घाटी रुग्णालयाच्या सरकारी क्वार्टरपासून हाकेच्या अंतरावर असलेला बिबी का मकबरा आणि पाणचक्की, जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीत कैलास लेण्यासमोर साजरा होणारा वेरुळ महोत्सव, कोरीव घृष्णेश्वराचे मंदिर, झोपलेला भद्रा मारोती, कितीदा तरी शर्यत लावून चढलेला दौलताबाद किल्ला. नागमोडय़ा घाटातून सामोरं येणारं म्हैसमाळ, जगप्रसिद्ध अजिंठा या सगळ्याच गोष्टी माझ्या आकर्षणाच्या. मला आठवतं, कुडकुडणाऱ्या थंडीत रात्री अकरा-बाराला वेरुळ महोत्सवाहून परतताना केलेली मस्ती, मित्र-मत्रिणींचा मेळा आणि अंगावर शहारा आणणारा थंडगार वारा. सगळंच कसं एकदम भन्नाट होतं. या आठवणीतलं एक पान म्हणजे दर पावसाळ्यात पठणला जाऊन नाथसागर किती भरला हे पाहणं. नाथसागरात पाण्याचा साठा वाढला म्हटलं की आमचे पाय आपोआप पठणच्या दिशेने धावायला लागायचे. पठण हा औरंगाबाद जिल्ह्यचा केवळ एक तालुका का? तर नाही. पठणची स्वत:ची अशी एक ओळख आहे. शालिवाहन राजाची राजधानी म्हणून पठण शहराचे वेगळेच महत्त्व आहे. राजा रामदेवरायच्या काळात ज्या शहराला दक्षिण काशी म्हणून ओळख मिळाली ते हेच पठण. औरंगाबादपासून दक्षिणेकडे ५० किलोमीटरवर असलेला पठण तालुका गोदावरी नदीच्या तीरावर वसला आहे. पठण तालुक्याला मराठवाडय़ाचं प्रवेशद्वार असंही म्हणतात. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ याच शहरात आहे. नाथषष्ठीच्या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा