गर्द झाडी, शांत समुद्रकिनारे आणि कौलारू घरे अशा निसर्गश्रीमंतीने कोकण प्रांत बहरलेला आहे. परंतु, त्याचसोबत मोठय़ा प्रमाणावर शिल्पश्रीमंतीसुद्धा या प्रदेशाला लाभलेली आहे. मात्र ही शिल्पश्रीमंती, हे शिल्पवैभव हे त्याच गर्द झाडीमधे कुठेतरी आतमध्ये लपलेले दिसते. ते पाहायचे, अनुभवायचे तर नुसती वाट वाकडी करून चालत नाही, तर त्या ठिकाणाची नेमकी माहिती आणि इतिहाससुद्धा जाणून घ्यावा लागतो. कोकणातला प्रवास म्हणजे वळणावळणाचाच. सहजगत्या कोणत्या ठिकाणी जाऊ असे कधी इथे होतच नाही. पण जेव्हा आपण इच्छितस्थळी पोहोचतो तेव्हा मात्र निसर्ग नाही तर शिल्पं आपली नजर खिळवून ठेवतात. असेच एक अत्यंत देखणे आणि अपरिचित शिल्प म्हणजे चिपळूणजवळच्या बिवली गावचा लक्ष्मीकेशव.

कोकणात विष्णुमूर्तीचे प्राबल्य मोठय़ा प्रमाणात दिसते. त्यातही केशव आणि लक्ष्मीकेशव यांची अनेक देवस्थाने आढळतील. इतक्या विपुल प्रमाणात केशवाच्या मूर्ती या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. विष्णुमूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्यामुळे या मूर्ती केशवमूर्ती या प्रकारात मोडतात. चिपळूण करंबवणेमाग्रे बिवलीपर्यंतचे अंतर हे अंदाजे २५ किलोमीटर आहे. पेशवाईतील कर्तबगार न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर नीळकंठशास्त्री थत्ते हे मराठी राज्याचे न्यायमूर्ती झाले. हे नीलकंठशास्त्री या बिवली गावचे होत. परकीय मूर्तिभंजकांपासून वाचवण्यासाठी अनेक सुंदर मूर्ती त्याकाळी विहिरीत, कुंडात, डोहात टाकून दिल्या जायच्या. किंवा कधीकधी जमिनीत लपवून ठेवून वाचवल्या जायच्या. अशीच एक मूर्ती नीलकंठशास्त्री थत्ते यांना सापडली आणि त्यांनी ती मूर्ती बिवली या आपल्या गावी वसवली. या मंदिराचा जीर्णोद्धार १८३० मध्ये करण्यात आला. इ.स.च्या ११-१२व्या शतकात या ठिकाणी शिलाहार राजांची राजवट होती. त्या काळातली अतिशय सुंदर कोरीवकाम केलेली आणि प्रभावळीत परिवार देवता असलेली ही विष्णुमूर्ती निव्वळ देखणी आहे. विष्णूच्या डाव्या हातातील कमळाचा देठ आणि त्याच्या पाकळ्या यांची रचना इतकी वैशिष्टय़पूर्ण आहे की, एका बाजूने पाहिल्यास ते कमळ नसून कोणा स्त्रीची मूर्ती वाटते. स्थानिक लोक त्यालाच लक्ष्मी असे संबोधतात. त्यामुळे हा देव झाला लक्ष्मीकेशव. देवाच्या डाव्या पायाजवळ श्रीदेवी असून उजव्या पायाशी नमस्कार मुद्रेत गरुड बसलेला आहे. त्यांच्या बाजूला चवरीधारी सेविका कोरलेल्या आहेत. देवाच्या अंगावरील दागदागिने अत्यंत नाजूक आणि कलात्मक आहेत. देवाची बोटे अत्यंत सुबक असून सर्व बोटांमध्ये अंगठय़ा दिसतात. डोक्यावर शोभिवंत करंड मुकुट असून समृद्धीचे प्रतीक असलेला त्रिवलयांकित गळा शोभून दिसतो. गळ्यात असलेल्या तीन माळांपैकी एका माळेतील पदकात आंबे कोरलेले आहेत. यावरून अभ्यासक असे सांगतात की ही मूर्ती स्थानिक मूर्तिकारानेच घडवलेली आहे. अनेक दागिन्यांनी मढवलेली ही विष्णुमूर्ती निव्वळ देखणी आणि अप्रतिम आहे. शांतरम्य अशा ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे. सगळा परिसर गर्द झाडीचा आणि त्यात असलेले हे टुमदार मंदिर आणि त्यातली लक्ष्मीकेशवाची मूर्ती आवर्जून पाहायला हवी.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

Story img Loader