आरोग्यासाठी अतिशय लाभदायक व्यायामप्रकार म्हणजे सायकिलग. सायकलमध्ये कुठलंही इंधन भरावं लागत नसलं तरी सायकल चालवण्यासाठी शरीराला इंधनाची म्हणजे चांगल्या आहाराची गरज असते. अनेकजण वजन घटवण्यासाठी सायकलिंग करतात, परंतु अचानक आहार कमी करणे किंवा सायकलिंग करताना योग्य आहार न घेणेही धोकादायक ठरू शकते. कारण जाणूनबुजून केलेल्या उपासमारीमुळे शरीरात साठवलेले फॅट (मेद) कमी होते आणि अनावश्यक मेद कमी होण्याऐवजी स्नायू कमजोर होतात. म्हणूनच सायकलिंग करणाऱ्यांनी योग्य आहार घेणं अतिशय गरजेचं आहे.
- सायकलिंग केल्यानंतर तुमच्या शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडतं, म्हणून योग्य प्रमाणात पाणी प्या. एकदाच भरपूर पाणी न पिता दर चार-पाच किलोमीटर अंतरामागे थोडं थोडं पाणी पित राहायला हवं.
- प्रत्येकाच्या खाण्याच्या सवयी, पचणारे पदार्थ, आवडी-निवडी निरनिराळ्या असतात. त्याअनुसरून आहार घ्यावा.
- आपल्या शरीराला पचतील असेच पदार्थ सायकलिंग करताना खावेत. इतर सायकलस्वार घेतात म्हणून तो आहार घेऊ नये.
- रिकाम्यापोटी कधीच सायकलिंग करू नये.
- सकाळी सायकलिंग करताना एक ग्लास दूध, केळं, खजूर, गूळ-चपाती, राजगिरा चिक्की, काळे मनुके, ड्रायफ्रुट्स इ. हलके पण भरपूर ऊर्जा देतील असे पदार्थ खावेत.
- सायकलिंग करण्याआधी किंवा करताना जास्तीतजास्त कबरेदके खावीत आणि सायकलिंग झाल्यानंतर शरीराला प्रथिनांची जास्त आवश्यकता असते. त्या वेळी प्रथिनेयुक्त पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा.
- खूप भूक लागली असल्यास कुठलाही गोड पदार्थ, एखादं केळं, खजूर यांसारखे पदार्थ अतिशय उपयुक्त ठरू शकतात.
- संत्री, किलगड यांसारख्या फळांमध्ये पाण्याचा अंश खूप मोठय़ा प्रमाणावर असल्याने त्याचा आहारात समावेश असावा.
- सायकलिंग करताना शक्यतो पचायला जड पदार्थ खाणं टाळावं. त्यामुळे मटणासारख्या पदार्थाचा दिवसभराचं सायकलिंग झाल्यानंतरच्या आहारमध्ये समावेश असावा.
- पोटभर जेवल्यावर लगेच सायकलिंग करू नये. सायकलिंग आणि खाण्याच्या मध्ये वीस ते तीस मिनिटांचं अंतर असावं.
- पोट पूर्ण गच्च भरेपर्यंत खाऊन सायकलिंग केव्हाच करू नये. त्याचा परिणाम तुमचे शरीर आणि सायकलिंगवरही होऊ शकतो. भुकेपेक्षा थोडं कमीच खावं.
- आपल्याला जे पदार्थ किंवा पेयांमधून ऊर्जा मिळते ते पदार्थ जरूर खावेत, परंतु त्याचा अतिरेक करू नये.
- उन्हामध्ये सायकलिंग करताना तेलकट किंवा अति तिखट पदार्थ खाणं टाळावं.
- मोठय़ा सायकल सफरीदरम्यान भूक लागेपर्यंत न थांबता सायकलिंग करताना थोडय़ा थोडय़ा वेळाने खात राहावं, जेणेकरून वापरली गेलेली ऊर्जा भरून निघेल.
- सायकलिंग करताना धूम्रपान आणि मद्यपानासारखी व्यसनं करणं टाळावं.
prashant.nanaware@expressindia.com
आणखी वाचा