सह्य़ाद्रीचं पुष्पवैभव अनुभवायचं असेल तर थोडीशी वाट वाकडी करावी लागेल. केवळ कासच नाही तर सरत्या पावसाळ्यात सह्य़पर्वताच्या कडेपठारांवर अनोखा पुष्पोत्सव चालू असतो. फक्त त्यासाठी जरा तंगडतोड करावी लागेल इतकंच.

सरत्या पावसाळ्यात सह्य़ाद्री अनंत रंगांनी न्हाऊन निघतो. सरत्या श्रावणाची मनमोहकता साऱ्या वातावरणाला व्यापून राहिलेली असते. उनपावसाचा खेळ थोडी विश्रांती घेत असतो आणि पाहता पाहता सह्य़ाद्रीच्या पठारांवर- डोंगरउतारांवर रानफुलांची एक बहारदार चादर पांघरली जाऊ लागते. ऑगस्टच्या शेवटच्या आठवडय़ापासून ते सप्टेंबर अखेपर्यंत सह्य़ाद्रीचं हे नटणं अगदी भान हरपून टाकणारं असतं.
पाऊस पडायला सुरुवात झाली, की जमिनीवर पडलेल्या बियांना, जमिनीतल्या कंदांना धुमारे फुटू लागतात. जमीन हिरवा शालू पांघरते. पाऊस पडल्या पडल्या सर्वप्रथम हजेरी लावतात ती पाण कुसुमची फुले. पाठोपाठ काळी मुसळीची चांदणीसारखी दिसणारी पिवळी फुले उमलू लागतात. आषाढाची चाहूल लागते ती आषाढ आमरीमुळे. आमरी म्हणजे इंग्रजीत ऑर्किड. गवतातून डोकावणारी पांढरी सुंदर फुले लक्ष वेधून घेतात. त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे मात्र ती मुळासकट उपटली जातात.
सह्य़ाद्रीत ऑगस्ट-सप्टेंबर हा तेरडा आणि सोनकीचा असतो. सारं पठारच्या पठार सोन पिवळ्या सोनकीने झाकले जाते. तर जागा मिळेल तेथे कधी दाट झाडीत तर कधी पायवाटेच्या कडेला पेवाची बेट दिसू लागतात. पेव हा एक फुलांचा प्रकार आहे. सह्य़ाद्रीच्या पुष्पोत्सवाची ही खरी सुरुवात असते.
नरसाळ्यासारखी दिसणारी पांढरी फुलं पेवाच्या हिरव्या बेटावर डोलू लागतात. पूर्ण खाली तोंड झुकलेल्या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी लाल रंगात परिवíतत झालेली पाने दिसू लागतात. मध्यभागी पिवळी आणि उर्वरित पांढरी अशा लांब दांडय़ाच्या फुलात मध टिपण्यासाठी ग्रास डेमन हे फुलपाखरू हमखास दृष्टीस पडते. या कृष्णधवल फूलपाखराची त्याच्या आकारापेक्षा दुप्पट सोंड कॉइलप्रमाणे गुंडाळेली असते. पावसाळ्यातील ही सारी निसर्गनवलं पाहणं हे भटकंतीचा उत्साह वाढवणारेच असते.
पेवाचं सौंदर्य असं तर केवळ काही तास किंवा दिवसाचं आयुष्य असणारी फुलं कीटकांना हरतऱ्हेने आकर्षति असतात. कधी मोहक रंगाचं आकर्षण तर कधी अनोख्या गंधाचं. अर्थातच परागीभवनासाठीच हा सारा खटाटोप. परागवहनाच्या बदल्यात मिळणारा मकरंद मिळवेपर्यंत जास्तीत जास्त परागकण कीटकांना चिकटतील याची योजना या इवल्याशा फुलांमध्ये अगदी बेमालूमपणे केलेली असते. कधी कधी काही उस्ताद फुलं मकरंद न देताच परागीभवन साधून घेतात.
रानफुलं ओळखणं तसं कठीण नाही. गिरिपुष्प, कुमुद, विष्णुकांत आभाळी अशी त्यांची सुंदर नावं सहज लक्षात राहतील. जरा अभ्यास केला आणि पाहिलेल्या फुलांच्या नोंदी केल्या तर हे सारं जमू शकतं. एकदा यांची नावं कळली, त्यांच्या नावामागच्या कथा उलगडल्या की मग त्यांची चटकचं लागते. कधीतरी माहीतगाराच्या सोबतीने भटका मग आणखीनच धमाल येईल.
सह्य़ाद्रीतली फुलं म्हटलं की नजरेसमोर येतं ते कासचं पठार. लांबच लांब पसरलेल्या या पठारावर टोपली कारवू सात ते बारा वर्षांतून एकदाच फुलते तेव्हाचं कासचं दृश्य केवळ अवर्णनीय असते. पण गेल्या काही वर्षांत कासवर हवशा-नवशा पर्यटकांबरोबरच छायाचित्रकारांची अमाप गर्दी होते. त्यातही फुलांचे आकर्षण कमी आणि जवळचा ठोसेघर धबधबा व साताऱ्याची बारा मोटांची विहीरच सध्या भाव खाऊन जात आहे.
कासइतकी वैविध्यता सह्य़ाद्रीत अन्यत्र नाही हे जरी मान्य केले तरी हे काही एकच ठिकाण नाही. सहज जाता जाता अनेक ठिकाणी पुष्पोत्सव अनुभवता येऊ शकतो. पण त्यासाठी काय पाहायचे हे माहीत असायला हवं. त्यासाठी थोडा अभ्यास लागेल. पण या चिमुकल्या दुनियेची ओळख तुमचं जगणं समृद्ध करणारी असेल हे मात्र नक्कीच.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ

येथे अनुभवा पुष्पोत्सव
रतनगडाचा परिसर सरत्या पावसात रानफुलांनी बहरलेला असतो. पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी, राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा, तुंग या किल्ल्यांवर असाच पुष्पोत्सव सुरू असतो. वरंधा, कुंभार्ली, आंबा, राधानगरी, आंबोली घाट रानफुलांनी बहरून जातात. सोनकीची मजा लुटायची तर राजमाचीच्या वाटेवर फेरफटका मारायला हरकत नाही. ित्रगलवाडीला तर नाशिकचं कासच म्हणायला हरकत नाही.

हे लक्षात ठेवा
सरत्या पावसाळ्यात सह्य़ाद्रीत उगवणारी रानफुलं अल्पायुषी असतात. त्यामुळे आपण उगाचंच पायवाट सोडून आडवे तिडवे फिरू नये आणि या फुलांचे अल्प आयुष्य आणखीन अल्प करू नये.
हल्ली छायाचित्रणाचा मोह इतका आहे की, अनेक वेळा चक्क फूल तोडण्यापर्यंत मजल जाते. हे टाळावे.
छायाचित्रणासाठी फुलावर झुकताना आजूबाजूच्या फुलांची नासधूस होणार नाही हे पाहावे.
फुलांच्या ताटव्यात बसून छायाचित्र काढण्याचा मोह टाळावा. कोणत्याही प्रकारचा कचरा (नाशवंत किंवा अनाशवंत) करू नये. आवडलेल्या फुलाचं रोप उपटून घरी घेऊन जाण्याचा प्रयत्नदेखील करू नये.
हा पुष्पोत्सव पाहणेच विसरून जावे, इतका छायाचित्रणाचा सोस करू नये.
अमित सामंत amitssam9@gmail.com

Story img Loader