छायाचित्रण हा हल्ली पर्यटनाचा अविभाज्य घटकच झाला आहे. कधी कधी तर पर्यटन कमी आणि छायाचित्रण अधिक असं चित्र दिसून येतं. पण बहुतांश वेळा आपण आपल्या कॅमेऱ्याचा संपूर्ण आणि योग्य वापर करतो का? याचं उत्तर सध्या तरी नकारात्मकतेकडे झुकणारं आहे.

डिजिटल युगात छायाचित्रण तुलनेनं सोपं झालं असलं तरी मूलभूत गोष्टी त्याच आहेत हे पुन्हा अधोरेखित करावसं वाटतं. कॅमेरा किती महागडा अथवा आधुनिक यापेक्षा तुम्ही फ्रेम कशी निवडता, प्रकाश कसा आहे आणि तुमचा हात किती स्थिर आहे यावरच छायाचित्राचा दर्जा दिसून येतो हे लक्षात घ्यायला हवे. दुसरा मुद्दा आहे तो वापराचा. मुळात तुम्हाला कॅमेरा कशासाठी हवा आहे? व्यावसायिक छायाचित्रणासाठी की हौस म्हणून. हौस म्हणूनच हवा असेल तर आज बाजारात कॉम्पॅक्ट कॅमेरे (पाइंट टू शूट) अनेकविध सुविधांसहित परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत. डिजिटल एसएलआर कॅमेरादेखील अनेकांना परवडत असला तरी त्याचा पूर्ण वापर करण्यासाठी तुम्हाला भविष्यात अनेक लेन्सेस, फिल्टर्सची आवशक्यता असते. त्यामुळे सर्वसामान्य हौशी पर्यटकांसाठी कॉम्पॅक्ट कॅमेरा हा पर्याय सध्या तरी योग्य म्हणावा लागेल.
बाजारात उपलब्ध असणाऱ्या अनेक ब्रॅण्डच्या कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यांमध्ये बहुतांश अनेक मोड उपलब्ध असतात. एसएलआरशी तुलना केल्यास त्या तडजोडी वाटतील, पण हौशी आणि सर्वसामान्य पर्यटकांसाठी या सुविधा पर्याप्त आहेत. या सुविधांबरोबरच तांत्रिक बाबींचा वापर करून कॉम्पॅक्ट कॅमेऱ्यानेदेखील अनेक प्रयोग करता येतात. पण त्यासाठी किमान एखादा क्रॅश कोर्स करावा लागेल आणि भटकंतीदरम्यान उपलब्ध वेळेत प्रत्येकालाच या तांत्रिक बाबी वापरता येतीलच असे नाही. त्यासाठी ऑटो मोड किंवा प्रसंगानुरूप मोड वापरावे.
प्रवासात वजन कमी असावे म्हणून आपण कमी वजनाच्या कॅमेऱ्याची निवड करतो. पण कॅमेरा जितका वजनाने हलका तितकाच हात हलण्याचे प्रमाण अधिक असते हे लक्षात ठेवावे. म्हणून वजनदार कॅमेरा घेऊन तो हाताला पेलवणार नाही असेदेखील होऊ देऊ नका. पेलवेल असाच कॅमेरा घ्या. तसेच चालता चालता एखादं दृश्य दिसल्यावर लगेचच कॅमेरा सरसावणे योग्य नाही. खरे तर त्यावेळी आपलं शरीर स्थिर होण्यास थोडासा वेळ देण्याची गरज असते. तो वेळ दिला नाही तर आपला हात स्थिर राहत नाही. तसेच एखाद्या दृश्याचे छायाचित्र मिळवण्याच्या आंनदाबरोबरच ते दृश्य उघडय़ा डोळ्यांनी अनुभवण्याचा आनंद घ्या. नाही तर एकापाठोपाठ एक छायाचित्र काढताना मूळ दृश्य पाहणंच विसरून जाल.
पुढे जाऊन छायाचित्रण शिकायचंय म्हणून डीएसएलआरच घ्यायचा असेल तर शक्यतो सुरुवातीला प्राथमिक डीएसएलआर घ्यावा. लेन्सची निवड करताना वाईड टू झूम अशा १८-१३५, १८-२००/२५० अशा लेन्स घ्याव्यात. एखादा प्राथमिक अभ्यासक्रम करावा. आपला कॅमेरा चांगला असेल आणि तो वापराचे शिक्षणच नसेल तर काहीच उपयोग नाही. कॉम्पॅक्ट कॅमेरा घेणाऱ्यांनीदेखील कॅमेऱ्याचे युजर मॅन्युअल पूर्णपणे वाचून आपला कॅमेरा समजून घ्यावा; अन्यथा काही नावीन्यपूर्ण मोड केवळ माहीत नसल्यामुळे एखादी चांगली फ्रेम गमवावी लागेल.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे छायाचित्रण जमतंय असं वाटल्यावर त्यावरच समाधान मानून थांबू नका. फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियासारख्या संस्थांचे सभासद व्हावे. तेथे असणाऱ्या कार्यशाळा, स्पर्धा, सादरीकरण यांचा लाभ घ्यावा आणि यातून मिळणारं ज्ञान आपल्या फ्रेममध्ये उतरवत जावे.

