धार्मिक पर्यटनाकडे हल्ली सर्वाचाच ओढा वाढला आहे. त्यामागे प्रथा-परंपरेचा भागच अधिक असतो. पण जरा डोळस भटकंती केली तर अशा ठिकाणी इतिहासाचे धागेदोरेदेखील सापडतात. नवरात्रीत म्हणूनच अशा काही देवीस्थानांची भटंकती..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिम काळापासून चालत असलेली शक्तीची उपासना जगभर सर्वत्र पाहायला मिळते.   जगातील सर्वच संस्कृतींमध्ये शक्तिपूजा प्रकर्षांने दिसते. इतिहासात कुषाण राजांच्या नाण्यांवर आपल्याला विविध रूपांतील देवींचे अंकन केलेले पाहायला मिळते. ग्रीक राजांच्या नाण्यांवरसुद्धा ती ओर्दोक्शो आणि  नना देवीच्या रूपात दिसते.

भारतामध्ये जशी देवीच्या मूर्तीची विविधता दिसते त्याचप्रमाणे देवीस्थानेसुद्धा तिथे असलेल्या काही आगळ्यावेगळ्या गोष्टींमुळे प्रसिद्ध आहेत. काही देवी या त्यांच्या मंदिरांमुळे वेगळ्या असतात तर काही त्यांच्या स्वरूपामुळे. कमलासनावर बसलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूंनी दोन हत्तींकडून होणारा अभिषेक याला गजलक्ष्मी किंवा अभिषेकलक्ष्मी असे म्हणतात. या गजलक्ष्मीचे अत्यंत आकर्षक शिल्प गडचिरोली इथल्या मरकडी मंदिरावर पाहायला मिळते. कोकणात याच देवीला भावई असे नाव दिलेले आढळते. हरिश्चंद्रगडावर जातानासुद्धा वाटेत हे सुंदर शिल्प दिसते. परंतु मुखेडच्या मंदिरावर दिसणारे नृत्यमग्न सप्तमातृकांचे दर्शन केवळ अप्रतिम असेच होते. त्या मूर्ती जरी काही अंशी भग्न झाल्या असल्या तरीसुद्धा त्यातला उठावदारपणा आणि सौंदर्य नजरेत साठवून ठेवण्यासारखे असते.

दक्षिण कोकणात सातेरी या नावाने पुजली जाणारी देवी म्हणजे प्रत्यक्षात एक वारूळ असते. त्याच्याशी काही कथा निगडित असल्याने त्या वारुळाचीच देवी म्हणून पूजा केली जाते. देवगड तालुक्यातले कोटकामते हे गावच देवीला इनाम म्हणून दिले आहे. या गावाला पूर्वी एक प्राचीन कोट होता. त्याची साक्ष म्हणून रस्त्याच्या कडेला फक्त एक बुरूज आणि थोडीफार तटबंदी आजसुद्धा पाहायला मिळते. कोट असलेले गाव म्हणून कोटकामते असे याचे नाव पडले. मराठी आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी शके १६४७ म्हणजेच इ.स. १७२५ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्याची नोंद म्हणून मंदिराच्या भिंतीवर एक देवनागरी लिपीमधील ऐतिहासिक शिलालेख बसवला आहे. परंतु काही मंदिरे जशी देवीसाठी प्रसिद्ध आहेत, तशीच काही मंदिरे तिथे असणाऱ्या काही स्थापत्य चमत्कारांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहेत. पुणे-सोलापूर हमरस्त्यावरील भिगवणपासून कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे राशीन. गावात इ.स.च्या ९ व्या-१० व्या शतकात उभारलेलं यमाई किंवा जगदंबा देवीचं मंदिर आहे. मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत. त्या आता विविध रंगांनी रंगवलेल्या आहेत. त्यांचे बांधकाम खाली दगडाचे आणि वर विटांचे आहे. दक्षिणेकडील दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून जिना आहे तर उत्तरेकडील दीपमाळेवर जायला आतून जिना केलेला आहे. या जिन्याने वरती गेल्यावर एक आडवा लाकडी दांडा आहे तो धरून हलवला की दीपमाळ हलते. हे नक्कीच आश्चर्यकारक आहे. बीड जिल्ह्य़ातील रेणापूर, शिरूरजवळील कर्डे इथेही अशाच डोलणाऱ्या दीपमाळा आहेत. पेशवाईतील मुत्सद्दी अंताजी माणकेश्वरांचे राशीन हे गाव. मंदिरातल्या एका ओवरीमधील एक संस्कृत आणि एका मराठी शिलालेखात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. इथे एकूण पाच शिलालेख आहेत.

