१९५४ पर्यंत पॉण्डेचरी फ्रेंचांची वसाहत होती. नंतर तो केंद्रशासित प्रदेश झाला. भारतातील युरोप असे ज्याचे वर्णन केले जाते, त्या पॉण्डेचरीत फ्रेंच आणि भारतीय संस्कृतीचा सुरेख मिलाफ दिसून येतो. बंगालच्या उपसागरातील फेसाळणाऱ्या लाटांसोबत किनाऱ्यावरून पहाटे आणि रात्री उशिराने लांबवर चालत जाण्यात वेगळीच मजा आहे. आजूबाजूची सुंदर फ्रेंच पद्धतीची घरे, कॅफेज आणि दुकाने बघण्यासारखी आहेत. येथील बासीलिका चर्चमधील मरियम मातेने आपल्यासारखी साडी नेसली आहे, तर येशू ख्रिस्ताने गळ्यात फुलांचा हार घातला आहे. पॉण्डेचरीचे हेरीटेज सेंटर हेरीटेज वॉकचे आयोजन करते. औरो बीच, सेरेंनिटी बीच, पॅरेडाइज बीच इ. समुद्रकिनारे आहेत. पॅरेडाइज बीचवर जाण्यासाठी फेरी बोटीने तिथपर्यंत जावे लागते. दोन-चार तास मजेत घालवून परत येण्यासाठी परतीची शेवटची बोट साडेपाच वाजता तिथून निघते. स्वातंत्र्यसनिक, कवी, साहित्यिक अरिवद घोष यांच्या प्रयत्नांनी अरिबदो आश्रमाची स्थापना १९२६ मध्ये झाली. १९६८ मध्ये फ्रेंच स्थापत्यकलेच्या धर्तीवर ऑरोविले शहराची रचना झाली. पॉण्डेचरीहून आठ किलोमीटरवरील ऑरोविले हे प्रायोगिक तत्त्वावर आधारलेले शहर आवर्जून पाहण्यासारखे आहे. १९६८ साली स्थापनेच्या वेळी १२४ देशांची माती एका कमलपुष्पसदृश मातीच्या भांडय़ात एकत्रित करून जागतिक एकात्मता अधोरेखित केली. सुमारे २००० लोकवस्ती असलेल्या आश्रमात ४४ देशांचे नागरिक राहतात. प्रोमेनाडे बीचच्या किनाऱ्यावरील फ्रेंच इन्स्टिटय़ूट अजूनही फ्रेंच वसाहतीतील जुना कला आविष्कार जपून आहे. इथे संस्कृत, तमिळ आणि फ्रेंच भाषेतील पुस्तके वाचायला मिळतात.
कसे जाल?
हवाईमार्गे : चेन्नई
रेल्वे : राजधानी, तामिळनाडू एक्स्प्रेस
चेन्नईहून पॉण्डेचरीसाठी बस सेवा उपलब्ध
सोनाली चितळे sonalischitale@gmail.com