मेगा पिक्सेलचं महत्त्व किती?
सर्वाधिक मेगा पिक्सेल म्हणजे खूप चांगला कॅमेरा अशी आपली समजूत आहे. पण ती फसवी आहे. अधिकाधिक मेगा पिक्सेलची गरज असते ती जाहिरात फलकांसाठी, मोठय़ा आकारातील छायाचित्रांच्या प्रदर्शनासाठी. हौशी छायाचित्रकरांसाठी १२ मेगा पिक्सेलचा कॅमेरा पुरेसा असतो. कॅमेरा घेताना मेगा पिक्सेलपेक्षा अधिक महत्त्व आहे ते झूमला. त्यातही ऑप्टिकल झूम महत्त्वाचं. डिजिटल झूम हा फसवा शब्द आहे.

हे लक्षात ठेवा

भटकंतीदरम्यान कॅमेऱ्याचा झूम पूर्णपणे वापरण्याचा मोह टाळावा. आपल्या कॅमेऱ्याची क्षमता जरी असली तरी तुमचा हात त्या झूमला स्थिर राहण्याची खात्री नसते. त्यासाठी ट्रायपॉडची गरज भासते. ट्रायपॉडवरून क्लिक करतानादेखील बारीकसा धक्का छायाचित्र बिघडवू शकतो. त्यामुळे रिमोटदेखील गरजेचा असतो. म्हणूनच झूमची सुविधा पूर्ण क्षमतेने वापरण्यापेक्षा, ज्या मर्यादेपर्यंत हात स्थिर राहील इतपतच वापरून शक्यतो वाइड अँगलमध्ये छायाचित्रण करावे. प्राणी, पक्षी, हिमशिखरे, दूरवरच्या ठिकाणांचे, क्लोजअप न घेता फ्रेममध्ये चारी बाजूने जागा सोडावी; जेणेकरून ऑब्जेक्ट स्थिर राहते. नंतर अनावश्यक जागा क्रॉप करता येते. पूर्ण झूम करून चलचित्रण करणे पूर्णत: टाळावे. तेथेदेखील वाइड अँगल वापरावा.

कॅमेऱ्याची काळजी
पर्यटनादरम्यान कॅमेऱ्याला धूळ, धूर, धुकं, पाऊस, वारा अशा अनेक घटकांपासून सांभाळणे महत्त्वाचे असते. लेन्सेसवर जर धुळीचे कण बसले तर त्या आतबाहेर होताना संपूर्ण सर्किटलाच धोका निर्माण होऊ शकतो.
कॅमेरा कायमच स्वतंत्र बॅगमध्ये असावा.
बाजारात कॅमेरा क्लििनग किट माफक किमतीत उपलब्ध असते, ते सदैव जवळ बाळगावे.
लेन्स कॅप उघडून पटापट फोटो काढाण्याची सवय लावू नये. त्याआधी प्रवासात लेन्सवर काही डाग पडले आहेत का ते तपासावे. किटमधील साहित्य वापरून लेन्सचा पृष्ठभाग पुसून घ्यावा.
कॅमेऱ्याच्या बॅटरीजचा (रिचार्जेबल अथवा लिथिअम) एक अधिकचा जोड बरोबर ठेवावा.
फोटो काढल्या काढल्या त्याचा प्रिव्ह्य़ू सर्वाना दाखवण्याचा मोह टाळावा. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची बचत होईल.
नॉदर्न लाइटसारख्या दुर्मीळ सफरीवर जाताना, शक्य असेल तर किमान सुविधा असलेला आणखी एक कॅमेरा सोबत बाळगावा. प्रवासात पहिला कॅमेरा हरवला, काही बिघाड झाला तर इतके पैसे खर्च करून गेलेल्या सफरीतील दुर्मीळ दृश्य प्रतिमा हातातून निसटून जातील.
atmparab2004@yahoo.com