कनाताल हे मसुरी-चंबा मार्गावर लागणारे उत्तराखंडातील छोटे गढवाली गाव. समुद्रसपाटीपासून सुमारे साडेआठ हजार फूट उंचीवर आहे. देवदार वृक्षांची दाट झाडी, बर्फाच्छादित डोंगर, पक्ष्यांचा अविरत किलबिलाट हीच या गावाची खास ओळख. जंगलप्रेमींसाठी कोडिया जंगलातून ट्रेकिंग आणि जंगल ट्रेल तर आहेच; पण कॅम्पिंगसाठीदेखील येथे बऱ्याच सुविधा आहे. जोडीला साहसी खेळांचा आनंददेखील लुटता येतो. गढवालमधील या गावात गेल्या सात-आठ वर्षांत थोडे पर्यटन वाढले आहे. पाहण्यासाठी जवळच सुरकंदा देवी मंदिर, धानौल्ती,तिहरी धरण आहे. निसर्गाची विविध रूपे कॅमेऱ्यात टिपण्यासाठी छायाचित्रकारांना इथे पुरेपूर वाव आहे. अगदी सुशेगात शांत-निवांत असे कनाताल गाव तिथे बांधलेल्या तिहरी धरणामुळे प्रकाशात आले आणि बऱ्यापैकी प्रगतिशील झाले आहे. येथील डोंगराळ प्रदेशात पायऱ्या-पायऱ्यांची शेती होते. मटार, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या, कोिथबीर, बटाटा इ. गरजेच्या भाज्या इथे पिकवतात. सकाळी अनेक बस थांब्यांवर गढवाली बायका ताजी भाजी विकायला पाठवतात; चंबा गावात किंवा डेहराडूनमध्ये ही भाजी विकायला जाते. डेहराडूनपासून कनातालचा अडीच तासांचा प्रवास एखादी कार भाडय़ाने घेऊन करता येतो. पूर्ण घाटातला रस्ता अनेक वळणे घेत डोंगर चढत असतो. अगदी साधे असे हे गाव निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. तिहरी धरणाच्या जलाशयात बोटिंग करता येते. निरभ्र आकाशात हिमालयाच्या पाश्र्वभूमीवर तिहरीतील विस्तीर्ण हिरवागार पाण्याचा संथ प्रवाह बघण्यासारखा आहे. सकाळी उठून मस्त थंडी झेलत लांबवर चालत जाण्याची मजा येथे अनुभवता येते.
नाताळ आणि नववर्षांच्या स्वागतासाठी येथे बरेच पर्यटक येत असतात. दिल्लीला कडाक्याची थंडी पडते, तेव्हा इथे हिमवर्षांव होत असतो. तेव्हा काही काळ रस्ते बंद होतात. प्रत्येक नाक्यावर इथे गरमागरम मॅगी-चहा, ऑम्लेट-पराठाचे छोटे छोटे स्टॉल्स लागलेले असतात. निसर्गाचे निरागस सौंदर्य, गरमागरम चहा आणि आणि गढवाली लोकांशी मस्त गप्पा मारण्यासाठी एकदा तरी कनातालला जायलाच हवे. जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्थानक डेहराडून हे आहे.
सोनाली चितळे sonalischitale@gmail.com