इतिहासकाळात जरी ८४ बंदरांचा उल्लेख होत असला तरी आज त्यापैकी अनेक बंदरांच्या जागी आपणास काहीच पाहता येणार नाही. तर काही ठिकाणी केवळ खाडी पार करण्यासाठी लाँच लागाव्यात अशा जेट्टीची सुविधा दिसून येते. मग ही बंदर भटकंती करून नेमकं काय मिळणार. या जागा कधीकाळी ऐतिहासिक तसेच व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाच्या होत्या. त्यांचे भौगोलिक स्थान आपणास त्याचे महत्त्व पटवून देणारे असते, याची जाणीव तेथे गेल्यानंतर हमखास होऊ शकते. काही ठिकाणी आपण गाडीवाटेने जाऊ शकतो तर काही ठिकाणी खाडी पार करून या बंदरावरून त्या बंदरावर जाता येते.
उत्तर कोकणातून ही भटकंती सुरू करून पार खाली विजयदुर्गपर्यंत कसे जावे याची एक कच्ची रूपरेषा मांडता येईल.
चिंचणी, तारापूर, बोईसर, बोर्डी, पालघर येथे आता पुरातन बंदरांचे कसलेही अस्तित्व नाही. वाढवण येथे सध्या महाराष्ट्र सागरी विकास महामंडळामार्फत बंदराचे काम सुरू होते, पण स्थानिक वादामुळे आता बंद आहे. नालासोपारा, वसई, उत्तन, भायंदर, घोडबंदर, ओवळा ही बंदरे आता अस्तित्वात नाहीत. तेथे फक्त समुद्र किनारी जाऊन पाहावे लागेल. कल्याणला दुर्गाडी किल्ल्या समोर खाडीवर जो पूल बांधला आहे तेथेच आत्ता नवी चौपाटी तयार केली जात आहे त्या ठिकाणी कल्याण बंदर होते. मुंब्य्राला सध्या बंदराचे अस्तित्व नाही.
मुंबईतल्या भाऊच्या धक्क्यावरून सागरी मार्गाने उरण रेवस मांडवा येथे जाता येते. येथे प्रवासी जेट्टी आहे. न्हावा-शेवा ही जागा आता जवाहरलाल नेहरू पोर्ट टस्ट्रच्या अधिकारात असल्यामुळे जाता येणार नाही. उलव्याला स्थानिकांची जेट्टी आहे. तुर्भे, नेरुळ, बेलापूर, दिवाळा येथे आता काहीच नाही. वडखळ नाक्यावरून पुढे अलिबागला जाताना निप्पॉन एस्सार कंपनीजवळ दोन पूल आहेत. तेथेच उजवीकडे म्हणजेच समुद्राकडील बाजूस धरमतर बंदर होतं. रेवस, मांडवा येथे जेट्टी आहे. चौल-रेवदंडा येथे स्थानिकांची जेट्टी आहे.
पुढे मुरुड जंजिरावरून खाडीतूनच दिघीला जाता येते. दिघीला जेट्टी आहे. पुढे हरिहरेश्वरला रस्तामार्गे जायचे. नंतर बाणकोट आणि वेळासच्या मध्ये बाणकोट खाडी असून बांगमांडले गावातून वाहनासहित लाँचने जाता येते. वेळासच्या अलीकडे वेश्वी जेट्टीवर आपण उतरतो. तेथून आंजर्लेवरून रस्तामार्गे हर्णे बंदर पाहून दापोली किंवा दाभोळला येता येते. हर्णे आणि दाभोळ ही आजदेखील महत्त्वाची बंदरे मानली जातात. दाभोळ येथूनच धोपावेला जाण्यासाठी मोठी लाँच आहे. ज्यातून गाडय़ा जाऊ शकतात. धोपावेवरून पुढे गुहागर चिपळूण असा प्रवास करत महामार्गावर येता येईल. पुढे बाणकोटला जेट्टी आहे. बोर्या आणि पालशेतला छोटय़ा जेट्टी आहेत. तर वेळणेश्वरला केवळ समुद्र किनारा आहे.
रत्नागिरी शहरात मिऱ्या बंदर पाहता येते. येथेच रत्नदुर्गजवळ जी जेट्टी आहे ती मात्र प्राचीन नाही. जयगडला पूर्वी छोटी जेट्टी होती, आता सागरी विकास मंडळामार्फत तेथे आंग्रे बंदर म्हणून विकास केला जात आहे. जयगड विजयदुर्ग आजही प्रवासी वाहतूक होते. विजयदुर्गचे बंदरदेखील सागरी मंडळामार्फत विकसित केले जात आहे.
gherarasalgad@gmail.com