सातारा जिल्ह्य़ातले जैववैविध्याने नटलेले ठिकाण म्हणजे कास पठार. सह्य़ाद्रीतील ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण गेल्या काही वर्षांत पर्यटनाच्या नकाशावर हॉट स्पॉट ठरले आहे. साधारण दहा-पंधरा वर्षांपूर्वी कासला आजच्यासारखी गर्दी अजिबात नव्हती. कासचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर कासकडे पर्यटकांचा ओघ आणखीनच वाढला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कास हे नाव कासा या झाडाच्या इथल्या अस्तित्वामुळे पडले असल्याची दंतकथा सांगितली जाते. याच गावालगत समुद्रसपाटीपासून १२१३ मीटर उंचीवरील कास पठाराचे एक हजार ९७२ हेक्टर राखीव वनक्षेत्र म्हणून वनखात्याने जाहीर केले आहे. हे पठार सातारा वन विभागातील मेढा व सातारा वनक्षेत्राच्या हद्दीत येते. कास गावात ग्रामदैवत असलेल्या कासाई देवीचे मंदिर आहे. कास या वृक्षाचे वैशिष्टय़ म्हणजे याची पाने पिकल्यानंतर रक्तवर्णी दिसतात. मार्च महिन्यात फक्त १५ दिवसांच्या कालावधीत यास पांढऱ्या रंगांची फुलं लाल पाकळ्यांसह गुच्छागुच्छाने आलेली दिसतात. पण कास पुष्प पठाराचे खरे सौंदर्य फुलते ते सप्टेंबर महिन्यात. कास पठार हे कातळ खडकाचे कमी प्रमाणात माती असलेले पुष्प पठार आहे. इथे सुमारे ४०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती आढळतात. तर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात. यामध्ये प्रदेशनिष्ठ, अतिदुर्मीळ वनस्पतींचा देखील समावेश आहे. रेड डाटा बुकमधील ६२४ प्रजातींपैकी ३९ प्रजाती कास पठारावर आढळतात. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून पठारावर रंगीबेरंगी फुलांचे पट्टे बहरू लागतात. निळ्या, जांभळय़ा, गुलाबी, पांढऱ्या, पिवळ्या रंगांच्या फुलांची आरास इथे सजलेली पाहावयास मिळते.

त्याचबरोबर गावातील कास तलाव व एकूणच सारा परिसर नयनरम्य आहे. त्यामध्ये वजराई धबधबा, कुमुदिनी तलाव, कास तलाव आणि डाक बंगला, बामणोली बोट क्लब, क्षेत्र येवतेश्वर, क्षेत्र शेंबडी मठालाही भेट देता येते. कास पठारापासून कोयना अभयारण्याची हद्द वीस किमीच्या अंतरावर आहे.

कास पठारावरील पुष्प हंगामाचे नियमन व पठाराचे संवर्धन वन विभागासोबत कास पठारामध्ये सामील असलेल्या कास, कासाणी, आटाळी, एकीव या चार गावांच्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांमार्फत एकत्रितरीत्या केले जाते. २०१६ पासून पाटेघर आणि कुसुंबी या दोन गावांचादेखील यात समावेश करण्यात आला आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे  drsurekha.mulay@gmail.com