महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्य़ातील महाबळेश्वरच्या बाजूस वसलेले असे अत्युत्तम थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. दोन दिवसांची सुट्टी घेऊन ताजेतवाने होण्यासाठी पाचगणी हे अगदी योग्य ठिकाण म्हणावे लागेल. केवळ पाचगणीच नाही तरी आजूबाजूची दांडेघर, खिनगर, गोडवली, अमराळ, तघाट या सर्व गावांतील भटकंतीदेखील तुम्हाला विशेष आनंद देऊ शकते. मुंबई-पुणे-कोल्हापूर पट्टय़ातील लोकांसाठी दोन दिवस हवापालटासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८६० साली ब्रिटिशांनी येथील आल्हाददायक हवेमुळे या ठिकाणाला हवापालटासाठी प्राधान्य दिले. तेव्हापासून पाचगणी पर्यटनाच्या नकाशावर आले. टेबल लॅण्ड, पारसी पॉइन्ट, कमलगढ किल्ला, राजपुरी गुहा, मॅप्रो गार्डन, धोम धरण इ. गोष्टी बघण्यासाठी आहेत. बरेच लोक सायकल भाडय़ाने घेऊन सभोवतालचा परिसर बघून घेतात.

पाचगणी नेहमीचेच झाल्याने आपल्याला त्याचे खास आकर्षण नाही. पण मनमुराद निसर्ग बघत, स्ट्रॉबेरी चाखत पायी फिरण्यास खूप मजा येते. समोरून येणारे धुके अंगावर घेत हलका पाऊस पडत असतानाची पाचगणीची मजाच काही वेगळी. इथले जुने पारशांचे बंगले इथला जुना रस्टिक चार्म कायम ठेवून आहेत. पावसाळ्यात येथील लिंगमळा धबधब्यात भिजण्याची मजा घेता येते.

पाचगणीपासून आठ किमी. अंतरावर भिलार हे पुस्तकांचे गाव आहे. सुमारे १५,००० मराठी पुस्तके इथे वाचण्यासाठी आहेत. शासनाच्या विनंतीवरून सुमारे २५ चित्रकारांनी इथे येऊन त्यांच्या अनुभवविश्वातून अनेक भिंती सुरेख रंगवल्या आहेत. टेबल, खुर्च्या, सावलीसाठी रंगबिरंगी छत्र्या, सुंदर काचेची कपाटे इ. गोष्टी एकदा येऊन जरूर बघण्यासारख्या आहेत.

खरे तर पाचगणीला जायचे ते स्ट्रॉबेरीच्या शेतातली स्ट्रॉबेरी मनसोक्त खाण्यासाठी, एखाद्या धबधब्यातील पाण्यात डुंबण्यासाठी आणि मुख्य म्हणजे हे सगळे अनुभव घेऊन निवांत पुस्तकांच्या गावात हरवून जाण्यासाठी. भूक लागल्यावर जवळच्याच धाब्यावर मिळणाऱ्या गरमागरम पिठले-भाकरीवर ताव मारून जेवण्यासाठी. थोडी हटके अशी पाचगणीची सफर एकदा करून बघायलाच हवी. पण जर हे सगळे चवीने अनुभवायचे असेल तर नक्कीच गर्दी टाळून जावे. सुट्टीच्या दिवसांत शांत-निवांत पाचगणी गोंगाटात हरवून जाते.

सोनाली चितळे sonalischitale@gmail.com

मराठीतील सर्व लोकभ्रमंती बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Places to visit in panchgani