पश्चिम बंगालमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेले दार्जििलग शहर ब्रिटीशांचे उन्हाळ्यातील आवडीचे वसतीस्थान होते. हिमालयातील उंच दिमाखदार कांचनजंगा शिखराच्या पाश्र्वभूमीवर पायऱ्यापायऱ्यांच्या रचनेत असणारे चहाचे मळे, अचानक समोरुन येणारे धुके, शीळ घालत मनमोहकपणे वळणे घेत जाणारी वाफेच्या इंजिनावर चालणारी हिमालयन टॉय ट्रेन हे दार्जिलिंगचे खास आकर्षण. साधारणपणे बागडोगरा व जलपायगुडीहून दार्जििलगला पोहोचण्यास तीन तास, तर टॉय ट्रेनने सात तास लागतात. धुक्यातील हे शहर एका सुंदरशा निसर्गचित्राचाच एक भाग वाटतो. जापनीज मंदिर आणि पीसपगोडा, त्यातील सकाळ- संध्याकाळची प्रार्थना अनुभवण्यासारखी आहे. तेथील कोरोनेशन ब्रीज त्स्योम्गो लेक प्रेक्षणीय आहे. कािलगपोंग येथे गुरुमारा अभयारण्य आहे. टायगर हिल असेच एक प्रसिद्ध ठिकाण. पहाटे सूर्योदयापूर्वी टायगर हिलवर पोहोचून सूर्याची सोनेरी किरणे अलगदपणे कांचनजंगावर पसरताना बघणे खूप रोमहर्षक असते. अर्थात त्यासाठी वातवरण स्वच्छ असायला हवे. प्रतिष्ठित अशी आणि भारतातील पहिली गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊटेनिअिरग देखील येथेच आहे. पद्मजा झूओलोजीकल पार्कमध्ये स्नो लेपर्ड आणि रेड पांडा बघायला मिळतो. सध्या दार्जिलिंग तसे गजबजलेले असते. पण जवळच काही गावांमध्ये भटकंतीचे पर्यायदेखील आहेत. कािलगपोंग शहरात एक दिवसाची सहल करता येते. दार्जििलगलगतच्या तीनचूले गावात सुद्धा राहण्याची सोय आहे. अगदी साध्या छोटय़ाशा गावात चहाच्या मळ्यातून फेरफटका मारत निसर्ग अनुभवता येतो. मॉल रोड किंवा चाररस्ता म्हणजे तेथली मध्यवर्ती जागा, जी सतत गजबजलेली असते. रात्री उशिरा देखील मॉल रोडवरून एकटे फिरण्यास काही भिती नाही. अनेक खाद्यपदार्थाचे दुकानं तिथे असतात. खरेदीसाठी खास करून दार्जििलग चहा पिण्यासाठी इथे अनेक दुकाने आहेत. चार रस्त्यावर मोठय़ा पडद्यावर संगीत चालू असते. फिरायला घोडे, बसायला बाके, ऐकायला संगीत असे एकूणच धमाल मजेचे वातावरण तिथे असते. कािलगपोंगला जाताना लावा नावाचे छोटे गाव लागते. अगदी कमी वस्ती, जवळच एखादे चर्च, बाजूची घनदाट झाडी, त्यातून दिसणारी हिमशिखरे असे ज्याचे वर्णन करता येईल असे अत्यंत साधे आणि अगत्यशील लावा सगळ्यांनाच आवडून जाते. छोटे ट्रेक्स आणि निसर्गभटकंती तिथे करता येतात. दार्जििलग कौटुंबिक सहलीसाठी हिवाळ्यात जाण्याचे उत्तम ठिकाण.
- जवळचा विमानतळ बागडोगरा
- जवळचे रेल्वे स्टेशन न्यू जलपायगुडी
sonalischitale@gmail.com