परतवाडय़ावरून मेळघाटच्या जंगलात जाण्यासाठी दोन प्रचलित मार्ग आहेत, पहिला धामणगाव गढीमाग्रे चिखलदरा व दुसरा सेमाडोह माग्रे धारणी. धारणी रस्त्यावरून घटान्ग गावावरूनदेखील चिखलदरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे. धामणगाव गढीमार्गे जाणारा रस्ता हा वापरातला आणि कमी अंतराचा आहे. धामणगाव गढीच्या पुढे लगेच घाट वळणाचा व कठीण चढणीचा रस्ता सुरू होतो. पहिली चढण संपली की सपाटीवरचे मनभंग गाव ओलांडून पुढे निघालो की पुन्हा चढण सुरू होते अन् काही वेळातच एका वळणावर आडनदी गावाचा फाटा लागतो. फाटय़ापासून गावापर्यंत डांबरी सडक आहे. खोलगट दरीत सपाटीवर वसलेले गाव, भोवतालची शेती, गावापर्यंतचा उतरणीचा नागमोडी हे सारे फाटय़ावरील नजरेच्या एका टप्प्यात दिसून येते. गावात प्रवेश करण्याआधी नदी आडवी येते म्हणून या नदीचे नाव आडनदी आणि गावालादेखील तेच नाव पडले आहे. गावातून एखादा मार्गदर्शक शोधायचा आणि नदीच्या काठाने पदभ्रमण सुरू करायचे. वाटाडय़ाशिवाय गेलात तरी नदीच्या सोबतीने दोन्ही बाजूंनी उंच डोंगरांमधून जाणारा रस्ता तीनेक तासात कलालकुंड धबधब्याजवळ घेऊन जातो. मात्र त्यासाठी तब्बल पाच वेळा तीच नदी पुन्हा पुन्हा ओलांडावी लागते. चार वेळा नदी ओलांडून झाली की आजूबाजूचे डोंगर हळूहळू जवळ येत असल्याचा भास होतो व पुढे डोंगर उंच व दरी अगदी अरुंद होऊन जाते. मोठाल्या दगडी शिळावरून मार्ग काढत कधी पाण्याचा प्रवाह ओलांडत आणखी एक वळण घेतले की समोरचे दृश्य पाहून अचंबित होऊन जातो. दोन्ही बाजूंनी प्रचंड उंच दगडी कडे व त्यामधून वाट काढत पावसाळ्यात कोसळणारा संपूर्ण प्रवाह अंगावरच येतो. घोंगावणारा आवाज व दूपर्यंत उडणारे तुषार प्रथम भीतीदायक जाणवतात. हा धबधबा जेथे कोसळतो तेथे खोल डोह तयार झाल्यामुळे पाण्यातून पुढे वाट काढत जाणे अशक्य होऊन जाते. या खोल डोहामुळे या धबधब्याखाली जाता येत नाही. धबधब्याच्या डोक्यावर जाण्यासाठी बाजूंच्या उभ्या दगडावरून, झाडाझुडपांमधून वाट काढत पुढे जावे लागते. कधी दोर (रोप) वापरून तर कधी एकमेकांना हात देत वर चढण्यास अर्धा तास लागतो. वर चढून गेल्यावर तेथील दृश्य अप्रतिम असे आहे. नदी उंचच उंच कडय़ांच्या मधून चिंचोळ्या जागेतून दाट झाडीतून वाहत येते.वेगाने कोसळणाऱ्या नदीचा घोंघावणरा आवाज हे सारे त्या गुढतेत भरच टाकते. सभोवार नजर टाकली की त्या दरीचे सौंदर्य पाहून मन मोहून जाते. कलालकुंडच्या माथ्यावर थोडा वेळ थांबून पोटपूजा करावी आणि बाकादरीकडे निघावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा