बीड शहर आणि परिसर पर्यटकांना नेहमीच आपलासा वाटतो. परळीला बारा ज्योर्तिलगापकी एक वैजनाथ, बीडच्या जवळ कपिलधारचा मोठा धबधबा, नामलगावचा श्रीगणेश इथल्या लोकांचं श्रद्धास्थान. बीड शहराबाहेर खंडेश्वरी मंदिर, त्याला लागून असलेल्या दीपमाळा, शिदोड गावची रेणुकामाता आणि तिथे असलेली हलती दीपमाळ, जुन्या बीडमधील पाषाणात कोरलेले हेमाडपंथी कंकालेश्वर मंदिर, राक्षसभूवनचे शनी महाराज, धारूरचा किल्ला, कधीही न आटणारी खजाना बावडी, सौताडय़ाचा रामेश्वर अशा अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असलेलं हे शहर व परिसर. या शहरात जो कुणी येईल त्याला पर्यटनाचा तृप्त अनुभव आणि आनंद देणारं हे शहर आहे. यासर्वाबरोबर लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट आहे ती म्हणजे नायगावचे मयूर अभयारण्य. बस किंवा कार प्रवासात अचानक आपल्या गाडीसमोरून मोरांचे थवे उडत आडवे गेले तर? किंवा आपल्या दोन्ही बाजूंनी खिडकीबाहेर डोकावताच फुलवलेल्या पिसाऱ्यांनी नाचणारे, उडणारे मोर, मोरांचे थवेच्या थवे पाहायला मिळाले तर? आनंदालाही पंख फुटतील ना? हा आनंद मी बालपणापासून अनुभवलेला आहे. पहाटे पाच-साडेपाचला या रस्त्यावरून गेले तर नायगावच्या रस्त्यावर दुतर्फा मोर-लांडोरांच्या जोडय़ाच जोडय़ा पहायला मिळतात. पाणवठय़ावर आलेले मोर, झाडाच्या फांद्यांवर आपला भला मोठा पिसारा लोंबकळत सोडून बसलेले मोर, डोंगराच्या पायथ्याशी बसलेले मोरांचे थवे, असे मोरच मोर आपल्याला पहायला भेटतात तरी मन शांत होत नाही. ‘‘दिल मांगे मोर’’ अशी आपली मन:स्थिती झालेली असतानाच एखादा मोर आपला देखणा फुलोरा नाचवत थुईथुई चालत आपल्यासमोर येतो आणि हे चित्र डोळ्यांत साठवतो. बीड शहराच्या पश्चिमेस २० किमी अंतरावर बीड-पाटोदा-नगर व बीड लिंबादेवी-डोंगरकिन्ही-नगर या दोन रस्त्यांच्या बाजूला असलेल्या डोंगराळ भागात हे अभयारण्य वसले आहे. पावसाळ्यात हे डोंगर हिरवेगार झालेले असतात. या भागात मोठय़ा प्रमाणात आढळून येणारे मोर लक्षात घेऊन शासनाने २९.९० चौ. किमीचा हा भाग ८ डिसेंबर १९९४ रोजी ‘‘नायगाव मयूर अभयारण्य’’ या नावाने संरक्षित केला. या परिसरात मदरशा दर्गा, डोंगरीचे गुरुकूल, डोंगरकरकिन्हीचे नागेश्वर मंदिर ही पाहण्यासारखी स्थळे आहेत.
नायगावच्या मयूर अभयारण्याचे वन हे दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानगळीच्या व काटेरी वनाच्या प्रकारात मोडते. प्रादेशिक वन विभागाने या क्षेत्रात अंदाजे १२०० हेक्टर क्षेत्रावर विविध झाडांची लागवड केली आहे. या अभयारण्यात मोराबरोबर तरस, लांडगा, कोल्हा, रानमांजर, काळवीट, ससे यांसारख्या वन्य प्राण्यांचे अस्तित्व आहे. येथे १०० हून अधिक प्रकारच्या पक्षांच्या प्रजाती आढळतात. नायगाव अभयारण्याचे मुख्यालय बीड येथे असून बीडपासून या अभयारण्याचे क्षेत्र बीड-पाटोदा-अहमदनगर या मार्गावर २० कि.मी.च्या अंतरावर आहे.नायगाव येथे बांधकाम खात्याचे दोन विश्रामगृह आहेत. त्याचे आरक्षण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बीड यांच्या कार्यालयात होते. याशिवाय इतर निवास व्यवस्था येथे उपलब्ध नसली तरी बीड शहर जवळच असल्याने खासगी निवासव्यवस्था मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे.
डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com