पर्यटकांच्या गर्दीमुळे कायम गजबजलेल्या अलिबागजवळ अगदी निवांत आणि रम्य अशी काही ठिकाणे आहेत. सासवने हे त्यातलेच एक. कोकणातले एक छोटेसे गाव. पण तिथे असलेल्या अत्यंत देखण्या शिल्पसंग्रहालयामुळे या गावाला मुद्दाम भेट द्यायला हवी. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरील सगळीच गावे खरे तर निसर्गरम्य आणि वर्षभर केव्हाही भेट देण्याजोगी असतात. त्यातही काही आडवाटेवरील ठिकाणांकडे पर्यटक सहजासहजी फिरकत नाहीत. त्यामुळे ती अद्यापही शांत आणि निसर्गरम्य आहेत.
हेन्री मूर, रोदँ यांसारख्या जागतिक कलाकारांच्या पंक्तीत बसलेले प्रख्यात भारतीय शिल्पकार पद्मश्री नानासाहेब करमरकर हे याच सासवने गावचे. त्यांच्याच राहत्या घराचे आता उत्तम, देखणे शिल्पसंग्रहालय झालेले आहे. पुण्यातल्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारातील रुबाबदार शिवपुतळा हा शिवरायांचा पहिला अश्वारूढ पुतळा, तो या नानासाहेबांनीच तयार केला. नानासाहेबांनी घडवलेल्या अनेक शिल्पांचे प्रदर्शन सासवने इथे पाहायला मिळते. त्यात म्हैस, कोळीण, मांडी घालून बसलेला नोकर ही शिल्पे तर जिवंत वाटतात. करमरकर संग्रहालय म्हणजे अशाच अगदी जिवंत वाटणाऱ्या पुतळ्यांचे, शिल्पांचे देखणे संकलन आहे. नानासाहेबांच्या सूनबाईंनी अतिशय उत्तमरीत्या हे संग्रहालय सांभाळले आहे. अत्यंत जिवंत, ठसठशीत आणि देखणी शिल्पे या परिसरात मांडून ठेवलेली दिसतात. अगदी हुबेहूब दिसणारा नोकर पाहून एकदा परदेशी पाहुणेसुद्धा चकित झाले होते. तशी नोंद त्यांनी करून ठेवलेली आहे. डोंगरावरील कनकेश्वर आणि हे सासवने एका दिवसात निवांतपणे पाहून होते. अलिबागच्या अगदी जवळ असलेला हा ठेवा न चुकता पाहणे अगत्याचे ठरते.
आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा