निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची आवड असणाऱ्यांसाठी बाली हे सर्वात लाडके ठिकाण. जगभरातून पर्यटक येथे येत असतात. सर्व प्रकारच्या आधुनिक सोयी-सुविधांच्या सोबतीनेच निसर्गाचा पुरेपूर आनंद देणारे पर्यटन स्थळ म्हणून बालीचा लौकिक. अधिकृतपणे मुस्लीम राष्ट्र असलेल्या इंडोनेशियातील बाली हा हिंदूबहुल प्रांत आहे. मध्य जावामध्ये साधारण नवव्या शतकापर्यंत असणाऱ्या हिंदू राजांनी ज्वालामुखीमुळे बाली बेटांकडे स्थलांतर केल्याचे सांगितले जाते. तर एका राजपुत्राने आपलं स्वत:चं राज्य असावं या ओढीने बालीतल्या उबुद भागात आपली सत्ता स्थापित केली. याच उबुदमध्ये बालीतील सर्वाधिक मंदिरं आहेत. या मंदिरांमधले महत्त्वाचे मंदिर म्हणजे सरस्वतीचे मंदिर. आपल्या देशातदेखील सरस्वतीची अगदी मोजकीच मंदिरं आहेत. पण बालीतले हे मंदिर अत्यंत प्रशस्त आहे. उबुदच्या पट्टय़ात सर्वाधिक मंदिरे बांधली गेल्यामागे मरकण्डी ॠषीची कथा सांगितली जाते. मार्कण्डी जेव्हा या भागात आले तेव्हा रोगराईपासून वाचण्यासाठी त्यांनी देवांची आराधना केली आणि मंदिरं बांधली अशी अख्यायिका सांगीतली जाते. उत्तर बालीमध्ये असणारे मदर टेंपल हे त्यापकीच एक. मदर टेंपल बहुतांशपणे बालीच्या पर्यटन पॅकेजमध्ये हमखास असते. पण उदुबमधील सरस्वती मंदिर मात्र पर्यटकांपासून तुलनेने दूरच. मार्कण्डीने डोंगरात एका विशिष्ट पातळीवर सर्व मंदिरं वसवली असल्याची येथील जनतेची श्रद्धा आहे.
आग्नेय भारतात उंच आणि भव्य मंदिरे बांधण्याची स्पर्धाच सुरू होती. सरस्वतीचे हे मंदिर उंच नसले तरी त्याचे उंच वर चढत जाणारे शिखर सहज नजरेत भरते. मंदिर कोठूनही उठून दिसावे हा त्यामागचा हेतू असू शकतो. सरस्वती मंदिराच्या पायऱ्यांच्या बाजूचे कठडे, शिल्पीत प्राणी हे सर्व याच गोष्टी दर्शवितात. दरवाजावरील द्वारपालांच्या मूर्तीचा ढाचा तर अनोखाच म्हणावा लागेल. मुख्य मंदिराचे बांधकाम विटांचे असले तरी दरवाजा मात्र दगडाचा आहे. तर शिखरांबाबत मूळ ढाचा विटांचा आणि वर दगडी नक्षीकाम दिसून येते.
पण विशेष बाब म्हणजे मदर टेंपल सोडले तर ही सर्व मंदिरे इतर वेळी पूर्णपणे बंद असतात. बाली दिनदíशकेनुसार २१० दिवसांनी वर्षांतून एकच दिवस सर्वाना देवीचे दर्शन घेता येते. उबुदचे सरस्वती मंदिर देखील पूर्ण बंद असले तरी स्थापत्य कलेतील सर्व कलाकुसार पाहण्यासारखी आहे.
– सुहास जोशी
suhas.joshi@expressindia.com