अतिशय आगळीवेगळी आणि थेट पाकिस्तानातून आपल्याकडे आलेली देवीपण आहे बरं का, आणि ती आहे कोल्हापूर जिल्ह्य़ातल्या गडहिंग्लजला! हे वाचून काहीतरी भलतंसलतं लहिंलंय असं वाटलं ना ? या दोन गोष्टींचा काहीतरी संबंध असेल तरी का अशी शंका मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. पण गंमत अशी की ही गोष्ट अगदी खरी आहे. यात अजिबात अतिशयोक्ती नाही. शक्तीपीठांची पुराणातील कथा प्रसिद्धच आहे.  त्या कथेनुसार कराचीच्या वायव्येला सुमारे २५० कि.मी. वर बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान टेकडय़ांच्या प्रदेशात हिंगोळ नदीच्या काठावर एका गुहेमध्ये नानीबीबी किंवा हिंगुळजादेवी हे हिंदूंचे पवित्र क्षेत्र वसलेले आहे. तीच हिंगुळा देवी गडहिंग्लज इथे गुड्डाई देवी म्हणून आली अशी अख्यायिका आहे. एका छोटय़ाशा टेकडीवर वसलेले हे मंदिर आहे. हिंगुळा देवीचा गड म्हणून गडहिंग्लज अशी या गावाच्या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. गुजरातमधील सोनारकाम करणाऱ्या पराजीया सोनी जातीची ती कुलदेवता आहे. याच जातीमधील एक पुरुष हुकुमीचंद याला देवीने सुवर्ण कारागिरी शिकवल्याची कथा सांगितली जाते. तर स्थानिक समजुतीनुसार हिंगाचा व्यापार करणाऱ्या बलुची व्यापारी मंडळींबरोबर त्यांची ही देवी गडहिंग्लज या ठिकाणी आल्याचे सांगतात. ही व्यापारी मंडळी ज्या मोठय़ा व्यापारी पेठ असलेल्या ठिकाणी गेली तिथे त्यांनी त्यांची ही देवी प्रस्थापित केली. गडहिंग्लज गावाला लागूनच असलेल्या छोटय़ा टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये देवीची पाषाणरूपातली मूर्ती आहे. या डोंगरावरून खाली आले की भडगावमध्ये नाईक यांच्या घरात याच देवीचे ठाणे आहे. तिथे मात्र देवीची चार हातांची मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात मशाल, कमल अशी आयुधे असून डोंगरावर असलेली गुड्डाई चालत या ठिकाणी आली असे सांगतात.

हिंगुळा देवीचे अजून एक मंदिर मराठवाडय़ात तर राजस्थानमध्ये हिंगलाजगढ या ठिकाणी आहे. कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्य़ात देखील ही हिंगुळादेवी असून तिथे तिला चंदला परमेश्वरी अशा नावाने संबोधले जाते.

आपल्या पुराणात इतहिसात अशा अनेक कथा दडलेल्या असतात. त्या खऱ्या की खोटय़ा हा भाग वेगळा. पण आपल्या भटकंतीत अशा ठिकाणांना भेटी दिल्या तर आपल्या ज्ञानात चार नव्या गोष्टींची भर  नक्कीच पडू शकते.

– आशुतोष बापट

ashutosh.treks@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most famous god place in maharashtra