पश्चिम रेल्वे मार्गावरील वसई रोड स्थानकापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचोटी गावानजीकचा चिंचोटी धबधबा हे पावसाळी भटकंतीचे मुंबईकरांचे पहिल्या पसंतीचे ठिकाण. बस आणि रिक्षाच्या सहज उपलब्धतेमुळे चिंचोटीला पोहोचणे सुकर झाले आहे. गावातूनच ओढय़ाच्या कडेकडेने जाणारी ठळक पायवाट तास-दीड तासात आपल्याला धबधब्याशी घेऊन जाते. वाटेतील जंगलातील हिरवाई पाहून मन उल्हासित झाल्याशिवाय राहात नाही. धबधब्याच्या पोटाशी असलेल्या डोहात पोहण्याची मजा काही औरच. पण जुलअखेपर्यंत येथील कातळावर शेवाळ साचल्याने सगळा परिसर निसरडा होतो. त्यामुळे येथे वावरताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच अधिक पाऊस झाल्यास पाण्याचा जोर वाढून प्रवाह धोकादायक होतो. अशा वेळी डोहात उतरण्याचा मोह टाळलेलाच बरा. धबधब्याच्या वरून जाणारी एक पायवाट जंगल तुडवीत तुंगारेश्वरकडे घेऊन जाते. ट्रेकिंगचा अनुभव असलेल्यांनी हा छोटासा ट्रेक आजमवायला काहीच हरकत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा