मागील लेखात सॅकची बाह्य़ रचना जाणून घेतली. आता एकंदरीत अंतर्रचना आणि सामान भरण्याची पद्धत जाणून घेऊ या. सुरुवातीला सॅक तयार करण्यासाठी ‘कॅनव्हास’ कपडय़ाचा वापर केला जात असे. तो लवकर खराब व्हायचा. तसेच भिजल्यानंतर जड होत असे. पूर्वी नायलॉन कपडय़ाच्या सॅक उपलब्ध नसल्यामुळे चक्क कॅनव्हासची खाकी दफ्तरेदेखील वापरली जात होती. आता उच्च दर्जा असलेला, लवकर खराब न होणारा, जलरोधक व वजनाने हलका असणारा नायलॉनचा कपडा वापरला जातो. अर्थात सॅक कितीही चांगली असली तरी त्यात सामान भरण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र माहीत हवे. कशाही पद्धतीने सामान भरल्यामुळे सॅकमधील वजनाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तयार झालेला केंद्रिबदू योग्य ठिकाणी न आल्यास आतील वजन आरोहकाला मागे किंवा एका बाजूला खेचेल व त्याचा तोल जाईल किंवा आरोहकाच्या खांद्यांवर जास्त ताण पडल्यामुळे ते दुखू लागतील.
वजनदार सामान हे सॅकमध्ये पाठीच्या जवळ व मध्यभागी ठेवावे, जेणेकरून सॅकमधील वजनाचा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तयार झालेला केंद्रिबदू माकडहाडाभोवती व पायावर येईल. इतर सामान सॅकमध्ये भरताना त्याचे वजन समप्रमाणात विभागले जाईल, असे भरावे. गॉगल, पाण्याची बाटली, नकाशे, टोपी, नोंदवही यांसारखे वारंवार व लगेच लागणारे सामान बाजूच्या कप्प्यांमध्ये किंवा शीर्ष कप्प्यामध्ये ठेवावेत. हल्लीच्या सॅक जलरोधक कपडय़ांपासून तयार केल्या जात असल्या तरी शिलाईमधून, झिपमधून पाणी आत जाते. त्यामुळे पावसाळी भटकंतीत सर्व सामान प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून ते सॅकमध्ये भरावे. कॅरिमॅट सॅकच्या आत ठेवावी किंवा सॅकच्या मागच्या बाजूला विशेष कप्पा शिवून घ्यावा. कॅरिमॅट निवडताना तिची घडी होईल, हे पाहावे. कडक कॅरिमॅट घेतल्यास तिची घडी करता येत नाही मग तिची गुंडाळी करावी लागते. अशी गुंडाळी आरोहक सॅकच्या वर किंवा सॅकच्या बाहेर मागे बांधतात. प्रवासात गाडीमध्ये, तर पदभ्रमणाच्या वेळी झाडांमध्ये ती अडकत राहते. त्यामुळे तोल जाण्याची भीतीही असते.

सॅकचे कप्पे
मुख्य कप्पा – सॅकचा मधला कप्पा हा मुख्य कप्पा म्हणून वापरला जातो. वजनाने जड तसेच मोठे आकारमान असलेले सामान त्यात ठेवले जाते. शिधा, स्टोव्ह किंवा छोटा गॅस, जास्तीचे कपडे, तंबू, प्रथमोपचार पेटी, प्रस्तरारोहण असेल तर ती साधनसामग्री, भांडी, वापरत असल्यास विशिष्ट हायड्रेशन सिस्टीम.
खालचा कप्पा – खालच्या कप्प्यात स्लिपिंग बॅग व कपडे ठेवले जातात. हल्लीच्या अनेक सॅकमध्ये या भागाला झिप लावून स्वतंत्ररीत्या उघडण्याची सोय केलेली असते.
टॉप पाऊच – टॉप पाऊच म्हणजे सॅकचा डोक्याकडील कप्पा. वरचेवर लागणाऱ्या वस्तू सहज काढता व ठेवता याव्यात, अशी या कप्प्याची रचना असते. टॉप पाऊचचा विस्तार करण्याची सोय असायला हवी. सन क्रिम, हेडलॅम्प, छोटा कॅमेरा, कॅप, गॉगल, स्वीस नाइफ आणि चिक्की व तत्सम त्वरित एनर्जी देणारे खाद्यपदार्थ त्यात ठेवता येतात.
वेस्ट बेल्ट – सॅक कंबरेवर अडकविण्यासाठी वेस्ट बेल्टचा वापर केला जातो. वेस्ट बेल्ट योग्य त्या लांबीचा, योग्य ती रचना व पॅडिंग असलेला हवा.
शोल्डर बेल्ट – शोल्डर बेल्टचा वापर सॅक खांद्यावर अडकविण्यासाठी केला जातो. हे बेल्ट योग्य त्या अंतरावर व योग्यरीत्या शिवलेले असावेत. त्यांना चांगले पॅडिंग व पाठीच्या लांबीप्रमाणे (Torso Length) त्यांची लांबी कमी-जास्त करण्याची सोय असावी.
चेस्ट बेल्ट – चेस्ट बेल्टचा वापर सॅकमधील वजनाचा भार काही प्रमाणात छातीवर विभागला जावा यासाठी केला जातो. तसेच खांद्यावरील बेल्टना शोल्डर जॉइंट्सपासून योग्य अंतरावर ठेवण्यास त्यांचा उपयोग होतो.
बाजूचे कप्पे – बाजूच्या कप्प्यांचा वापर पाण्याच्या बाटल्या व वरचेवर लागणारे सामान ठेवण्यासाठी केला जातो.
अपर लोड स्टॅबिलायझर बेल्ट – अपर लोड स्टॅबिलायझर बेल्टचा उपयोग आपली पाठ आणि सॅक यांत योग्य ते अंतर कमी-जास्त करण्यासाठी केला जातो. हे बेल्ट खेचून अंतर कमी-जास्त केले जाते.
लोअर लोड स्टॅबिलायझर बेल्ट – चढताना किंवा सपाट जमिनीवरून चालताना खांद्यावरील किंवा कंबरेवरील वजनाचा भार गरजेप्रमाणे शिफ्ट करण्यासाठी या बेल्टचा वापर केला जातो. त्यासाठी हे बेल्ट खेचून किंवा सैल करून अ‍ॅडजस्टमेंट केली जाते.
ashok19patil65@gmail.com

Story img Loader