निसर्गरम्य ओडिशा राज्याला कोणार्क-पुरीचे वलय लाभले आहे. मात्र, अनेक उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणेही राज्यात पहायला मिळतात. सिरिलिया हे त्यातलेच एक ठिकाण. भुवनेश्वरपासून १३० किलोमीटरवर केंद्रपाडा या जिल्ह्य़ातील राजकणिका या तालुक्याच्या ठिकाणापासून फक्त पाच किलोमीटरवर सिरिलिया गावात एक आश्चर्य दडलेले आहे.
या गावात जवळपास ८० घरे असून, कोणत्याही घराला दरवाजा नाही. अगदी महाराष्ट्रातल्या शनिशिंगणापूरसारखे. गावची देवता खोकराई ठकुरानीवर गावकऱ्यांची प्रचंड श्रध्दा. ही देवीच घराच्या उंबरठय़ावर बसली असल्याने दार कसे लावणार आणि देवीमुळे चोरी होणार नाही, अशी ठाम समजूत या ग्रामस्थांची आहे. पूर्वी कोणी तरी एका घरात चोरी केली होती. तो त्याच घरात अडकून पडला. त्याला बाहेर पडायचा मार्ग सापडेना. अखेर त्याने चोरी कबूल केल्यावर त्याची सुटका झाली, अशी अख्यायिका सांगितली जाते.
घराला दरवाजे नसण्याची ही पध्दत देशाच्या एका कोपऱ्यातही तेवढयाच श्रध्देने पाळली जाते, हे खरेच नवल म्हणावे लागेल. गावाच्या एका बाजूला देवीचे मंदीर आहे. मंदीर म्हणजे मूर्ती उघडय़ावर आहे आणि चारही बाजूंनी भींत बांधण्यात आली आहे. इथे देवीला नवस बोलताना लाकडाचा किंवा मातीचा घोडा वाहायची पध्दत आहे. मंदिराच्या परिसरात या घोडय़ांच्या असंख्य मूर्ती पहायला मिळतात. कार्तिकी पौर्णिमेला इथे मोठा उत्सव होतो. मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी गावात कोणत्याही घरी मांसाहार करीत नाहीत. देवीलाही कधीही मांसाचा नैवेद्य दाखवला जात नाही. हे देवस्थान पंचक्रोशीत प्रसिध्द आहे. इथे घराच्या भिंती नानाविध चित्रांनी व्यापलेल्या आहेत. मूळात फार कमी पर्यटक ओडिशाला जातात. लोकप्रिय ठिकाणांबरोबरच येथील काही वेगळ्या प्रथा परंपरा जोपासणाऱ्या सिरिलिया या दारे नसलेल्या गावाला भेट द्यायलाच हवी.
ashutosh.treks@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा