पुणे-मुंबई रेल्वे प्रवासातील खंडाळा घाट प्रेक्षणीय आहे. पावसाळय़ात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून कोसळणारे धबधब्यांचे दृश्य डोळय़ांत साठवण्यासारखे असते. डय़ुक्स नोज, राजमाचीचा किल्ला, ढाक बहिरीचा सुळका अशी अनेक ठिकाणे या घाटाच्या आसपास आहेत. असेच एक वेगळे स्थळ या घाटात आहे ते म्हणजे गंभीरनाथची गुहा. मंकी हिल आणि ठाकरवाडीच्या मध्ये १६ व्या आणि १७ व्या बोगद्याच्या वर डोंगरात कातळात खोदलेली एक गुहा आहे. तीच ही गंभीरनाथची गुहा. पुण्याकडून जाताना सगळय़ा रेल्वेगाडय़ा तांत्रिक थांबा म्हणून ठाकरवाडीला थांबतात. तिथे उतरून रेल्वे रुळाजवळून डोंगरावर जाण्यासाठी एक पाऊलवाट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुहेचे तोंड रेल्वे रुळाच्या विरुद्ध बाजूला असल्याने डोंगराला वळसा घालून मागच्या बाजूला जावे लागते. गुहेच्या तोंडाशीच एक वादकाची मूर्ती दिसते. जवळच एक जलकुंड आहे. गुहेत जवळपास २५ ते ३० माणसे बसतील, इतकी जागा आहे. गुहेच्या आतल्या भागात एका कोनाडेवजा खिडकीतून आणखी आत गेले की तिथे गंभीरनाथची बैठी मूर्ती आहे. इथून आजूबाजूचा परिसर रमणीय दिसतो. एका दिवसात आडवाटेवरची भटकंती करायची असेल तर या गुहेचा पर्याय चांगला आहे. शिवाय लोणावळा, खंडाळा या गर्दीच्या जागा टाळून थोडी वेगळी वाट धरायची असेल तर हे ठिकाण अगदी उत्तम आहे.

ashutosh.treks@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gambhirnath caves in khandala ghat