ब्रह्मपुराणामध्ये उल्लेख असलेल्या वृद्धा नदीकाठी वसले आहे वृद्धेश्वर. नगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो. अत्यंत रम्य ठिकाण असलेल्या या गावी एक पुरातन शिव मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे गर्भगिरी डोंगर आहे. पार्वतीने इथे तपश्चर्या केल्यावर सर्व देवांना भोजन दिले. त्या प्रसंगी शंकर भगवान एका म्हाताऱ्याचे रूप घेऊन आले आणि त्यांनी सर्व देवतांना भोजन वाढले. त्यामुळे इथला देव हा म्हातारदेव अशी सुंदर आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. तसेच नवनाथ भक्तीसारामध्ये म्हातारदेव असा उल्लेख आहे.
तीर्थक्षेत्र आले की त्याबद्दल दंतकथासुद्धा आल्याच. वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिविपडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणून हा वृद्धेश्वर. शिविपडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा. मंदिराचा पेशवेकाळात जीर्णोद्धार झाला असावा. पश्चिमाभिमुख असलेल्या मंदिराला सूर्यप्रकाश थेट पिंडीवर पाडण्यासाठी तीन मोठे झरोके ठेवलेले आहेत. अतिशय रम्य परिसरामध्ये एक बारव, ज्ञानेश्वर मंदिर, कपिलमुनी मंदिर अशी छोटी देवळे इथे आहेत. मंदिरात एक पंचधातूची घंटा आहे. मूळच्या घंटेची ही प्रतिकृती असून मूळ घंटेवरील शिलालेख या घंटेवरही कोरला आहे. त्यानुसार ही घंटा बाराव्या शतकातील कोणा प्राणदेवराजाने मंदिराला दान दिल्याचा उल्लेख दिसतो. श्री शंकरमहाराज या सत्पुरुषांचे वास्तव्य या ठिकाणी झाले होते असे ग्रामस्थ सांगतात. नगरवरून पाथर्डीकडे जाताना मुद्दाम वाट वाकडी करून या सुंदर वृद्धेश्वरला भेट द्यायलाच हवी.
आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 15th Jun 2016 रोजी प्रकाशित
आडवाटेवरची वारसास्थळे : वृद्धेश्वरचा म्हातारदेव
नगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो.
Written by आशुतोष बापट

First published on: 15-06-2016 at 04:17 IST
मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous temples in ahmednagar