मागील लेखात सॅकची बाह्य़ रचना जाणून घेतली. आता एकंदरीत अंतर्रचना आणि सामान भरण्याची पद्धत जाणून घेऊ या. सुरुवातीला सॅक तयार करण्यासाठी ‘कॅनव्हास’ कपडय़ाचा वापर केला जात असे. तो लवकर खराब व्हायचा. तसेच भिजल्यानंतर जड होत असे. पूर्वी नायलॉन कपडय़ाच्या सॅक उपलब्ध नसल्यामुळे चक्क कॅनव्हासची खाकी दफ्तरेदेखील वापरली जात होती. आता उच्च दर्जा असलेला, लवकर खराब न होणारा, जलरोधक व वजनाने हलका असणारा नायलॉनचा कपडा वापरला जातो. अर्थात सॅक कितीही चांगली असली तरी त्यात सामान भरण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र माहीत हवे. कशाही पद्धतीने सामान भरल्यामुळे सॅकमधील वजनाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तयार झालेला केंद्रिबदू योग्य ठिकाणी न आल्यास आतील वजन आरोहकाला मागे किंवा एका बाजूला खेचेल व त्याचा तोल जाईल किंवा आरोहकाच्या खांद्यांवर जास्त ताण पडल्यामुळे ते दुखू लागतील.
वजनदार सामान हे सॅकमध्ये पाठीच्या जवळ व मध्यभागी ठेवावे, जेणेकरून सॅकमधील वजनाचा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तयार झालेला केंद्रिबदू माकडहाडाभोवती व पायावर येईल. इतर सामान सॅकमध्ये भरताना त्याचे वजन समप्रमाणात विभागले जाईल, असे भरावे. गॉगल, पाण्याची बाटली, नकाशे, टोपी, नोंदवही यांसारखे वारंवार व लगेच लागणारे सामान बाजूच्या कप्प्यांमध्ये किंवा शीर्ष कप्प्यामध्ये ठेवावेत. हल्लीच्या सॅक जलरोधक कपडय़ांपासून तयार केल्या जात असल्या तरी शिलाईमधून, झिपमधून पाणी आत जाते. त्यामुळे पावसाळी भटकंतीत सर्व सामान प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून ते सॅकमध्ये भरावे. कॅरिमॅट सॅकच्या आत ठेवावी किंवा सॅकच्या मागच्या बाजूला विशेष कप्पा शिवून घ्यावा. कॅरिमॅट निवडताना तिची घडी होईल, हे पाहावे. कडक कॅरिमॅट घेतल्यास तिची घडी करता येत नाही मग तिची गुंडाळी करावी लागते. अशी गुंडाळी आरोहक सॅकच्या वर किंवा सॅकच्या बाहेर मागे बांधतात. प्रवासात गाडीमध्ये, तर पदभ्रमणाच्या वेळी झाडांमध्ये ती अडकत राहते. त्यामुळे तोल जाण्याची भीतीही असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा