आंतरराष्ट्रीय भूगर्भ शास्त्रज्ञांचे आकर्षण ठरलेले आणि खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ज्याची ओळख आहे असे लोणार वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्य़ात वसले आहे. या नैसर्गिक आणि विस्तीर्ण सरोवराने जिल्ह्य़ाला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. या सरोवराचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी ८ जून २००० साली या परिसरास लोणार वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. परिसरात खूप प्राचीन अशी मंदिरेही आहेत. काही मंदिरे विवरातच आहेत. हेमाडपंथी स्थापत्यशैली असलेली ही मंदिरं आपल्याला आकर्षित करतात. अंडाकृती आकार असलेल्या या सरोवराची ५० हजार वर्षांपूर्वी निर्मिती झाली असावी असे सांगितले जाते. सरोवराचं पाणी खूप खारट असलं तरी त्याच्या एका बाजूने एक सतत वाहणारा स्वच्छ असा गोडय़ा पाण्याचा झरा आपण पाहू शकतो. जवळपास १.८३ कि.मी. व्यासाचे आणि १५० मीटर खोलीचे असे हे विवर आहे. सरोवराचा प्रशस्त आवाका आपल्याला मंत्रमुग्ध करतो.
परिसराला कपिलतीर्थ, विरजतीर्थ, धारातीर्थ, नाभीतीर्थ, तारातीर्थ, पवित्रतीर्थ, पद्मसरोवर, पंचाप्सर आदी विविध नावे आहेत. कमळजा देवी मंदिर, दैत्यसूदन मंदिर, शंकर गणेश मंदिर, रामगया मंदिर, विष्णू मंदिर, वाघ महादेव मंदिर, मोर मंदिर, अंबरखाना मंदिर, कुमारेश्वर, पापहरेश्वर, सीता न्हाणी, शुक्राचार्याची वेधशाळा, याज्ञवल्केश्वर, धारेजवळील मंदिर, ब्रह्मकुंड, यमतीर्थ, लोणारची धार, उंबरझिरा (औदुंबरतीर्थ), सोमतीर्थ, लिंबी बारव (वायूतीर्थ), अगस्तीतीर्थ, त्रिपुरुषांचा मठ, आडवा मारोती अशा अनेक प्राचीन मंदिरांनी लोणार शहराचे वैभव आणखीनच वाढवले आहे.
लोणाराला केवळ वन्यजीव अभयारण्य म्हणून नाही तर संशोधनाच्या आणि विज्ञानाच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे. सरोवराभोवतीची वनसंपदा आणि जैवविविधता संपन्न आहे. असंख्य जातींचे प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांचं लोणार हे माहेरघर आहे. सीताफळ, बाभळी, कडूनिंब, निलगिरी, बांबू, ताग, राम फळ इत्यादी विविध जातींची झाडं येथे आहेत. वन विभागाने सरोवराजवळ ताग, निलगिरी, फणस, आंबा, माड यांसारखी अनेक झाडं लावली आहेत. परिसरात सुमारे पंचाहत्तर प्रजातींचे पक्षी आढळून येतात. मोर, नीलकंठ, घुबड, बगळे, पारवे, ससाणा, करकोचा यांसारख्या अनेक पक्ष्यांचा येथे मुक्त वावर आहे. याशिवाय चिंकारा, लांडगा, तडस, कोल्हा, घोरपड, मुंगुस, माकडे, साप, खार, ससे यांसारख्या अनेक वन्यजीवांचा अधिवास या अभयारण्यात आहे. लोणार सरोवरापासून काही अंतरावर अंबर तळे असून तेही उल्कापातानेच निर्माण झाल्याचे सांगितले जाते. या तळ्याजवळ हनुमान मंदिर आहे. लोणार सामान्य पर्यटकाशिवाय जगभरातल्या वैज्ञानिकांना आकर्षित करते. देश-विदेशातल्या संशोधन संस्था व विद्यापीठांनी येथे सखोल भूशास्त्रीय अभ्यास केला आहे. त्यामुळेच लोणार परिसराचे वैज्ञानिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैशिष्टय़ खूप महत्त्वाचे आहे.
उल्कापातामुळे निर्माण झालेले हे विवर जगातील सात विवरांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे विवर असून ते बसॉल्ट खडकात निर्माण झाले आहे. लवणासुर नावाच्या राक्षसाला विष्णूने मारल्यानंतर त्याच्या नावावर लोणार हे नाव या सरोवराला मिळाले असावे अशी पौराणिक कथा येथे सांगितली जाते, पण ही आख्यायिकाच म्हणावी लागेल. सरोवराच्या परिसरात दाट जंगल आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या लोणार येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवास संकुल आहे, तसेच निवासाच्या खासगी व्यवस्थाही उपलब्ध आहेत. जवळचे विमानतळ औरंगाबाद विमानतळ आहे. मुंबई-भुसावळ मार्गावरील मलकापूर हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे तर जालना रेल्वे स्टेशनहून लोणार ९० कि.मी अंतरावर आहे. मुंबई-नागपूर, पुणे-मलकापूर, खामगाव, औरंगाबाद, अजंठा, बुलढाणा, जळगाव या शहरांशी लोणार बसने जोडले गेले आहे.
विवरात सरोवराच्या काठावर कमळजादेवीचे पुरातन मंदिर असून दर वर्षी नवरात्रीत फार मोठी यात्रा भरते. जवळच शिवाजी महाराजांचे आजोळ आणि राजमाता जिजाऊंचे माहेर सिंदखेडराजा आहे. तेथील जिजाऊ सृष्टी आणि प्राचीन मंदिरं आपण पाहू शकतो. येथील शूर-वीरांची स्मारके तलाव, महाल पाहण्यासारखे आहेत. राजे लघुजी जाधव यांचे स्मारक, सिंदखेड राजाचे नीळकंठेश्वर आणि रामेश्वर ही प्राचीन शिव मंदिरे देखणी आहेत. भटकंतीसाठी थोडा आणखी वेळ असेल तर शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आपण आपल्या वन, ऐतिहासिक पर्यटनाला धार्मिक पर्यटनाची जोड देऊ शकतो.
डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com