मराठवाडय़ात ऐन पावसाळ्यात मुद्दाम जावे अशी काही ठिकाणे आहेत. त्यात अंबेजोगाई इथे असलेली मुकुंदराज समाधी हे ठिकाण होय. बीड जिल्ह्यतील अंबेजोगाई इथली योगेश्वरी देवी ही चित्पावनांची कुलदेवता. देवी मंदिराखेरीज कोरीव लेणी, दासोपंतांची समाधी, तसेच गावात असलेले अनेक प्राचीन शिलालेख या गोष्टी आवर्जून पाहाव्यात अशा. कवी मुकुंदराजांची समाधी इथूनच दोन किलोमीटरवर आहे. बाराव्या शतकात होऊन गेलेल्या या नाथसंप्रदायी कवीने ‘विवेकसिंधू’ हा ओव्यांचा संग्रह लिहिला. मराठीमधील हे आद्यकवी समजले जातात. त्यांचा जन्म विदर्भात पौनी इथे झाल्याचे सांगितले जाते. त्यांची समाधी अंबेजोगाई इथे आहे. बालाघाट डोंगररांगेच्या उतारावर असलेले हे ठिकाण डोंगराच्या ऐन पोटात एका गुहेमध्ये असल्यामुळे काही पायऱ्या उतरून जावे लागते. अतिशय शांत, रम्य असा हा परिसर आहे. या समाधीच्या शेजारीच जयंती नदीवरील धबधबा पावसाळ्यात अविरत कोसळत असतो. या ठिकाणचं दुसरं वैशिष्टय़ म्हणजे परिसरात मोर मोठय़ा संख्येने पाहायला मिळतात. रिमझिम बरसणारा पाऊस, कोसळणारा धबधबा आणि मोरांचे नृत्य! यापेक्षा अजून सुंदर दुसरं काय असू शकेल. मराठवाडय़ात इतर वेळी असणारा रूक्षपणा ऐन पावसाळ्यात कुठच्या कुठे निघून गेलेला असतो. धार्मिक पर्यटनासोबत ही निसर्गाची उधळण पाहायला अंबेजोगाईला जायलाच हवे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा