दार्जिलिंग आणि आजूबाजूचा प्रदेश हा हिमालयाचे दर्शन घेण्यासाठीचा उत्तम परिसर. उंचच उंच हिमशिखरे, देवदार वृक्ष आणि त्यामधून वळणावळणाची वाट काढत गेलेला रस्ता. त्यासोबतच इथे धावणारी दार्जिलिंग हिमालयन रेल्वे म्हणजे तर युनेस्कोने गौरविलेला जागतिक वारसाच. प्रत्येकाने एकदा तरी या नॅरोगेज रेल्वेने प्रवास करायलाच हवा. दार्जिलिंगपासून फक्त आठ किलोमीटरवर घूम नावाचे अत्यंत टुमदार गाव हिमालयाच्या कुशीत वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून ७४०० मीटर उंचीवर असलेले हे गाव तिथल्या रेल्वे संग्रहालय आणि बौद्ध मोनास्ट्रीसाठी प्रसिद्ध आहे. ‘यी घा चोलिंग गोम्पा’ या नावाने ही घूम मोनास्ट्री म्हणून प्रसिद्ध आहे. १८७५ साली तिबेटियन बुद्धिझमच्या गेलुग पंथाचे लामा शेराब ग्यात्सो यांनी बांधलेल्या या मोनास्ट्रीत १५ फूट उंचीची मैत्रेय बुद्धाची धीरगंभीर आसनस्थ मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे. या मोनास्ट्रीसोबतच इथे असलेले रेल्वे संग्रहालय आवर्जून पाहण्यासारखे आहे. २००० मध्ये हे संग्रहालय उभारण्यात आले. त्यात रेल्वेच्या विविध वस्तू, चित्रे, जुनी छायाचित्रे आणि १८८१ मध्ये सर्वप्रथम धावलेल्या हिमालयन रेल्वेचे ‘बेबी सिवोक’ नावाचे इंजिन आणि त्याचे डबे ठेवलेले आहेत. हे इंजिन आपल्याला आत जाऊन पाहता येते. घूम रेल्वे स्थानकाच्या आवारातच हे संग्रहालय आहे. समोरच असलेल्या लाकडी जिन्याने वरच्या दालनात गेले की रेल्वेसंबंधीच्या अनेक वस्तू सुंदर पद्धतीने मांडलेल्या दिसतात. दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या वस्तू देणगी म्हणून या संग्रहालयाला दिल्या आहेत. हे ठिकाण सुंदर, आकर्षक आणि प्रसन्न आहे. यामुळे दार्जिलिंग किंवा सिक्कीमच्या पर्यटनादरम्यान या नयनरम्य गावाला आणि रेल्वे संग्रहालयाला नक्की भेट द्या.
आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा