँचोचा वापर करावा. रेनकोट किंवा पाँचोचा आकार मोठा असावा. आत तयार होणारे बाष्प बाहेर निघून जाण्याची त्यात रचना असावी.
पावसाळी टोपी : पावसात भिजल्यामुळे व विशेषत: डोके सतत ओले राहिल्यामुळे सर्दीचा त्रास होऊ शकतो. यासाठी पावसाळी टोपी किंवा ती नसल्यास नेहमीच्या टोपीचा वापर करता येईल.
सिंथेटिक कपडे : पावसाळयात कॉटन
टी-शर्ट व ट्रॅक पँटच्या जागेवर सिंथेटिक कपडय़ांचा वापर करावा. ते हलके असतात व लवकर वाळतात. पावसाळ्यात कपडे प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावेत. तसेच एखादी अतिरिक्त कपडय़ांची जोडी ठेवावी.
अशोक पवार-पाटील ashok19patil65@gmail.com

Story img Loader