पूर्व राजस्थानमध्ये हदोती जिल्ह्य़ातील बुंदी नावाचे छोटे शहर आपले खास वेगळेपण आजही जपून आहे. इतिहासात राजस्थान स्थानिक महल, किल्ले, लोककला, लोकसंगीत आदींसाठी ओळखले जाते. गर्दी टाळून शांतपणे पर्यटन करण्यासाठी एखाद्या माहितगारासोबत इथे धबधबे, तलाव, गुहेतील भित्तिचित्रे पाहण्यासाठी एक दिवसाची सफर करावी. तारागढ किल्ल्यावर खास राजस्थानी पद्धतीची अनेक पायऱ्यांची खोल विहीर, तसेच तेथील गढ महलमधील काही फ्रेस्को भित्तिचित्रे प्रेक्षणीय आहेत. बरीच पेंटिंग चांगल्या स्थितीत नाहीत, पण जी थोडी झलक बघण्यास मिळते त्यावरून त्या काळची रंगकला समजू शकते. सकाळी लवकर निघून या दोन्ही गोष्टी बघता येतात. तारागढ येथील चित्रशाळा बघण्यासारखी आहे. निळ्या रंगाचा मुक्त वापर असलेली रजपूत चित्रशैलीतील भित्तिचित्रे आजही तितकीच आकर्षक वाटतात. तीनशे वर्षे जुनी, अंदाजे तीन मजले खोल असलेली राणीजी की बावडी, त्यावरील कोरीव काम आणि वेगळ्या धाटणीसाठी प्रसिद्ध आहे. बुंदी शहर पायऱ्यांच्या विहिरींसाठी सुपरिचित आहे. जागतिक वारसा यादीत नाव असलेले अतिउष्ण राजस्थानातील बुंदी शहर अक्षरश: जागोजागी अशा बिनचूक रेखीव प्रमाणबद्ध विहिरी बाळगून आहे. धबाई कुंड अशीच एक मोठी विहीर, पण दु:खाची बाब म्हणजे आज त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. फिरण्यासाठी नवल सागर, जैत सागर तलाव तसेच ८४ खांबांची छत्री, सुख महल आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा