अंगाचा थरकाप उडवणाऱ्या, कडाडणाऱ्या विजेची प्रतिमा टिपणे काहीसे अवघडच. ती केव्हा चमकणार हे तुम्हाला अजिबात माहीत नसते आणि आकाशातील तिचे अस्तित्वही अगदी काही सेकंदापुरतेच असते. त्यामुळे आपणास सदैव सज्ज राहावे लागते. वीज चमकते तेव्हा तिच्या नैसर्गिक प्रकाशाचा वापर करून छायाचित्र काढणे हा खरा कौशल्याचा भाग असतो. त्यासाठी कॅमेऱ्याचे सेटिंगमध्येही बदल करावे लागतील. अ‍ॅपर्चर सेटिंग्ज ५.६ ते ११ व आयएसओ सेटिंग १०० असावे. वीज टिपण्यासाठी जागा निवडणे महत्त्वाचे. जसे एखाद्या डोंगराच्या पाश्र्वभूमीवर किंवा समुद्रापलीकडे क्षितिजावर चमकणाऱ्या विजेची व्याप्ती अथांग असते व ती टिपताना वाइड अँगल लेन्सचा वापर करावा लागतो. तसेच बल्ब (टाइम एक्सपोजर) सेटिंग्जचा वापर करावा. त्यामुळे दिर्घ काळ एक्स्पोजरचा वापर करता येतो. त्यासाठी केबल रीलिज वापरावे. केबल रीलिजला लॉकिंगची सोय असल्यामुळे आपण कॅमेऱ्याला हात न लावता बराच वेळ शटर उघडू व बंद करू शकतो. यामुळे छायाचित्रातील शटर शेक टाळता येतो. वीज टिपताना १०, २० व ३० सेकंद हे योग्य एक्सपोजर टायमिंग आहे. विजेचे मल्टिपल बोल्ट्स टिपताना शटर बराच काळ उघडे ठेवल्यास विजेच्या लहरी एकाच फ्रेममध्ये टिपता येतात. अशा वेळी अ‍ॅपर्चर सेटिंग्ज ८ अशी असावी.

Story img Loader