सुरतकडून नाशिककडे येणाऱ्या मार्गावर आपले स्वागत करतो हातगड. गुजरातमधील प्रसिद्ध हिलस्टेशन सापुताराकडे जाताना महाराष्ट्राच्या सीमेवर सापुतारापेक्षाही उंचीचा हातगड आहे. सह्य़ाद्रीतल्या सातमाळा रांगेत काहीसा सुटावलेला हा किल्ला. हे काही संरक्षित जंगल नाही. पण येथे स्थानिक वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काही उपक्रम राबवले जातात आणि पर्यायाने हा परिसर आता पर्यटनाच्या नकाशावर हळूहळू आपले स्थान मिळवत आहे. सुरगाणा तालुक्यातील हे छोटेसे गाव तसे आदिवासीच म्हणावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पायथ्याच्या हातगडवाडीतून चढण्यास सोपा आणि आटोपशीर चढणीचा असा हा किल्ला आहे. १६ व्या शतकात बुरहान निजामशाहने जिंकून घेतलेल्या ५८ किल्ल्यांच्या यादीत याचा हाटका असा उल्लेख असल्याची माहिती मिळते. पेशवाईत हा किल्ला मराठय़ांकडे होता. हातगडवाडी हे गाव तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले गाव आहे. निसर्गसंपन्न अशा या गावात पेशवेकालीन घोडय़ाच्या पागा तसेच पाण्याचे कुंड पाहावयास मिळतात. या गावातील वनपर्यटनाला चालना मिळण्यासाठी येथे संयुक्त वन व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. येथे वर्षभर पर्यटकांची रेलचेल असते, त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. पर्यटकांसाठी निवारा शेड, माहिती केंद्र, रोपवने, विविध पॉइंट मनोरे अशी अनेक विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. हातगड किल्ल्यावर जाण्यासाठी हातगडवाडीतून गाडीरस्तादेखील तयार करण्यात आला आहे. वर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही उपलब्ध आहे. गाडीरस्ता जिथे संपतो तेथून वर जाण्यासाठी अगदी पंधरा मिनिटांचा कालावधी पुरेसा आहे. प्रवेशद्वारावरील शिल्प आणि शिलालेख लक्ष वेधून घेतात. प्रवेशद्वाराच्या तटबंदीच्या बाहेर छोटा सपाट भाग आहे. राणीचा बाग म्हणून तो स्थानिकांमध्ये प्रसिद्ध आहे. गंगा-जमुना या बारमाही पाण्याच्या टाक्यांबरोबरच इथे अनेक इतर पाण्याच्या टाक्याही आहेत. धान्य साठविण्याचा एकांडा बुरुज, स्वयंपाकाची वास्तू आणि दारूगोळ्याचे कोठार ही माथ्यावरच आहे. किल्लेदाराचे घर, पेशवेकालीन ध्वजस्तंभ अशा अनेक प्राचीन वास्तू आणि वस्तू तत्कालीन काळाचे दर्शन घडवतात.

गडमाथ्यावर सहजतने फिरण्यासाठी वन विभागातर्फे दगडी पायऱ्यांचा मार्ग बांधला आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य न्याहाळता येते. सातमाळा रांगेचे आणि साल्हेर या सर्वोच्च गिरिदुर्गाचे दर्शन होते. सापुतारापेक्षा उंच असल्यामुळे सापुताराचा मोहक नजारा दिसतो. नाशिक ते हातगड अंतर ७५ कि.मी. आहे. वणी ते हातगड अंतर ३५ कि.मी.चे आहे. सापुतारा ते हातगड अंतर सहा कि.मी.चे आहे. मुंबईहून हातगड अंतर २४० कि.मी. आहे. हातगडवाडीत अनेक हॉटेल तसेच रिसोर्ट्स राहण्यासाठी उपलब्ध आहेत. हातगड पाहण्यास गेलो असता सापुतारा, सप्तशृंगी गड, ओझरखेड धरण, चणकापूर धरण, तानापाणी गरम पाण्याचे झरे अशी अनेक ठिकाणे पाहता येतात.

drsurekha.mulay@gmail.com