चिंकारा हा काळविटापेक्षा लहान, अंगाने नाजूक पण तितकाच चपळ आणि देखणा प्राणी आहे. नराची उंची खांद्यापाशी दोन फूट असते आणि शिंगे दहा अकरा इंचापर्यंत वाढतात. काही माद्यांना िशगे असतात काहींना नसतात. पाण्याशिवाय खूप दिवस काढू शकत असल्याने उजाड वाळवंटी प्रदेशातही हे आढळतात. चिंकाऱ्याचे कळप काळविटापेक्षा लहान असतात. चिंकाऱ्यांचा सर्वात मोठा कळप १० ते २० जणांचा असतो तर सर्वात छोटा तीन ते चार जणांचा.
अशा या चिंकारांसाठी महाराष्ट्र शासनाने १९ ऑगस्ट १९९७ रोजी पुणे जिल्ह्यतील बारामती तालुक्याच्या सुपे गावातील ५१४.५५ हेक्टरचे क्षेत्र मयुरेश्वर अभयारण्य म्हणून घोषित केलं. सुपे हे ऐतिहासिक पाऊलखुणा जपणारं गाव आहे. मालोजीराव भोसले यांची सुपे ही जहागिरी.
या प्रदेशात फक्त ३०० ते ३५० मि.मी. पाऊस पडतो. त्यामुळे येथे दक्षिण उष्णकटिबंधीय शुष्क काटेरी झुडपी वने आढळतात. वन विभागाने येथे मागील काही वर्षांपासून मृद व जलसंधारणाची कामे केल्यामुळे वन्यजीवांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मयूरेश्वरमधील चिंकाऱ्यांची संख्या वाढली आहे. मयूरेश्वर अभयारण्यात इतर प्राण्यांसोबतच चिंकारा जातीच्या हरणांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढल्याचे प्राणी प्रगणनेतून दिसून आले आहे.
तालुक्याचा काही भाग अवर्षणप्रवण असला तरी या भागात गवताची मदाने आहेत. ही गवताची मदानेच चिंकारा हरणांची नसíगक अधिवासाची ठिकाणे आहेत. बारामती शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात तांदुळवाडी गावच्या हद्दीत चिंकारा वन उद्यान व सावळ गावच्या हद्दीत पक्षिनिरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर या उद्यानात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आवळा, कांचन, बेहडा, हिरडा, फणस, कोकम, करवंद, कण्हेर याचा समावेश आहे.
मयूरेश्वर अभयारण्यात २०१५ मध्ये झालेल्या प्राणी प्रगणनेत २५७ चिंकारांची नोंद झाली आहे. यामध्ये १३८ माद्या, ९२ नर तर २७ पाडसांचा समावेश आहे. त्या आधीच्या प्रगणनेपेक्षा ही संख्या सुमारे ७० टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती येथील वनाधिकारी देतात. या परिसरात ससे, खोकड, खार, लांडगा, तरस, घोरपड यांसारखे प्राणीही आढळून आले आहेत. त्याचबरोबर गरुड, वेडा राघू, गांधारी, कापशी, तुरेवाला चंडोल, मोर, कावळा, चिमणी, तितर, खाटीक, टिटवी, पाणकोंबडी, कोतवाल हे पक्षीही मोठय़ा प्रमाणात आढळून आले आहेत.
मयूरेश्वर अभयारण्यालगत असणाऱ्या तालुक्यातील वडाणे, शिर्सुफळ, कानडवाडी येथेही स्वतंत्र प्राणी प्रगणना करण्यात आली. येथे ३० चिंकारांसह इतर प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. मयूरेश्वर अभयारण्याचे क्षेत्र हे काटवनाचे क्षेत्र आहे. अभयारण्यात शिरताच बाभळीची आणि थोडं पुढं गेल्यास बोरांची खुरटी झाडं दिसू लागतात. मातीच्या रस्त्यावरून जातांना वन विभागाच्या पाणवठय़ावर सकाळी विविध पक्षी दिसतात. निम, सिसू, खैर, हिवर, बोर, बाभूळ कुसळी वृक्षांबरोबर माखेल, पवन्या, प्रजातीचे गवत ही येथे पाहायला भेटते. जेजुरीचा खंडोबा येथून २५ कि.मी. अंतरावर आहे. भुलेश्वर मंदिर सात कि.मी., पुरंदर किल्ला ३५ कि.मी. तर मोरगावचा गणपती आठ कि.मी. अंतरावर आहे. मोरगावच्या मयूरेश्वर गणपतीचेच नाव या अभयारण्याला नाव देण्यात आले आहे.
केव्हा जावे – ऑगस्ट ते मार्च हा कालावधी अभयारण्यास भेट देण्याचा उत्तम कालावधी आहे.
कसे जावे – पुण्यापासून पुणे सोलापूर राज्यमार्गाने ७२ कि.मी. बारामतीपासून मोरगाव माग्रे ४३ कि.मी.
डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com